पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील गर्दीच्या रस्त्यांवर वाहतुकीची सुविधा देण्यासाठी पीएमपीने घेतलेल्या दोनशे नव्या मिडी बसपैकी बहुतांश बसमधील ‘इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम’ (आयटीएमएस) बंद पडली आहे.
त्यामुळे या बसना अवघ्या तीन महिन्यांत ग्रहण लागले आहे. २०० पैकी तब्बल १२० पेक्षा जास्त बसमधील या स्थितीमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.
पीएमपीने ३२ आसन क्षमतेच्या २०० मिडी बसची नुकतीच खरेदी केली. ८ मार्चपासून टप्प्याटप्प्याने त्यांचा वापर सुरू झाला आहे. दोन्ही शहरांतील वर्दळीचे आणि अरुंद रस्ते असलेल्या भागात या बसची वाहतूक अपेक्षित आहे.
प्रत्यक्षात या बस उपनगरांमध्येच जास्त संख्येने चालविल्या जात आहेत. बसमध्ये असताना पुढचा थांबा कोणता, तसेच बस कोणत्या मार्गावर धावत आहे, याची माहिती ‘आयटीएमएस’मुळे प्रवाशांना समजत होती. अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी आलेल्या या बसमधील ‘आयटीएमएस’ यंत्रणा बंद पडली आहे. या बाबत विचारणा केली असता, काही चालक आयटीएमएस प्रणाली हेतुतः बंद ठेवतात, असे निदर्शनास आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अशा चालकांवर नियमित कारवाई होते, असेही त्यांनी सांगितले.
नवीन मिडी बसमधील आयटीएमएस प्रणालीचे व्यवस्थापन ‘टाटा मोटर्स’कडे आहे. आम्ही त्यांना याबाबतची माहिती दिली आहे. ही प्रणाली लवकरच सुरू होईल. चालकांना प्रशिक्षणात या प्रणालीची माहिती दिली जाते. मिडी बसमधील सर्व समस्या लवकरच सोडविल्या जातील.
- सुभाष गायकवाड, प्रभारी जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएल
सुमारे ९० टक्के मिडी बसमधील इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, थांब्याची माहिती देणारी संगणक प्रणाली बंद आहे. पाठपुरावा केला असता ही प्रणाली सुरळीत करण्याचे दिलेले आश्वासन फोल ठरले. यावरून प्रशासनाची असंवेदनशीलता दिसून येते. ‘आयटीएमएस’ तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन करू.
- जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच
काय आहे आयटीएमएस प्रणाली?
बसच्या पुढील आणि मागील भागात इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.