पिंपरी - हॅरिस पुलावरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी त्याला समांतर पुलाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. पुण्याहून पिंपरीकडे येणाऱ्या पुलाचे काम बोपोडीजवळील झोपडपट्टीच्या पुनर्वसनामुळे अडकून पडले आहे. पुणे महापालिकेने हे काम मार्गी न लावल्यास या प्रकल्पाची किंमत वाढणार असून, ही वाढीव दोन कोटी रुपयांची रक्कम त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेला द्यावी लागणार आहे. यासंदर्भातील पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी पुणे महापालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना पाठवले आहे.
हॅरिस पुलावर कायम वाहतूक कोंडी होते. ती कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी संयुक्तपणे या पुलाला समांतर पूल बांधण्याचे नियोजन केले. २३ मे २०१६ रोजी पुलाच्या कामाला सुरवात झाली. २२ मे २०१८ रोजी त्याची मुदत संपणार आहे. दरम्यान, पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे येणाऱ्या पुलाचे काम बोपोडी परिसरातील झोपडपट्टीच्या पुनर्वसनामुळे अडकून पडले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने दोन वर्षांच्या अवधीत अनेकदा यासंदर्भात पुणे महापालिकेबरोबर पत्रव्यवहार केला. दोन्ही पालिकांतील अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या. मात्र, आजतागायत हा प्रश्न मार्गी लागू शकलेला नाही. कंत्राटदाराला दिलेली मुदत मे महिन्यात संपणार आहे. मात्र, थोड्या कामासाठी या संपूर्ण पुलाचे काम अडकून पडले आहे. ठेकेदाराला हे काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी लागणार असल्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे. पुलाच्या उभारणीसाठी पुणे महापालिकेने दिलेल्या हिश्श्या व्यतिरिक्तची सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिकेला द्यावी लागणार आहे. झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पुणे महापालिकेचे सहायक आयुक्त उमेश माळी यांनी सांगितले.
पुलासाठी खर्च - 25 कोटी रुपये
पुलाची लांबी - 200 मीटर
पुलाची रुंदी - 10.50 मीटर
बोपोडीजवळ ताब्यात घ्यावी लागणारी जागा - 100 मीटर
बोपोडी परिसरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन अद्याप न झाल्यामुळे या प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे. ही वाढीव रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिकेला द्यावी, असे पत्र पुणे महापालिकेला दिले आहे. जागा ताब्यात आल्याखेरीज पुण्याकडून येणाऱ्या पुलाचे काम करणे शक्य होणार नाही.
- श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.