पिंपरी - एसटी कामगारांच्या संपामुळे वल्लभनगर आगारामधून राज्यातील विविध मार्गावर सकाळपासून एकही बसगाडी धावली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तिकिटाचे आगाऊ नोंदणीचे पैसे प्रवाशांना परत देण्याची एसटी प्रशासनावर वेळ आली.
वल्लभनगर एसटी आगारातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आदी भागांत दररोज बस सोडल्या जातात; परंतु संपामुळे गाड्यांची ये-जा ठप्प पडली. सकाळी स्थानकात प्रवाशांची थोडीफार गर्दी होती. परंतु, संप सुरू असल्याचे समजताच प्रवाशांनी खासगी गाड्यांतून प्रवास करणे पसंत केले. मुंबई, नाशिक, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामधून रात्री मुक्कामी सुमारे 100 गाड्या त्या-त्या आगारांना परत पाठविल्या.
आगार व्यवस्थापक एस. एन. भोसले म्हणाले, ""संपामुळे एकही बस धावली नाही. चालक-वाहकांबरोबरच तांत्रिक शाळेतील कामगारही कामावर रुजू झाले नाहीत.''
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पिंपरी-चिंचवड आगार सचिव गणेश मांदळे म्हणाले, ""सरकारने जाहीर केलेली 4 हजार 849 कोटींची वेतनवाढीची घोषणा एकतर्फी आहे. ती फसवी असून, असमाधानकारक आहे. वेतनवाढ देतानाच तिला मान्यता असल्याचे संमतीपत्र कामगारांकडून लिहून घेतले जात आहे. तसे पत्र न दिल्यास कामगारांचे राजीनामे घेण्याची धमकी प्रशासनाने दिली आहे. जादा वेतनवाढ हवी असल्यास कंत्राटी कामगार म्हणून रुजू व्हावे, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे. हे सर्व अन्यायकारक आहे.''
प्रवासी म्हणतात
- के. एच. चौधरी -""मी मुंबईवरून रेल्वेने येथे आलो. मला पंढरपूरला जायचे आहे. संपाची पूर्वकल्पना नव्हती. मात्र, आता संपाचा तोडगा निघतो किंवा नाही याची वाट पाहून नातेवाइकांकडे जाणार आहे.''
- बन्सीलाल तांबोळी -""सोलापूर येथे जायचे आहे. परंतु, अचानक संप झाला आहे. रेल्वेला खूप गर्दी आहे. त्यामुळे आता पाहुण्यांच्या घरी परत जाणार आहे. कामगारांनी संपाबद्दल पूर्वसूचना द्यायला हवी होती.''
- विमल पोतदार -""आजारी भावाला पाहण्यासाठी उमरग्यातून आले होते; परंतु संपामुळे मला आता जावयांच्या घरी मुक्काम करावा लागणार आहे.''
चालक-वाहकांच्या तक्रारी
- गाडीचे नुकसान पगारामधून वसूल
- रजा शिल्लक असूनही अत्यावश्यक रजा मिळत नाहीत
- कर्मचारी गैरहजर राहिल्यास दंड लागू
- उत्पन्न कमी भरल्यास वाहकावर आरोपपत्र
- डिझेल जादा लागल्यास चालकाला पगारातून रक्कम वसूल करण्याबाबत नोटिसा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.