चिखली - गुन्हा केला म्हणून पोलिस ठाण्यात आणलेला आरोपी असो नियम तोडला म्हणून वाहतूक पोलिसाने पकडलेला वाहनचालक असो, यांना राजकीय ‘पाठीराखा’ असतो. त्यामुळे पोलिसांच्या कामांत हस्तक्षेप नित्याचाच झाला आहे. आपण गुन्हा केला असल्याचे माहीत असताना; तसेच नियम तोडून अरेरावीची भाषा वापरणारे बेशिस्त वाहनचालक महिला पोलिसांना अरेरावीची भाषा करतात. कार्यकर्त्यांची चूक असताना तोऱ्यात हे पाठीराखे ‘त्यांना सोडून द्या’ असे सांगून गुन्हेगारीला बळ देतात.
प्रसंग १ - आकुर्डी खंडोबामाळ चौक-थरमॅक्स
चौकाकडून आकुर्डीकडे जाणारी दोन टवाळखोर येतात. किंचाळ्या ठोकत सिग्नल तोडून पोलिसांसमोरून सरळ जातात; परंतु निगडीकडे जाणारी वाहतूक सुरू झाल्याने त्यांना चौकात थांबावे लागते. तेवढ्यात वाहतूक नियंत्रण करणारी महिला पोलिस त्याच्याजवळ जात वाहन परवाना मागते. वाहन परवाना कशासाठी हवाय? म्हणून वाहतूक पोलिसांना उलट प्रश्न विचारला जातो. सिग्नल तोडणे गुन्हा आहे. तुम्ही नियम मोडला आहे.
दोनशे रुपये दंड भरावा लागेल, असे वाहतूक पोलिस सांगते. मग तो टवाळखोर वाहन परवाना देतो. मात्र, दंड भरण्यास नकार देतो. त्याची फोनाफोनी सुरू होते. एका नगरसेवकाला फोन लावतो. वाहतूक पोलिसास त्याच्या नेत्यांशी बोला असे सांगतो. मात्र, वाहतूक फोन घेण्यास नकार देते; मग वाहतूक पोलिसाचा नंबर शोधून त्यांनाच फोन येतो. माझे कार्यकर्ते आहेत. चूक झाली असेल तर माफ करा. एवढ्या वेळेस सोडून द्या, असा विनंतीवजा फोन येतो. मग त्या वाहतूक पोलिसांचाही नाईलाज होतो.
प्रसंग २ - चिखलीतील घरकुल परिसर
काही टारगट मुले घरकुल परिसरातील चौकात बसून येणाऱ्या-जाणाऱ्या महिला व मुलींकडे पाहून अश्लील चाळे करून शेरेबाजी करतात. एक महिला या प्रकाराबाबत निगडी पोलिसांना फोनवरून माहिती देते. काही वेळातच पोलिस पोचतात. टारगट मुलांना रंगेहात पकडतात. बहुतेक मुलं अल्पवयीन असल्याने समज देण्यासाठी त्यांना ताब्यात घेतात. मात्र, टारगट मुलांचे आई-वडीलच मध्ये येतात. मुले वाम मार्गाला लागण्यापासून रोखण्याऐवजी ‘आमच्या मुलांनी कोठे बसायचे? काय करायचे? हे आता पोलिस शिकवणार का?’ असा उलटा सवाल पोलिसांना मुलांची आई करते. आमची मोठी राजकीय ओळख असल्याचे पोलिसांना सांगायला त्या विसरत नाहीत. मुलांना गैरवर्तन करण्यापासून रोखण्याऐवजी, त्यांना आई-वडीलच पाठीशी घालत असल्याचे पाहून पोलिसांनीच कपाळावर हात मारून घेतला.
प्रसंग ३ - चिखली गावठाण
चारचाकी वाहनचालक, परंतु वाहनपरवाना नाही, गाडीला फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचा पहिलवान गडी, चिखली चौकातून जाताना वाहतूक पोलिस पकडतात. पोलिसांनी पकडताच वाहनचालक एका नेत्याला फोन लावतो. वाहनाला काळ्या काचा, फॅन्सी नंबरप्लेट लावून आणि वाहन परवान्याशिवाय वाहन चालवणे हा आपला हक्कच आहे, अशा थाटात तो समोरच्या पुढाऱ्याला फोनवर बोलतो. आपल्याला पोलिस वारंवार पकडतात. त्यांना समजावून सांगा. नाहीतर त्यांची इतरत्र बदली करा, असेही तो सांगतो. दरम्यान, तो पुढारी शहानपण दाखवून ‘पोलिसांना मोबाईल दे’ असे सांगतो. दोनशे रुपयांची पावती घ्या आणि त्याला सोडा असे सांगतो. आपला नेताही दंडाशिवाय सोडू न शकल्याने तावातावाने बोलणारा तो गडी नरमतो. दंड भरून निघून जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.