उन्हाळ्यामुळे शिबिरांचे प्रमाण घटले, पॉझिटिव्ह रक्तघटकांसाठीही धावाधाव
पिंपरी - शहरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. त्याशिवाय पॉझिटिव्ह रक्तगटात ए, बी, ओ आणि एबी यांचे रक्तघटक मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. तसेच दात्यांनी रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येणे अपेक्षित आहे.
शहरातील काही प्रमुख रक्तपेढ्यांमध्ये रक्त पिशव्यांची स्थिती जाणून घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले. ए, एबी आणि ओ निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त (होल ब्लड) पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. रक्तपेढ्यानिहाय होणाऱ्या शिबिरांचे प्रमाण वेगवेगळे असते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या रक्तपेढीत मागणी सर्वाधिक आहे. येथे महिन्याला सरासरी 8 ते 9 शिबिरे होतात. मात्र, गेल्या दोन महिन्यांमध्ये आतापर्यंत सहा शिबिरे झाल्याचे स्पष्ट झाले. येथील रक्तपेढीत दररोज सरासरी 150 ते 200 रक्त पिशव्यांचा साठा असतो. खराळवाडी येथील पीएसआय रक्तपेढीतर्फे दोन महिन्यांमध्ये मोजकीच शिबिरे घेतली. पिंपरी येथील डॉ. डी.वाय.पाटील रक्तपेढीत सध्या "एबी निगेटिव्ह' या रक्तगटाचा तुटवडा आहे. अन्य रक्तगट मागणीनुसार दिले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विविध शस्त्रक्रियांमध्ये रक्ताची गरज भासते. थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी आठ दिवसांच्या आतील (फ्रेश ब्लड) रक्त लागते. संबंधित रुग्णांना सरासरी दर पंधरा दिवसांनी रक्त द्यावे लागते. त्यामुळे रक्ताची मागणी असते.
महापालिकेच्या रक्तपेढीसाठी 2017-18 या आर्थिक वर्षात एकूण 108 रक्तदान शिबिरे घेतली. महिन्याला सरासरी 9 रक्तदान शिबिरे घेऊन रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही, याची काळजी घेतो.
- डॉ. शंकर मोसलगी, रक्त संक्रमण अधिकारी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय
रक्तदान कोण करू शकते?
18 ते 60 वयोगटातील निरोगी स्त्री/पुरुष ज्यांचे वजन किमान 45 किलो आणि हिमोग्लोबिन 12.5 ग्रॅम आहे, अशी व्यक्ती.
कोणत्या रक्तगटाला कोणता रक्तगट चालतो?
रक्तगट चालणारे रक्तगट
पॉझिटिव्ह
ए ए आणि ओ पॉझिटिव्ह व निगेटिव्ह
बी बी आणि ओ पॉझिटिव्ह व निगेटिव्ह
एबी सर्व रक्तगट
ओ ओ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह
निगेटिव्ह
ए ए आणि ओ निगेटिव्ह
बी ओ आणि बी निगेटिव्ह
एबी सर्व निगेटिव्ह रक्तगट
ओ ओ निगेटिव्ह
|