‘अटल लॅब’मध्ये शहरातील दोन शाळा

‘अटल लॅब’मध्ये शहरातील दोन शाळा
Updated on

पिंपरी - निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील दोन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यात महापालिकेची पिंपळे गुरव माध्यमिक शाळा व खासगी विद्यादीप माध्यमिक विद्यालय, काळेवाडी यांचा समावेश आहे. या निवडीमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. या शाळांना प्रत्येकी २० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. 

औपचारिक शिक्षण पोचू न शकलेल्या संस्थांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोचून ‘लॅब’ची परिणामकारकता वाढविण्याचे अटल टिंकरिंग प्रयोगशाळा समुदाय अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयांतील नव्या संकल्पना रुजविण्यासाठी व कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहेत. इलेक्‍ट्रॉनिक पार्टस, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल, थ्री-डी प्रिंटर, ड्रोन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, रोबोटिक्‍स किट्‌स, विविध प्रकारचे सेन्सर्स, सेफ्टी गॉगल्स यांसह अनेक प्रकारचे साहित्य त्यात उपलब्ध राहणार असून त्याद्वारे प्रयोग करता येणार आहेत.

शहरात महापालिकेच्या १८ आणि खासगी २१५ माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी केवळ दोनच शाळा या ‘लॅब’साठी पात्र ठरल्या आहेत. या शाळांनी २० जानेवारीपर्यंत अटीशर्तींची पूर्तता करणे आवश्‍यक आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी दिली.

विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवणार उपक्रम. विद्यार्थ्यांना नवनिर्मिती करता येईल.
- सुचित्रानंद वडगणे, मुख्याध्यापक,  पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालय

निवड झाल्याने आनंद झाला आहे. वर्षभरात कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थी, शिक्षकांना प्रशिक्षित केले जाईल.
- अर्चना माने, मुख्याध्यापिका, विद्यादीप माध्यमिक विद्यालय

अटल टिंकरिंग लॅब योजनेचा दुसरा टप्पा
 देशभरातील १५०४ शाळांची निवड
 महाराष्ट्रातील ११६ शाळा
 पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ११ शाळा
 पिंपरी-चिंचवड शहरातील २ शाळा
 १६०० चौरस फुटांची लॅब 
 सहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांना लाभ
 लॅबसाठी पाच वर्षांत मिळणार २० लाखांचे अनुदान 
 तीन अटी शर्तीची पूर्तता केल्यावर सुरवातीला १२ लाख मिळणार 
 त्यानंतर देखभालीसाठी प्रतिवर्षी दोन लाख रुपये मिळणार

असे मिळणार अनुदान
पब्लिक फायनान्शियल मॅनेज सिस्टिममध्ये नोंदणी 
निती आयोगाबरोबर करार
शाळांची जागा ताब्यात घेऊन लॅब उभारणी 
ऑनलाइन माहिती भरल्यावर १२ लाखांचा निधी मिळणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.