घरपोच रुग्णसेवेची नवी परिभाषा

घरपोच रुग्णसेवेची नवी परिभाषा
Updated on

पिंपरी  - रुग्णालयात दाखल केल्यापासून उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णांच्या नातेवाइकांना थांबणे शक्‍य नसते. कामांच्या बदलत्या स्वरूपामुळे घरातदेखील रुग्णांची देखभाल करता येत नाही. अशा वेळी रुग्णांची शुश्रूषा करण्यासाठी ‘नर्सेस ब्युरों’च्या माध्यमातून तासिकेवर परिचारिका उपलब्ध होत आहेत. त्यामुळे रुग्णसेवा होत असून, कुटुंबीयांची काळजी मिटली आहे. तसेच परिचारिकांनादेखील करिअरच्या नव्या वाटा उपलब्ध होत आहेत. 

बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाचे जीवन घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावते आहे. एकत्र कुटुंबाऐवजी विभक्त कुटुंब पद्धत दिसून येत आहे. अशातच कुटुंबातील वृद्ध व्यक्ती किंवा इतर सदस्य आजारी असल्यास त्याची पूर्णवेळ देखभाल करणे शक्‍य नसते. यातून रुग्णसेवेसाठी ‘नर्सिंग किंवा नर्सेस ब्युरो’ या संकल्पनेचा जन्म झाला. 

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी करून ‘नर्सिंग ब्युरों’ची स्थापना करता येते. नातेवाइकांना सहज घरपोच सुविधा मिळत असल्याने अशा ब्युरोंची संख्या वाढत आहे. ऑनलाइन आणि अनेक हॉस्पिटलमध्ये या ‘ब्युरों’ची माहिती मिळते. वर्तमानपत्रातूनही जाहिरात वाचण्यास मिळते. 

पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात २० ते ३० नर्सेस ब्युरो कार्यरत आहेत. रुग्णसेवेसाठी या ब्युरोंकडे महिन्याची प्रतीक्षा असते. कष्टाची तयारी असल्याने नर्स या पेशात प्रामुख्याने केरळमधल्या मुलींचे वर्चस्व पाहायला मिळते. यासाठी ऑक्‍सिलरी नर्स अँड मिडवायफरी (एएनएम) आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफर (जीएनएम) नर्सिंग कोर्स पूर्ण करणे आवश्‍यक असते. साधारणपणे परिचारिकांना रुग्णालयात ६ ते १० हजार रुपये वेतनात तीन शिफ्टमध्ये रुग्णसेवा करावी लागते. कित्येकदा नातेवाइकांकडून त्रासही सहन करावा लागतो; परंतु या ‘नर्सिंग ब्युरों’मुळे परिचारिकांची मागणी वाढली आहे. प्रत्येक ब्युरोमध्ये १० ते १५ नर्स कार्यरत असून, त्यांना २८ हजारांपेक्षा वेतन दिले जाते. याबरोबरच कामाचा ताण कमी असतो. गरजूंची मागणी आल्यावर परिचारिकांना एक तास, चार तास, १२ तास आणि २४ तास या प्रकारांत रुग्णसेवा करावी लागते. 

श्रीमंत कुटुंबामध्ये कामानिमित्त बाहेर जाणे होत असते. परिणामी रुग्णाकडे दुर्लक्ष होतो. यामुळे ब्युरोला मागणी असून, यात प्रशिक्षित नर्सकडूनच रुग्णसेवा दिली जाते. आम्हाला पैशांपेक्षा रुग्ण बरा होणे महत्त्वाचे असते. 
- रमेश सातपुते, साईसेवा नर्सेस ब्युरो 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.