२४६ ठिकाणच्या हॉकर्स झोनमध्ये होणार पुनर्वसन
पिंपरी - शहरातून दहा हजार फेरीवाल्यांनी हॉकर्स झोनसाठी अर्ज केले होते. त्यापैकी आठ हजार ८०९ फेरीवाले पात्र ठरले असून, पाच हजार ९०३ फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या फेरीवाल्यांचे आगामी सहा महिन्यांत २४६ ठिकाणी पुनर्वसन केले जाणार असल्याची माहिती सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी दिली.
शहरातील रस्ते आणि पदपथावर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वाहनांच्या गर्दीतून रस्त्यावरून चालावे लागते. फेरीवाल्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय त्यांच्यावर कारवाई करू नका, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय फेरीवाला धोरण तयार केले असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे. हॉकर्स झोनसाठी यापूर्वीच एक समिती स्थापन करण्यात आली असून, महापालिकेचे आयुक्त हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. पोलिस आयुक्त, उपायुक्त, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगररचना विभागाचे उपसंचालक, औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) कार्यकारी अभियंता, महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
हॉकर्स झोनसाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान दिले जाणार आहे. शहरातील फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्यासाठी महापालिकेने त्यांच्याकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार जवळपास दहा हजार अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले. त्यांची छाननी केली असता त्यापैकी आठ हजार ८०९ फेरीवाले पात्र ठरले. पात्र फेरीवाल्यांचे त्यांच्या व्यवसायाच्या जागेवर बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले. आतापर्यंत पाच हजार ९०३ जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यापैकी ८० टक्के जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शहरातील २४६ जागा निश्चित केल्या आहेत. या जागा चौक, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे यापासून १०० ते १५० मीटर लांब अंतरावर असणार आहेत. हॉकर्स झोनमध्ये विद्युत पुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह आदी सुविधा महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.