शहराच्या गरजेनुसार पार्किंग धोरण असावे 

शहराच्या गरजेनुसार पार्किंग धोरण असावे 
Updated on

पिंपरी -महापालिका प्रशासनाने पार्किंग धोरण आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरसकट सर्वत्र त्याची अंमलबजावणी करण्यात येणार नाही. प्रारंभी १४ महत्त्वाच्या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. पुण्यात गेल्या महिन्यात पार्किंग धोरणाचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर विरोधकांनी त्याला जोरदार विरोध केला. त्यामुळे सुरवातीला पाच रस्त्यांवर ते राबविण्याचे सत्ताधारी भाजपला ठरवावे लागले.

पुण्यातील अनुभव लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडमधील प्रस्तावित धोरणाकडे पहावे लागेल. पुण्यात तीन दशकांपूर्वी वाहनतळ उभारण्यास सुरवात झाली. विशेषतः लक्ष्मी रस्ता, मंडई या भागांत वाहनतळ उभारल्याचे दिसून येते. त्यानंतर, तेथे खासगी व्यावसायिकांमार्फत वाहनतळ विकसित करण्यात आले. तशी स्थिती पिंपरी-चिंचवडमध्ये नाही. शहराच्या विकास आराखड्यात १९८७ मध्ये सुमारे ८० जागा वाहनतळासाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यापैकी १९ जागांचा ताबा महापालिकेकडे आहे. पण तेथे वाहनतळ उभारलेले नाही. पिंपरी भाजी मंडईजवळील एकच वाहनतळ असून, ते भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे.

हे लक्षात घेतल्यास शहरातील नागरिकांना रस्त्यावर वाहने उभे करण्यासाठी पैसे मोजण्याची सवय नाही. शहराची लोकसंख्या गेल्या १६ वर्षांत दुप्पट होत असताना वाहनांच्या संख्येत आठ पटीने भर पडली आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे अत्यंत दुर्लक्षित झालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. पीएमपी बससेवेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहरांतर्गत भागात अपुरी बससेवा असल्याचा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चिला गेला. लोकलही वेळेवर धावत नाहीत. त्यामुळे देशात सर्वाधिक दुचाकी वाहने पुणे व पिंपरी-चिंचवड या जुळ्या महापालिकांच्या हद्दीत वाढत आहेत. 

पार्किंग धोरण आखताना गर्दीच्या ठिकाणी जागेचा नीट वापर, त्याचे व्यवस्थापन याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. लोकांनी स्वतःच्या वाहनांचा कमी वापर करावा, यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केली पाहिजे. जगातील प्रमुख शहरे, राज्यांच्या राजधान्या येथील उदाहरणे घेऊन धोरण आखण्याऐवजी आपल्या शहराची नक्की गरज काय आहे, ते विचारात घेऊन त्या त्या भागात कोणत्या वाहनांसाठी किती सोय केली पाहिजे, यादृष्टीने पार्किंगची जागा ठरवावी लागेल. शुल्क आकारतानाही नागरिकांच्या आर्थिक स्थितीचा विचार करावा लागेल. शुल्क आकारण्याबरोबरच काही रस्त्यांवर महापालिकेच्या वतीने वॉर्डन उभे करून त्यांच्यामार्फत वाहने शिस्तीत उभी केली, तरी त्या भागातील समस्या सुटू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.