पिंपरी - वाकड फाटा वाय जंक्शन, जगताप डेअरी- साई चौक, सुदर्शननगर आणि गोविंद चौकापाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता कस्पटे चौक ते हिंजवडी रस्त्यावर लक्ष केंद्रित करावे, असा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवण्यात आला आहे. त्याअंतर्गत सुमारे अडीच किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या पुलामुळे या वर्षी पुलाचे काम मार्गी लागले, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हिंजवडी आयटी हबपाठोपाठ अत्यंत वेगाने विकसित झालेल्या कस्पटे वस्ती, वाकड परिसराला सध्या वाहतूक समस्येने ग्रासले आहे. वाहनांच्या लांब लागणाऱ्या रांगा, वाहतुकीचा खोळंबा, वाहनचालकांमध्ये उडणारे खटके, अपघात हे येथील रोजचे चित्र. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकही हैराण झाले आहेत. वाहनांची वाढती संख्या, तुलनेने तोकडे, अरुंद रस्ते यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
त्यावर उपाय म्हणून महापालिकेने उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटरसारखे प्रकल्प हाती घेतले आहे. त्या अंतर्गत वाकड फाटा वाय जंक्शन येथील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जगताप डेअरी-साई चौकातील उड्डाण पूल व भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पिंपळे सौदागरकरांची वाहतूक समस्येतून सुटका करण्यासाठी सुदर्शननगर चौकामध्ये ग्रेड सेपरेटरसह गोविंद चौकात भुयारी मार्ग विकसित करण्यात येणार आहे. भविष्यकालीन दृष्टिकोन ठेवून विकासकामे करण्यावर भर दिला जात आहे. त्यात आता कस्पटे वस्ती ते हिंजवडी उड्डाण पुलाची भर पडण्याची शक्यता असून त्यातून नागरिकांची वाहतुकीच्या समस्येतून सुटका होणार आहे.
‘आयटी’ला कनेक्टिविटी
नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले, ‘‘तत्कालीन महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांच्या कार्यकाळापासून हा प्रकल्प विचाराधीन होता. अखेर चार महिन्यांपूर्वी त्याची आखणी सुरू झाली. शहरातील अनेक तज्ज्ञ मंडळींनी एकत्र येऊन या प्रकल्पाची आखणी केली आहे. त्याचे सादरीकरण स्थायी समिती सभेमध्ये केले आहे. त्यासाठी अंदाजे चारशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुलाची गरज ओळखून त्याचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षभरात प्रकल्पाचा मार्ग मोकळा होऊन २०२२ पर्यंत त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे. हैदराबाद आयटी सिटीला अशाप्रकारच्या उड्डाण पुलांच्या माध्यमातून कनेक्टिविटी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर हा उड्डाण पूल विकसित करण्यात येऊन वाकड रोड सिग्नलमुक्त होईल. मात्र, अंतिम निर्णय होईपर्यंत प्रकल्पामध्ये अनेक बदल होऊ शकतील.’’
पुलाची वैशिष्ट्ये
लांबी : २.५ किलोमीटर
रुंदी : १७.२ मीटर
भुयारी मार्ग : जंक्शनच्या ठिकाणी
रॅंप : पुलावरून उतरण्यासाठी
पुलाचे टप्पे (जंक्शन)
सावित्रीबाई फुले उद्यान चौक (कस्पटे चौक)
मानकर चौक
शौर्य हॉटेल
वाकड चौक
राजीव गांधी उड्डाण पूल (पुणे-मुंबई महामार्ग)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.