पुणे - ॲपच्या माध्यमातून विनापरवाना खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ११३ कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून त्यांच्या विक्रीला चाप लावला आहे. या कंपन्यांना प्रशासनाने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या सर्व कंपन्या स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबर इट्स या कंपन्यांशी संलग्न आहेत. अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
बापट म्हणाले की, ई कॉमर्स आणि ऑनलाईन खरेदी विक्रीच्या क्षेत्रात आता अन्नपदार्थही ऑनलाइन पद्धतीने मिळण्यास सुरवात झाली आहे. ॲप व संकेतस्थळाच्या माध्यमातून या कंपन्या शासनाची परवानगी न घेता खाद्य पदार्थ पुरवत होत्या. यातील काही कंपन्या, पदार्थांचा ताजेपणा जपत नव्हत्या. भेसळयुक्त पदार्थ विकत होत्या, असे लक्षात आल्याने ही कारवाई करण्यात आली. बृहन्मुंबई विभागात तब्बल ११३ आस्थापना अशा पद्धतीने गैरव्यवहार करत असल्याचे दिसून आले. यातल्या अनेक कंपन्या घरपोच सेवा देत होत्या. तथापि त्यांनी खाद्यपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण व परवाने घेतले नसल्याचे तपासणीमध्ये आढळून आले.
बापट पुढे म्हणाले की, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे व सहआयुक्त सुनील भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ३४७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यातील ११३ ठिकाणी नोंदणी न करताच खाद्यपदार्थांचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना आज नोटिसा देण्यात आल्या.
‘स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबर इट्स या ॲपच्या माध्यमातून हा गैरव्यवहार होत होता. स्विगी ॲपच्या माध्यमातून ८५ विक्रेते इ -सेवा देत होते. तर झोमॅटो ॲपच्या माध्यमातून ५० विक्रेते घरपोच पदार्थ देत होते. फुडपांडा आणि उबर इट्स या ॲपच्या माध्यमातून अनुक्रमे ३ व २ विक्रेते खाद्यपदार्थ देत होते.’
- गिरीश बापट, अन्न व औषध प्रशासनमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.