पिंपरी - रस्त्यांच्या रुंदीकरणाला असलेल्या मर्यादा, शहरातील वाढती वाहने, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि हॉकर्स झोनचा प्रश्न यासाठी पार्किंग धोरण ठरविणे गरजेचे आहे. त्यासाठी नगरसेवक व नागरिकांनी सूचना मांडाव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
शहरातील सार्वजनिक पार्किंग (वाहनतळ) धोरणाच्या सादरीकरणाबाबत महापालिकेतर्फे स्थायी समिती सभागृहात आयोजित नगरसेवकांच्या बैठकीत आयुक्त बोलत होते. उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर आदी उपस्थित होते. सहशहर अभियंता राजन पाटील यांनी सादरीकरण केले.
आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘वाढत्या वाहनांची संख्या व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पाहता भविष्याच्या दृष्टीने पार्किंग धोरण ठरविण्याची गरज आहे. काही नागरिक एखाद्या ठिकाणी दीर्घकाळ वाहन उभे करतात. त्या ठिकाणी अल्प कालावधीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करणे अवघड जाते. या प्रकारांवर आताच नियंत्रण न आणल्यास भविष्यात दुष्परिणाम भोगावे लागतील. पार्किंग धोरण ठरविताना बायलॉज करून स्वतंत्र समिती नियुक्त करू व पार्किंगचे दर ठरवू.’’
‘सार्वजनिक वाहतूक सक्षम करा’
विरोधी पक्षनेते दत्तात्रेय साने म्हणाले, ‘‘आधी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करा. कुणाच्या तरी फायद्यासाठी निर्णय घेऊ नका. पार्किंग पॉलिसी राबविण्यासाठी निश्चित केलेली आरक्षणे आधी ताब्यात घ्या. एखाद्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर धोरण राबवा. नंतर पार्किंगचे धोरण ठरवा.’’ शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘सार्वजनिक वाहतूक आधी सक्षम करा, नंतर पार्किंग धोरण ठरवा. सामान्य नागरिकांना विनाकारण वेठीस धरू नका.’’ मनसे गटनेते सचिन चिखले म्हणाले, ‘‘नागरिकांवर आर्थिक बोजा टाकणाऱ्या पार्किंग धोरणाला आमचा विरोध आहे.’’ नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांनीही पार्किंग धोरणाला विरोध केला.
शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना विविध ठिकाणी वाहने उभी करण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी सार्वजनिक वाहनतळाचे धोरण ठरवून ते राबविण्याची गरज आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा किंवा कुणाच्या फायद्याचा किंवा नफा मिळविण्याचा हेतू यामागे नाही.
- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.