शिवाजीराव आढळरावांची मोर्चेबांधणी 

शिवाजीराव आढळरावांची मोर्चेबांधणी 
Updated on

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामांचे श्रेय एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळू नये, या उद्देशाने शिवसेनेच्या खासदारांनीही महापालिकेच्या, तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या विकासकामांमध्ये लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील रस्सीखेच तीव्र होत असल्याचे गेल्या महिनाभरात जाणवू लागले आहे. 

भाजपने देशपातळीवर लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे बिगूल फुंकले आहे. त्यातच महाराष्ट्रात शिवसेनेचे अनेक खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या भाजपच्या गोटातून चर्चिल्या गेल्या. पिंपरी-चिंचवड परिसरात आढळराव भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी कुजबूज सुरू होत असतानाच, दुसऱ्या बाजूला त्यांना पक्षात घेऊ नका, भाजपची ताकद वाढली असून, महेश लांडगे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे, अशीही चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली. 

या पार्श्‍वभूमीवर "मी शिवसेनेतच राहणार आणि पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवून विजयी होणार,' असा खुलासा करत आढळराव यांनी शिवसेनेचे पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि आढळराव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून, शहरातील संघटनात्मक बदल येत्या महिनाभरात होण्याची शक्‍यता आहे. ठाकरे येत्या सोमवारी राज्यातील पक्षाचे खासदार आणि आमदार यांच्याशी पक्षाच्या आगामी व्यूहरचनेबाबत चर्चा करणार आहेत. 

लांडगे यांचे समर्थक नितीन काळजे महापौर आहेत, तर याच भोसरी मतदारसंघातील एकनाथ पवार महापालिकेत सभागृह नेते आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत या मतदारसंघातील रस्ता रुंदीकरणाचे, भूसंपादनाचे प्रस्ताव मार्गी लागले. महापालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासकामे या वर्षात सुरू करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही गेल्या महिन्यात भोसरी मतदारसंघात आले होते. त्यांनी महापालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ व उद्‌घाटने केली. 

भाजपच्या या खेळीला शह देण्यासाठी आढळराव यांनीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत अनेक विकासकामांबाबत चर्चा केली. गेली पाच-सहा वर्षे पाठपुरावा केल्याने अनेक कामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी उतरल्यास रंगत वाढणार  
भाजप-शिवसेना युतीने गेली लोकसभा निवडणूक लढविली, तर विधानसभेत ते दोघेही समोरासमोर लढले होते. आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी करताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडगे प्रतिनिधित्व करत असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघावरच लक्ष केंद्रित केल्याचे जाणवते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांतील रस्सीखेच जोरात सुरू झाली असून, त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस उतरल्यास, या तिरंगी लढतीला आणखी रंग चढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.