पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्षापूर्वी भाजपची सत्ता आली; पण आजही ते जाणवत नाही. शेळीने वाघाचे कातडे पांघरले म्हणून शेळी वाघ होत नाही. तद्वत राष्ट्रवादीच्याच काही जुन्या मंडळींनी फक्त टोपी फिरवली आणि भाजपचा अंगरखा घातला. अशीच काही मंडळी सत्तेत आल्याने हे चित्र झाले. भाजपचे संस्कार, आचार, विचार याचा कुठेही ताळमेळ नाही. त्याचाच परिणाम सध्या रोज भाजपचे प्रतिमाभंजन सुरू आहे. या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी विकासकामांचा आढावा घेतला; पण त्याहीपेक्षा पक्षाबद्दल रोज येणाऱ्या उलटसुलट बातम्यांबद्दल अधिक चर्चा झाली असे म्हणतात. पक्षाचे खासदार-आमदार आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू होती आणि आजही कायम आहे. भाजपांतर्गत कलह एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने ‘हल्लाबोल’ केल्याने शहराची राजकीय हवा चांगलीच तापली. महापालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांतील एका एका मुद्यावर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते जाब विचारतात. त्यावर समर्पक उत्तर नसल्याने भाजपची पळापळ होताना दिसते. राष्ट्रवादीने प्रश्नांचा भडिमार सुरू केला असताना भाजपचे नेते मूग गिळून बसल्याने लोकांनाही आरोपांत तथ्य वाटते. त्यातच भाजपच्याच राज्यसभा खासदाराकडून महापालिकेतील स्थायी समितीच्या निर्णयांवर जाहीर आरोप झाल्याने आणखीच मनोरंजन झाले.
राष्ट्रवादी पालिका सभागृहात गप्प
अनधिकृत बांधकामांवरील दंड, शास्तिकर रद्द करा, पाणीपट्टी दरवाढ मागे घ्या, ४२५ कोटींच्या निविदा रद्द करा, अल्पमुदतीच्या निविदा नको अशा विविध मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध निर्णयांचे वाभाडे काढत मोदी आणि फडणवीस यांचाही उद्धार केला. आश्वासनांची पूर्तता नसल्याने गाजर आंदोलन झाले. सांगवीत मोठा मोर्चा केला. शहरातील आठही प्रभाग कार्यालयांसमोर बऱ्यापैकी निदर्शने झाली. कायदा सुव्यवस्थेपासून सर्व विषयांवर राष्ट्रवादीचे नेते बोलले, अधिकाऱ्यांना निवेदने दिली. त्यातून भरभक्कम सक्षम विरोधकांची ताकद दिसली. गेले वर्षभर शहरात राष्ट्रवादी शांत शांत होती. या निमित्ताने जिवंतपणा पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अपेक्षेने का असेना चांगली उभारी घेतली. पक्षाच्या निष्ठावंतांची एकच खंत कायम असते.
महापालिकेत ३६ नगरसेवक आहेत, त्यापैकी एकही चेहरा कधी आंदोलन अथवा मोर्चात दिसत नाही. महापालिकेच्या बाहेर पक्षसंघटनेचे कार्यकर्ते सांभाळतात. अशावेळी किमान पालिका सभागृहात नगरसेवकांना भाजपला जेरीस आणले पाहिजे. प्रत्यक्षात विरोधी नेत्यापासून तमाम ज्येष्ठ नगरसेवकही मूग गिळून गप्प असतात. अगदी हाताची घडी तोंडावर बोट असते. गेल्या सर्वसाधारण सभेत भ्रष्टाचाराच्या एका मुद्यावर चिखलफेक झाली. राष्ट्रवादीने हल्लाबोल केला; पण त्यातही स्वतःचेच तोंड पोळले. कारण स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी ज्या तयारीने तासाभरात राष्ट्रवादी काँगेसच्या काळातील टक्केवारीची कुंडली वाचली त्याला तोड नव्हती. सभागृहात आम्हाला बोलूनच दिले जात नाही, असा लटका युक्तिवाद करण्याचे केविलवाणी वेळ विरोधी नेत्यांवर येते हेच दुदैवी आहे. खरे तर, भाजपचे फक्त संख्याबळ अधिक आहे. त्या तुलनेत अनुभवी, मुरब्बी नगरसेवकांची संख्या राष्ट्रवादीकडे अधिक आहे. मनात आणले तर सभागृहातसुद्धा भाजपला नाकी दम आणू शकतात. इच्छाशक्तीचा अभाव आहे, त्याहीपेक्षा हात बांधलेल्या काही मोजक्या मतलबी नगरसेवकांमुळे पालिकेत राष्ट्रवादी दुबळी ठरते. हे खांदेपालट झाली तर हे चित्र पलटू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.