सांगा, आम्ही कसे जगायचे?

Pakistan-Hindu
Pakistan-Hindu
Updated on

पिंपरी - पाकिस्तानात राहत असताना तेथील दहशतवाद, अस्थिरतेने पाठ कधीच सोडली नाही. हिंदूंचा होणारा छळ हा कळीचा मुद्दा असल्याने आम्ही भारतात आलो. हिंदू असल्यामुळे भारताचे नागरिकत्व लगेच मिळेल, अशी खात्री होती. मात्र, नागरिकत्वाचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून सरकार दरबारी पडून आहे, अशी कैफियत पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या हिंदूंनी मांडत ‘सांगा आम्ही जगायचे कसे,’ असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात पाकिस्तानातून स्थलांतरित झालेले ४५० निर्वासित हिंदू आहेत. भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांचा लढा आजही सुरू आहे. शहरातील उबारो पंचायत ट्रस्ट सरकारी पातळीवर सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे अध्यक्ष जगदीश वासवानी यांनी ‘सकाळ’ला सांगितले. पिंपरी कॅंपमध्ये उबारो पंचायत ट्रस्ट १९४७ पासून कार्यरत आहे. या ट्रस्टचे ५० हजार सदस्य आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार झाला आहे, त्याबाबतचा पाठपुरावादेखील सातत्याने सुरू आहे. मात्र, हा प्रश्‍न मार्गी लागत नसल्यामुळे या नागरिकांमध्ये भीतीची भावना आहे. 

२००९ पासून ही मंडळी इथे आहेत. मात्र, त्यांना भारताचे नागरिकत्व मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड मिळत नसल्याची कैफियत वासवानी यांनी मांडली. दरम्यान, याबाबत ट्रस्टने आठ जुलै रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना यासंदर्भात सविस्तर पत्र दिले आहे. त्यात त्यांनी शहरातील ४५० निर्वासितांबाबतचा प्रश्‍न जिल्हाधिकाऱ्यांकडे पडून असल्याचे नमूद केले आहे. केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना अशा नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे आदेश दिले होते. यासाठी देण्यात आलेली दोन वर्षांची मुभा डिसेंबरअखेर संपणार आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रश्‍न लवकर मार्गी लावण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. नागरिकत्व देण्यासाठीची प्रक्रिया लवकर पूर्ण होत नसल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. 

अन्य राज्यांतील प्रश्‍न सुटला
गुजरातमधील अहमदाबाद, छत्तीसगडमधील रायपूर, उत्तर प्रदेशमधील लखनौ आणि राजस्थानमधील जयपूरमध्येही अनेक हिंदू नागरिक स्थलांतरित झाले. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय नागरिकत्व दिले असल्याचे जगदीश वासवानी यांनी नमूद केले. मात्र, पुणे आणि पिंपरीतील असे नागरिक भारतीय नागरिकत्वापासून वंचित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.