पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे २०१६ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान दिंडीप्रमुखांना देण्यात आलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले होते. या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला म्हणून त्या वेळी विरोधी पक्षात असणाऱ्या सीमा सावळे, आशा शेडगे यांनी अनेक तक्रारी आणि आरोप प्रत्यारोप केले होते. दरम्यान, महापालिकेने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. त्यांनी अहवाल २० ऑगस्ट २०१६ रोजी दिला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. त्यानंतर पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना वस्तूस्वरूपात भेट देण्याऐवजी पालखी सोहळ्यासाठी ताडपत्री खरेदी आणि स्वच्छतागृहाची सेवा पुरवण्यासाठी पोर्टेबल टॉयलेट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेने पत्र काढले होते. दरम्यान, महापालिकेने अल्प कालावधीची निविदा काढली आणि त्याला अल्प कालावधीची मुदतवाढ दिली.
विशिष्ट ठेकेदारांना समोर ठेवून ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात पाच जणांनी सहभाग घेतला होता. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामाला असताना त्या ठिकाणी ३९१ पोर्टेबल टॉयलेट लावण्यात आल्याचे भासविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी ही टॉयलेट नव्हती, असे असताना स्थायी समिती सभापती आणि सर्वपक्षीय सदस्यांनी ऐनवेळचा विषय म्हणून या कामासाठी सात लाख ५५ हजार ४० रुपये मंजूर केले.
सध्या सत्तेत असणारी मंडळी विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचाराविरोधात ओरडत होती. या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी भापकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.