विकासकामांवर भर

Pimpri-Municipal-Budget
Pimpri-Municipal-Budget
Updated on

पिंपरी - सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य, नवीन उड्डाण पूल व ग्रेड सेपरेटरचे नियोजन, पाणीगळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना, कचरा व सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारणी याबरोबर स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान ही कामे गतिमान करण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०१८-१९चा अर्थसंकल्प सादर करताना गुरुवारी स्पष्ट केले. हा अर्थसंकल्प ५२३५ कोटी २३ लाख रुपयांचा असून, त्यात वर्षअखेरीला ४२ कोटी रुपये शिल्लक दाखविण्यात आली आहे. यंदाचा अर्थसंकल्प २०१७-१८ च्या तुलनेत ८५ कोटी रुपयांनी जास्त आहे.

आयुक्तांनी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. आगामी वर्षातील महत्त्वाचे प्रकल्प, गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेले प्रकल्प यांची माहिती त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली. महापालिकेला मिळणारे उत्पन्न, अपेक्षित खर्च यांचा गोषवारा त्यांनी सांगितला. 

५,२३५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प
८५ कोटी रुपयांनी जास्त
४२ कोटी रुपये शिल्लक
मेट्रोसाठी ५० कोटी
अपेक्षित उत्पन्न ३५०६ कोटी 

जेंडर बजेट
जेंडर बजेटमध्ये महिलांच्या विविध योजनांसाठी ३३ कोटी, तर अपंग कल्याणकारी योजनेसाठी वीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पिंपरीमध्ये निःसमर्थ अंध- अपंगासाठी पाच कोटी रुपये खर्चून सांस्कृतिक केंद्र बांधण्यात येणार आहे.

मेट्रोसाठी ५० कोटी
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ९२ कोटी रुपये, अमृत योजनेसाठी ५९ कोटी रुपये, स्वच्छ भारत अभियानासाठी २८ कोटी रुपये, तसेच स्मार्ट सिटीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेचा हिस्सा म्हणून ५० कोटी रुपये ठेवले असून, पुढील वर्षी आणखी ५० कोटी रुपये ठेवण्यात येणार आहेत.

पीएमपीएमएलसाठी १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेचे २०१८-१९चे अपेक्षित उत्पन्न ३५०६ कोटी रुपये धरण्यात आले आहे. त्यामध्ये स्थानिक संस्था करापोटी १५९३ कोटी रुपये, करसंकलनापोटी ४६५ कोटी आणि बांधकाम परवानगीतून ३५० कोटी रुपये मिळतील. खर्चाच्या बाजूला महसुली खर्च १६७२ कोटी रुपये आणि भांडवली खर्च २६६५ कोटी रुपये गृहीत धरण्यात आला आहे. भांडवली खर्चामध्ये सर्वाधिक तरतूद स्थापत्यसाठी ७७० कोटी रुपये केली आहे. भूसंपादनासाठी १४० कोटी, विद्युत विभागाच्या कामासाठी ६७ कोटी, जलनिस्सारणासाठी ७९ कोटी, पाणीपुरवठ्यासाठी ४१ कोटी, पाणीपुरवठ्यासाठी विशेष विकास निधी म्हणून २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

सुटसुटीत अर्थसंकल्प
अर्थसंकल्प तयार करीत असताना कामांची नेमकी यादी करण्यावर भर देण्यात आला. ‘टोकन’ रक्कम ठेवलेली कामे कमीत कमी निवडण्यावर लक्ष दिले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या पुस्तकाची दरवर्षीच्या तुलनेत २५० पाने कमी झाली. प्रत्येक पानावर सरासरी १५ तरतुदी असतात. म्हणजे सुमारे पावणेचार हजार तरतुदी यंदा कमी झाल्या. त्यामुळे अर्थसंकल्प सुटसुटीत आणि वास्तववादी झाला आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.  ते म्हणाले, ‘‘दरवर्षीच्या अर्थसंकल्पात कामांची यादी खूप मोठी असायची. ती सर्व कामे होत नसत. त्यामुळे अर्थसंकल्प नियंत्रित करण्याचे ठरविले. नेमकी कामे निश्‍चित करून त्यासाठी तरतूद ठेवली. दोन-तीन वर्षांत पूर्ण होणाऱ्या कामांसाठी येत्या वर्षभरात आवश्‍यक असणाऱ्या रकमेचीच तरतूद केली. प्रयत्नपूर्ण टोकन तरतुदी रद्द केल्या. पुढील वर्षी सुरू होण्याची शक्‍यता असलेल्या काही मोजक्‍या कामांसाठी टोकन तरतूद ठेवली. त्यामुळे अर्थसंकल्प सुटसुटीत झाला. अधिकाऱ्यांसमोर वर्षभराच्या कामाचा ॲक्‍शन प्लॅन राहील.’’

नवीन तरतुदी
सातवी ते दहावीच्या महापालिका शाळांतील मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप
दहा वर्षे झालेल्या बचत गटांना अर्थसाह्य
महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण
महिलांना व्यवसायासाठी टॅक्‍सी घेण्यासाठी बॅंक कर्ज रकमेवर अनुदान 

निधीमध्ये वाढ
दहावी व बारावी परीक्षेतील बक्षीस योजनेतील गुणांची टक्केवारी ८५ वरून ८० टक्के. दहावीसाठी बक्षीस दहा हजार, बारावीसाठी १५ हजार
एड्‌सबाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या वार्षिक अर्थसाह्यामध्ये २४ हजारांवरून ३० हजार रुपये वाढ
निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
एचआयव्ही, एड्‌सबाधित व्यक्तींना पीएमपीचे पास मोफत

अर्थसंकल्पातील विभागनिहाय तरतुदी 
स्थापत्य-वाहतूक व्यवस्था 

एकूण तरतूद ७३७.५४ कोटी
चिंचवड-थेरगाव यांना जोडण्यासाठी प्रभाग क्र. ५० येथील प्रसूनधामजवळ पूल 
भक्ती-शक्ती चौकातील ग्रेडसेपरेटर व उड्डाण पूल, किवळे-मुकाई चौक येथील रेल्वे पूल 
रहाटणी येथील कोकणे चौक ते काळेवाडी फाटा चौकापर्यंतच्या ३० मीटर रुंदीच्या उच्चक्षमता द्रूतगती मार्ग (एचसीएमटीआर) विकसित करण्यासाठी १६ कोटी रुपये

पाणीपुरवठा विभाग 
एकूण तरतूद ४१.७७
दिघी, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, लक्ष्मणनगर, थेरगाव-गावठाण येथे उंच टाक्‍या (ईएसआर)
अमृत योजनेअंतर्गत, पुनावळे, काळाखडक, निगडी, पिंपळे सौदागर, जाधववाडी, चिखली आदी ठिकाणी ९ उंच टाक्‍या (ईएसआर) व जमिनीवरील २ टाक्‍या (जीएसआर)
विविध व्यासाच्या जलवाहिन्यांमुळे हिशेबबाह्य पाण्याचे प्रमाण १० टक्‍क्‍यांपर्यंत कमी होणार

जलनिस्सारण विभाग
एकूण तरतूद ७९.६१
पिंपळे निलख येथे १५ एमएलडी, चिखली येथे १० एमएलडी, बोपखेल येथे ५ एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र
समाविष्ट गावांत ४८ किमी नवीन मलनिस्सारण नलिका
सांडपाणी शुद्धीकरण ८९ टक्‍क्‍यांवरून ९१ टक्के इतके होणार 

नदी सुधार प्रकल्प
पवना, इंद्रायणी नद्या प्रदूषणमुक्त करणे, सुशोभीकरणासाठी नद्यांचे सर्वेक्षण, प्रकल्प सल्लागाराची नेमणूक
मुळा नदीकाठ सुधारणेसाठी पुणे पालिकेसोबत संयुक्त कार्यवाही

ई-गव्हर्नन्स/ ई ऑफिसेस
संगणक साहित्य खरेदी, महत्त्वाच्या कागदपत्रे, नस्ती, नकाशे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन करणे
ऑनलाइन कामकाजासाठी पालिका कार्यालये ‘इंटरनेट बॅंडविथ’ आणि ‘लोकल लूप चार्जर’ने जोडणार 
सारथी हेल्पलाइन सुविधा पुरविणे, देखभाल-दुरुस्ती 

सिटी ट्रान्स्फॉर्मेशन ऑफिस 
एकूण तरतूद ४.५० कोटी
केंद्र व राज्य सरकारचे विविध प्रकल्प वेळेत मार्गी लावण्यासाठी ‘सिटी ट्रान्स्फॉर्मेशन ऑफिस’ हा नवीन विभाग
या अंतर्गत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार संस्थेची मदत घेतली जाणार

उद्याने-वृक्ष संवर्धन 
एकूण तरतूद ७८.६० कोटी
पुनावळे, पिंपळे निलख, चऱ्होलीसह एकूण १३ उद्यानांचे १९ एकर क्षेत्र नव्याने विकसित होणार
राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे गुरव दुबईच्या मिरॅकल उद्यानाच्या धर्तीवर विकास सुरू. जोग महाराज उद्यान, सर्पोद्यान, पक्षालयांचेही नूतनीकरण
कोकणे चौक परिसरातील ३.५ हेक्‍टर जागेत लिनियर उद्यान
चालू वर्षी ५० हजार वृक्षारोपणांचे उद्दिष्ट
मोरया गोसावी मंदिर परिसरात ध्वनी व प्रकाश योजना, मंगलमूर्ती वाडा ते थेरगाव बोटक्‍लबपर्यंतच्या परिसराचे सुशोभीकरण, बोट क्‍लब ते बास्केटपुलापर्यंतच्या पवना नदीकाठचे सुशोभीकरण

नगर रचना व विकास विभाग 
एकूण तरतूद १४० कोटी
भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक, रावेत पर्यंतच्या ४५ मीटर फीडर रस्त्याचे भूसंपादन करणे
नाशिक महामार्गावरील मोशी शिव ते इंद्रायणी नदीपर्यंतच्या उर्वरित भागांचे भूसंपादन
जुन्या हद्दीतील विकास योजना दुसऱ्यांदा सुधारित होणार. मूळ नकाशे आणि विद्यमान जमीन वापर (ईएलयू) नकाशे तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण 

आरोग्य 
एकूण तरतूद २५६ कोटी
कचरा अलगीकरण निर्मितीच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यावर भर
अलगीकरणासाठी नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी स्वतंत्र पथक 
नागरिकांना शासकीय अनुदान योजनेतून घरगुती शौचालयांची सुविधा
आवश्‍यक प्रमाणात सामूदायिक व सार्वजनिक स्वच्छता सोय करणे, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा 

वैद्यकीय विभाग
एकूण १५७ कोटींची तरतूद 
थेरगाव, बापूजीनगर येथील रुग्णालयासाठी २२ कोटी 
मासुळकर कॉलनी येथे आरोग्य केंद्र, नेत्र रुग्णालय आणि निवासी डॉक्‍टरांचे वसतिगृह बांधण्यासाठी ८.६८ कोटी रुपये.

महिला बालकल्याण योजना
एकूण ३३ कोटींची तरतूद
मुलींच्या गुणवत्ता वाढीसाठीच्या अर्थसाह्य निधीत तीन हजार रुपयांची वाढ. एकूण सहा हजार रुपये अर्थसाह्य
बारावीनंतरच्या अर्थसाह्य १५ हजारांवरून २५ हजार
परदेशातील उच्चशिक्षणासाठीचे अर्थसाह्य एक लाखावरून दीड लाख 
विधवा, घटस्फोटित महिलांना घरगुती व्यवसायासाठी दहा हजार
मुलगी दत्तक घेणाऱ्या दांपत्यासाठी २५ हजार अर्थसाह्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.