‘सकाळ’संगे चित्राविष्कार रंगे

‘सकाळ’संगे चित्राविष्कार रंगे
Updated on

पिंपरी - सकाळची थंड हवा, कोवळ्या उन्हाची किरणे, अशा आल्हाददायक वातावरणात शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळच्या कोवळ्या उन्हात शाळांच्या पटांगणात बसलेले विद्यार्थी आपल्या कल्पनाशक्‍तीला वाव देत रंगरेषांच्या दुनियेत रमले होते. काही शाळांनी ‘खास’ बैठक व्यवस्था केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य होते.

शालेय विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये स्पर्धा झाली. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र विषय होता. घर, मोबाईलपासून ते सण, जंगल, रस्ता सुरक्षा, वन लाइफ लव्ह इट आदी विषय होते. त्यात आपली आवड व कल्पनाशक्तीच्या आधारे चित्र रेखाटले होते. वॉटरकलर, रंगीत खडूंच्या साह्याने रंग भरून स्पर्धेतील सहभागाचा आनंद द्विगुणित केला. अनेकांचे चित्र लक्ष वेधून घेत होती. समाजातील चालू घडामोडींवर आधारित विषयांकडे विद्यार्थ्यांचा कल दिसला. चित्र काढल्यानंतर त्याखाली अनेकांनी सामाजिक आशयाचे संदेश लिहिले. 

निगडीतील पिंपरी-चिंचवड अपंग मित्र मंडळाच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. कामायनी मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे लक्षवेधक ठरली. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे शाळेतील शिक्षक तोंडभरून कौतुक करताना दिसले. 

रहाटणीतील एसएनबीपी स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये वन लाइफ लव्ह इट या विषयाबाबत कुतूहल दिसून आले. याचा नेमका अर्थ जाणून घेत त्यांनी चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. आपल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना त्यांनी अंतराळवीर, विज्ञान, तंत्रज्ञान अशा नव्या विषयांची मांडणी चित्रांच्या माध्यमातून केली. भारतीय जैन संघटना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

आई-बाबांकडून कौतुकाची थाप
चित्रकला स्पर्धा झाल्यानंतर आपण कोणत्या विषयावर चित्र काढले, त्यात कोणते रंग भरले, किती वेळात चित्र पूर्ण केले, असा सारा तपशील विद्यार्थी आपल्या आई-बाबांना सांगत होते. मुलांनी केलेल्या वर्णनावर खूष होऊन पालक मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.