आम्ही अजूनही सिग्नललाच आहोत... 

आम्ही अजूनही सिग्नललाच आहोत... 
Updated on

पिंपरी - तुरुंगातून जामिनावर सुटलेला विजय मल्ल्या घरी पोचलादेखील... मात्र, आम्ही अजूनही हिंजवडीमध्ये सिग्नललाच आहोत..., अशी हिंजवडीत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शोकांतिका मांडणारा विनोद सध्या सोशल साइटवरून वेगाने फिरतोय. तसेच, रोज रात्री घरी येणारे ते दोघे कोण? या नातीच्या भाबड्या प्रश्‍नाला हिंजवडीत काम करणारे ते तुझे आई-बाबा आहेत, असे उत्तर देणाऱ्या आजीचा विनोदही सर्वांनाच भावतोय. आतापर्यंत संपूर्ण जगभरात आदराचे स्थान असणाऱ्या हिंजवडीच्या समस्यांवर होणारे हे विनोद अंतर्मुख करायला लावणारे आहेत. त्यात आणखी भर पडण्यापूर्वी शासनाने जागे व्हायला हवे, अशी प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत आहे. 

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हिंजवडी दौऱ्याला आता एक महिना होत आला असतानाही येथील वाहतुकीचा प्रश्‍न "जैसे थे'च असल्याची नाराजीही सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. हिंजवडीतील रखडलेले प्रकल्प, त्यातील अडथळे आणि वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने बापट यांनी 15 सप्टेंबर रोजी हिंजवडी आयटी पार्कचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी बालेवाडी, हिंजवडी, चांदे-नांदे, माण रस्त्यांची पाहणी करून ते त्वरित पूर्ण करण्याचे आदेश संबंधित शासकीय संस्थांना दिले होते. त्याबरोबरच दर महिन्याला बैठक घेऊन कामाचा आढावा घेणार असल्याचेही जाहीर केले होते. बापट यांच्या या भूमिकेमुळे आयटीयन्ससह स्थानिकही सुखावले होते. पालकमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे येथील किमान वाहतुकीचे प्रश्‍न सुटतील, अशी आशा पल्लवित झाली होती. तथापि, एक महिन्यात वाहतूक प्रश्‍नात कोणताही फरक पडला नाही. उलट परिस्थिती अधिकच बिकट झाली. दोन आठवड्यांपूर्वी याच समस्येने एका आयटी तरुणीचा बळी घेतला. मात्र, मख्ख प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली. किरकोळ घटनांची गणतीच नसल्याचे आनंद बुचडे यांनी सांगितले. 

अमेय लढ्ढा म्हणाले, ""वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या विप्रो सर्कलचा व्यास कमी करण्यात आला. मात्र, याच सर्कलजवळ डंपरखाली आल्याने तरुणीचा बळी गेला. मुळात येथील म्हणजेच हिंजवडी मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. त्याला पर्याय असणाऱ्या रस्त्यांचा विकास व्हावा, यासाठी पालकमंत्र्यांनी दौरा केला होता. मात्र, अद्यापही समस्या कायम आहेत. त्यासाठी भरीव मोहीम हाती घेणे आवश्‍यक आहे.'' 

""हिंजवडीवर विनोद तयार व्हावेत, इतके या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. या विनोदातून का होईना, आयटीयन्सच्या समस्या सर्वांपर्यंत पोचत आहेत. या समस्यांचे गांभीर्य शासनालाही कळावे, इतकीच आमची माफक अपेक्षा आहे,'' असे मत अजय पाटील यांनी व्यक्त केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.