"मुळा-पवना'त जलपर्णी; सांगवीत डासांचा उपद्रव 

"मुळा-पवना'त जलपर्णी; सांगवीत डासांचा उपद्रव 
Updated on

जुनी सांगवी  - मुळा व पवना नदी संगमावर वसलेल्या जुनी सांगवीतील नागरिकांना जलपर्णी व त्यामुळे होणारा डासांचा त्रास, नित्याचाच झाला आहे. पावसाळा येईपर्यंत जलपर्णी वाढू द्यायची व निविदा काढून ठेकेदार पोसायचे, नाममात्र कामे करून पावसाळ्यात वाहून गेलेल्या जलपर्णीची बिले अदा करायची, असे सूत्रच जणू काही वर्षांपासून बनले आहे. 

आधीच प्रदूषित असलेल्या मुळा व पवना या नद्यांमध्ये जलपर्णी फोफावली आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे. जलपर्णीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. डास चावल्यामुळे आजारांना सामना करावा लागत आहे. या विषयावरून जुनी सांगवीतील राजकारण प्रत्येक वेळी रंगते. वॉर्डात सत्तांतरही होते. पण, उपाययोजना व सुविधांच्या बाबतीत पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती होते. 

पात्रालगत प्लॅस्टिक कचरा 
आरोग्य विभागाकडून सण, उत्सव काळातच नदीपात्रालगतच्या घाटांची देखभाल दुरुस्ती व स्वच्छता केली जाते. एरव्ही दुर्लक्षच केले जाते. पवनानगर घाट परिसरात प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत आहेत. अरुंद रस्ता व त्यावरच उभी केलेली वाहने यामुळे कचरागाडी गल्ल्यांमध्ये जात नाहीत. परिणामी नागरिक नदीपात्रालगत घरगुती कचरा, निर्माल्य टाकतात. हाच कचरा थेट नदीपात्रात मिसळला जातो. अनेकदा हा कचरा उचलण्याऐवजी जागेवरच जाळला जातो. 

भिंत बांधली तरीही... 
नदीपात्रात कचरा फेकला जाऊ नये, यासाठी महापालिकेने भिंत बांधली आहे. तरीही कचऱ्याची स्थिती जैसे-थेच आहे. त्यामुळे जलपर्णीला प्लॅस्टिक कचरा, निर्माल्य, घरगुती कचरा अडकत असल्याने डासांच्या उत्पत्तीत वाढ होऊन प्रमाण वाढले आहे. निवडणूक काळात जलपर्णी हटावचा नारा देत, सांगवी डासमुक्त करण्यासाठी अनेकांनी राजकारण केले आहे. उपाययोजना मात्र शून्य आहे. 

श्रमदानातून जलपर्णी हटवली 
मनसेचे राजू सावळे यांनी जलपर्णी काढणे व काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांची बिले अदा करू नयेत, अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे केली आहे. गेल्या आठवड्यात पर्यावरण प्रेमी व मनसे कार्यकर्त्यांनी स्थानिक नावाड्यांद्वारे स्वखर्चातून मुळा नदीतील जलपर्णी पुढे ढकलण्याचे काम केले. आता पुन्हा जलपर्णी वाढली असून, ती वेळीच काढल्यास नागरिकांना डासांपासून दिलासा मिळेल. 

महापालिकेने मुळा व पवना नद्यांतील जलपर्णी, कॅक्‍टस, प्लॅस्टिक कचरा काढण्याचे काम यांत्रिक व मनुष्यबळाद्वारे साई फ्राइट कंपनीला दिलेले आहे. मुख्यालयाकडून निविदा प्रसिद्ध करून कामाचे आदेश दिलेले आहेत. लवकरच जलपर्णी काढण्यास सुरवात केली जाईल. 
- ज्ञानेश्‍वर सासवडकर, प्रभाग आरोग्य अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.