अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल

अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल
Updated on

‘अभ्यासू’ गटनेत्यांच्या निर्णयाचा फटका; पवनात दुप्पट साठा

पिंपरी - पवना धरणात आवश्‍यकतेपेक्षा दुप्पट साठा आणि यंदा वेळेवर पाऊस येण्याचा हवामान विभागाचा अंदाज, अशी अनुकूल स्थिती आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अभ्यासू’ गटनेत्यांनी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाणीटंचाईला तोंड देताना नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच, गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी सकाळी अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याने लोकांच्या त्रासात भर पडण्याची शक्‍यता आहे.

सर्वच धरणांमध्ये १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा ठेवावा लागतो. त्यामुळे, पिंपरी-चिंचवड महापालिकेला १५ जुलैपर्यंत पाणीकपात न करता आवश्‍यक असलेला ०.९५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा, तसेच इतरांसाठी ०.५० टीएमसी साठा पवना धरणात राखून ठेवला आहे. या साठ्यानंतरही धरणात ०.८९ टीएमसी साठा शिल्लक राहणार आहे. म्हणजे पिंपरी-चिंचवडला १५ जुलैनंतरही महिन्यापेक्षा अधिक काळ पुरेल एवढे पाणी धरणात आहे. 

सध्या धरणात २९ टक्के पाणीसाठा असून, १५ जुलैनंतर दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक साठा शिल्लक राहील. जुलैमध्ये दमदार पाऊस झाल्यास शिल्लक पाणीसाठा कोणाच्याही उपयोगाला आणता येणार नाही. अशी स्थिती असताना महापालिकेचे प्रशासन आणि नवनिर्वाचित नगरसेवक पाणी कपातीचा निर्णय मागे घेऊन रोज नियमितपणे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय का घेत नाहीत, हा प्रश्‍नच आहे. पाणीकपातीमुळे लोकांना टॅंकरमागे धाव घ्यावी लागत आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा विभागाने पूर्वसूचना न देता पाणीपुरवठ्याच्या वेळा बदलल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. तक्रारींकडे लक्ष देत नसल्याने महिलांमध्ये नाराजी वाढली आहे.

ऑगस्टपर्यंतचे पाणी शिल्लक 
पाणी कपात न करता नेहमीप्रमाणे पाणी दिले, तर पुढील ५३ दिवसांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला ०.९५ टीएमसी पाणी लागेल. सध्याच्या पाणीसाठ्यातून आम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणी देऊ शकतो. महापालिकेला नियमित पाणीपुरवठा करू, असे आम्ही महापालिका प्रशासनाला, तसेच लोकप्रतिनिधींना सांगितले आहे. पाणी कपात करण्यास जलसंपदा विभागाने कळविलेले नाही. तो निर्णय महापालिकेने स्वतःहून घेतला आहे, असे जलसंपदा विभागाच्या पवना धरणाचे उपविभागीय अधिकारी नानासाहेब मठकरी यांनी सांगितले.

कामगारनगरी असलेल्या आमच्या भागात अनेकदा तक्रारी व आंदोलने करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. पहाटे तीन वाजता पाणी येते. तेव्हापासून महिलांची वर्दळ सुरू होते. त्यामुळे महिला नाराज आहेत. दिवसाआड पाणीपुरवठ्याने आणखी हाल झाले आहेत. या भागातील जुन्या जलवाहिन्या बदलल्या पाहिजेत.
- विकास भुंबे, गवळीनगर

काही वर्षांपूर्वी सकाळी व सायंकाळी पाणी येत असे. नंतर एकवेळ पाणीपुरवठा सुरू झाला. आता तर दिवसाआड येते. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा साठा असूनही पाणीपुरवठा दिवसाआड का, याचे उत्तर मात्र प्रशासनाकडे नाही. 
- मीलन कांबळे, काळेवाडी

पाणीकपातीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर, अत्यंत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक नळजोडाला विद्युत मोटार लावून जादा पाणी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे मोटार नसलेल्या लोकांच्या पाणीपुरवठ्यावर आणखी परिणाम झाला आहे. कामगारवर्गाला नोकरीच्या वेगवेगळ्या वेळांमुळे पाणी साठविणे कठीण होते आहे. लग्नसराईचा काळ, उन्हाळ्याची तीव्रता यामुळे मागणीच्या तुलनेत खूपच अपुरा पाणीपुरवठा होतो आहे.
- किशोर भंडारी, मोरेवस्ती, चिखली

पाणीकपातीमुळे परिसरातील पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. लोकांनी पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. प्रशासनानेही लवकरात लवकर पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पावले उचलावीत.
- बाळासाहेब भोसले, विद्यानगर, पिंपळे गुरव

पाणीकपात राहीलच

महापौर काळजे; राष्ट्रवादी, शिवसेनेचा विरोध

‘सध्यातरी पाणीकपात रद्द करणार नाही,’’ अशी ठाम भूमिका महापौर नितीन काळजे यांनी घेतली. तर, सत्ताधारी भाजपच्या नियोजनशून्य कारभाराने नागरिकांना निष्कारण वेठीस धरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी महापौर संजोग वाघेरे यांनी केली. शिवसेनेनेही पाणीकपात रद्द करण्याचा आग्रह धरला आहे.

पवना धरणात पुरेसा साठा असून, पाणीकपात रद्द कधी करणार अशी विचारणा केली असता, महापौर काळजे म्हणाले, ‘‘धरणात कोठे पाणीसाठा आहे? पाऊस वेळेवर झाला नाही तर काय करायचे? आता आळंदीलाही पाणी देतो आहे. एक दिवसाआड पाणी व्यवस्थित देण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. त्यामुळे सध्यातरी पाणीकपात रद्द करणार नाही. आता शेवटचाच टप्पा उरला आहे.’’

वाघेरे म्हणाले, ‘‘पाणीकपातीला आमचा विरोध आहे. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर होता. त्या वेळी धरणात १८ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर, जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस येईल, असा अंदाज गृहीत धरून आम्ही पाण्याचे नियोजन केले. शेवटच्या टप्प्यात आम्ही दिवसाआड पाणीपुरवठा केला. धरणात आज तीस टक्के साठा आहे. पाऊसही वेळेवर येण्याचा अंदाज आहे. मात्र, नवीन सत्ताधारी भाजपचा नियोजनशून्य कारभार आहे.

त्यांच्यात अंतर्गत मेळ नाही. आपण काहीतरी करून दाखवायचे, या नादात त्यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना विचारले नाही. नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी यांना विश्‍वासात घेतले नाही. विरोधी पक्षांशी चर्चा केली नाही. थेट पाणी कपातीचा आदेश दिला, त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास होत आहे.’’

शिवसेनेचे शहराध्यक्ष नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले, ‘‘पाणीकपात रद्द करण्याची मागणी आम्ही महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन केली. पावसाने ताण दिला तर काय, असा मुद्दा मांडत सत्ताधारी पक्षाने दोन मे पासून पाणीकपात सुरू केली. पाऊस वेळेवर येणार असे वेधशाळेतर्फे सांगण्यात येत आहे. अशा वेळी पाणी कपात तातडीने रद्द केली पाहिजे.’’

खासदार श्रीरंग बारणे यांनीही पवना धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू करताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यांनीही पाणीकपात तातडीने रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे गेल्या आठवड्यात केली. माजी महापौर मंगला कदम यांनीही महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीकपातीचा मुद्दा उपस्थित केला आणि तातडीने रोज पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्या दोघांनीही अप्रत्यक्षपणे टॅंकर लॉबीवर टीका केली होती. पाणीकपातीसंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना प्रतिक्रिया विचारली असता. ते म्हणाले, ‘‘तो निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापौरांनाच त्याबाबत विचारा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.