पुणे - पासपोर्ट काढताना पोलिस व्हेरिफिकेशनसाठी (पारपत्र पडताळणी) लागणारा कालावधी कमी होऊन तो 11 दिवसांवर आला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पासपोर्ट आणखी लवकर मिळणार आहे.
पासपोर्टसाठी पोलिस व्हेरिफिकेशन 21 दिवसांत करणे अपेक्षित आहे. परंतु पुणे पोलिस आयुक्तालयात यापूर्वी पोलिस व्हेरिफिकेशनसाठी साधारण 36 दिवस लागत होते. तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या प्रयत्नांमुळे हा कालावधी सरासरी 21 दिवसांवर आला होता.
पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम हे नागपूर येथे कार्यरत असताना त्यांनी पोलिस व्हेरिफिकेशनचा कालावधी सात दिवसांवर आणला होता. पुणे पोलिस आयुक्तांचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पोलिस व्हेरिफिकेशनबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, प्रकाश गायकवाड आणि सहायक आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी सर्व पोलिस ठाण्यांतील संबंधित कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. पोलिस व्हेरिफिकेशनला कशामुळे उशीर होतो, ही बाब लक्षात घेऊन प्रयत्न सुरू केले. त्यामुळे पोलिस व्हेरिफिकेशनचा कालावधी आता 11 दिवसांवर आला आहे.
पासपोर्टसाठी पोलिस व्हेरिफिकेशनचा कालावधी 11 दिवसांवर आणला आहे. हा कालावधी सात दिवसांवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे पोलिस व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेत पुणे आता राज्यात चौथ्या स्थानावर आले आहे.
- के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त
लातूर पहिल्या, तर पुणे चौथ्या स्थानावर
पासपोर्ट पोलिस व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेत लातूर हे राज्यात पहिल्या स्थानावर आहे. नागपूर दुसऱ्या, चंद्रपूर तिसऱ्या आणि पुणे चौथ्या स्थानावर आहे. लातूरमध्ये पोलिस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया चार दिवसांत, नागपूर येथे सात दिवसांत, चंद्रपूरमध्ये दहा दिवस, तर पुण्यात 11 दिवसांवर आली आहे. मात्र, अन्य शहरांच्या तुलनेत पासपोर्टसाठी सर्वांत जास्त अर्ज पुणे शहरात दाखल होतात.
|