पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात भाजपतर्फे स्वच्छता अभियान राबविले जात असतानाच आज शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघांच्या आढावा बैठकींद्वारे लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीसाठी "मिशन 350'ला प्रारंभ झाला. उत्तर प्रदेशचे ग्रामविकास आणि आरोग्य मंत्री महेंद्र सिंह यांची या दोन्ही मतदार संघांसाठी पक्षाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून आज त्यांच्या उपस्थितीत बैठका पार पडल्या.
मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदार संघातील सध्याची परिस्थिती मंत्री महेंद्र सिंह यांनी जाणून घेतली. शिरूर मतदार संघासाठी भोसरीतील रोशन गार्डन येथे झालेल्या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, पक्षनेता एकनाथ पवार, शिरूरचे आमदार बाबूराव पाचारणे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, आमदार योगेश टिळेकर आदी उपस्थित होते. शिरूर मतदार संघातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांतील पक्षाचे तालुकाध्यक्ष, मंडलाधिकारी, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष, जिल्हापरिषद व पंचायत समित्यांचे पदाधिकारी व सदस्य, पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. भोसरीतील पक्षाचे सर्व नगरसेवक पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अशीच बैठक मावळ लोकसभा मतदार संघासाठी तळेगाव येथे घेण्यात आली. शिरूर मतदार संघातील प्रत्येक तालुक्यांतील बूथ समित्या, मतदार आणि कार्यकर्त्यांची संख्या यांचा आढावा घेऊन निरीक्षक महेंद्र सिंह यांनी सर्वांना उपयुक्त सूचना दिल्या.
शिरूर मतदार संघासाठी व्यूहरचना
- प्रत्येक बूथवर किमान दहा कार्यकर्ते तयार असावेत
- डिसेंबरपासून युवा जोडो अभियान राबवावे
- प्रत्येक आमदाराकडे एका तालुक्याची जबाबदारी
- आठवड्यातून किमान तीन बैठका आमदारांनी घ्याव्यात
- मंडल व तालुकास्तरावर बैठका घेऊन जनसंपर्क वाढवावा
- नागरिकांची कामे सरकारच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करावा
कामाची माहिती कळणार पक्षाला
भाजपने "मिशन 350 ऍप' तयार केले आहे. झालेल्या बैठकांचा तपशील, अभियानाची माहिती छायाचित्रासह ऍपवर अपलोड करण्याची सुविधा आहे. ऍपवरील माहिती वरिष्ठ स्तरावर तपासून कोण काम करतो आणि कोण नाही, याची माहिती पक्षाला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.