भाजप नेत्यांचे विकासाकडे दुर्लक्ष - अजित पवार

भाजप नेत्यांचे विकासाकडे दुर्लक्ष - अजित पवार
Updated on

पिंपरी - ‘‘भाजपची पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता आल्यानंतर त्यांचे नेते स्वतःचे महत्त्व, इगो कसा वाढेल, याकडे लक्ष देत आहेत. शहर भकास करण्याच्या दृष्टीने त्यांची पावले पडत आहेत. जिल्हा, राज्य स्तरावरील कोणी नेते बघत नाहीत. कामाचा स्तर घसरत आहे. कारण, त्याला कोणी वालीच राहिला नाही,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाला. त्या वेळी ते बोलत होते. 

अजित पवार म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडमधील मतदारांनी विचारपूर्वक मतदान केले असते, तर ही वेळ आली नसती. नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड येथे आम्ही चांगले काम केले. पूर्वी या शहराचा वरचा क्रमांक असायचा, तो आता खालच्या स्तरावर गेला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले; पण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे का? निर्णय घेताना आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांना विचारावे लागते. येथील मतदारांनी त्यांच्या हाती सत्ता दिली तरी त्यांना आस्था नाही. येथील प्रश्‍नांचा पाठपुरावा करताना दिसत नाहीत. मंत्रिमंडळात एकही मंत्री यांचे प्रश्‍न मांडत नाहीत.’’

‘‘सत्ता येऊन चार महिने झाले, तर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी गेल्या. केंद्र, राज्य, महापालिकेत यांची सत्ता असताना पवना धरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचा प्रकल्प का सुरू होत नाही. बोपखेल येथून पूल टाकण्यासाठी आम्ही २२ कोटी रुपयांची तरतूद केली. त्यांनी संरक्षण विभागाची परवानगी मिळविली पाहिजे. महापालिकेत मार्चपूर्वी कामे झालेल्यांची बिले दिली पाहिजेत. प्रभाग समित्या झालेल्या नसल्याने पुढील कार्यवाही होत नाही. भाजपचे नवीन नगरसेवक अजून भांबावले आहेत. सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना ते निलंबित करतात, काय तुमची हुकूमशाही आहे का,’’ असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

एकही मुस्लिम मंत्री नाही
अजित पवार म्हणाले, ‘‘अडीच-तीन वर्षे यांची सत्ता येऊनही यांच्या कामावर एखादा घटक समाधानी आहे, असे म्हणता येत नाही. मराठा, मुस्लिम, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत काहीच झाले नाही. मंत्रिमंडळात एकही मुस्लिम मंत्री नाही. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामांचे भूमिपूजन झाले. कामाला अद्यापही सुरवात नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.