पिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवडच्या कोणत्याही रस्त्यावर कोणत्याही वेळी वाहनांचे कर्कश ‘हॉर्न’ ऐकायला मिळतात. शांतता भंग करणाऱ्या आणि शेजारून जाणाऱ्यांच्या काळजात ‘धस्स’ करणाऱ्या ‘हॉर्न’ची विकृती शहरांत वाढीस लागली आहे. याकडे ना पोलिसांचे लक्ष आहे, ना प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओचे. ना महापालिका प्रशासनांना काही देणे-घेणे, ना प्रदूषण नियंत्रण महामंडळाला. विकृत ‘हॉर्न’चा त्रास मात्र, सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या काही प्रातिनिधिक प्रसंगावरून ‘हॉर्न’ची विकृती अधिक अधोरेखित होते. अशा प्रकारांना वेळीच प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
प्रसंग १
स्थळ - पुण्यातील डॉ. आंबेडकर भवन चौक
वेळ - सकाळी नऊची
घटना - लाल सिग्नल लागला म्हणून दुचाकीस्वार ‘स्टॉप लाइन’जवळ थांबला. पाठीमागून आलेल्या अलिशान मोटारचालकाने ‘हॉर्न’ वाजवला. दुचाकीस्वाराने मागे उलटून बघितले. मोटारचालकाने तोंड बाहेरकाढून डाव्या बाजूला वळायचे आहे, असे हातानेच खुणावले. हातातील घड्याळाकडे अंगुलीनिर्देश करीत गाडीची वेळ झाल्याचेही सूचित केले. त्यामुळे दुचाकीस्वाराने दुचाकी थोडी पुढे घेतली. डाव्या बाजूला वळून मोटारचालक सुसाट निघून गेला. त्याच वेळी वाहतूक पोलिस दुचाकीस्वाराजवळ आला. दुचाकी बाजूला घ्यायला लावली. लायसन मागितले. दुचाकीस्वार लायसस पोलिसाकडे देत वस्तुस्थिती सांगू लागला; पण त्याचे काहीही ऐकून न घेता, झेब्रा क्रॉसिंगवर दुचाकी उभी केली म्हणून शंभर रुपये दंड आकारल्याची पावती दुचाकीस्वाराच्या हातात टेकवून पोलिसाने दंडाची रक्कम वसूल केली.
प्रसंग २
स्थळ - विश्रांतवाडी मुख्य चौक
वेळ - दुपारी साडेबारा
घटना - लाल सिग्नल असल्याने दुचाकीस्वार थांबलेला. त्यामागे ऑटोरिक्षा थांबली. रिक्षाचालकाने हॉर्न वाजवला. दुचाकीस्वाराने मागे वळून पाहिले. रिक्षाचालकाने पुटपुटत उजव्या हाताने यू-टर्न घेणार असल्याचे खुणावले. दुचाकीस्वाराने सिग्नलकडे हात दाखवत असमर्थता दर्शवली. रिक्षा चालकाने पुन्हा ‘हॉर्न’ वाजवला. पुढे वाहतूक पोलिस असल्यामुळे दुचाकीस्वाराने रिक्षाचालकाच्या ‘हॉर्न’कडे दुर्लक्ष केले. त्यामुळे चिडलेला रिक्षाचालक रिक्षातून उतरून दुचाकीस्वाराकडे रागारागाने जाऊ लागला. तितक्यात हिरवा सिग्नल मिळाला आणि दुचाकीस्वार पुढे निघून गेला. त्याला उद्देशून शिवी हासळत रिक्षाचालक यू-टर्न घेऊन गेला.
प्रसंग ३
स्थळ - नाशिक फाटा चौक, कासारवाडी
वेळ - रात्री साडेआठ- पावणेनऊची
घटना - पिंपरीकडून पुण्याकडे जाताना पिवळा सिग्नल लागला म्हणून तरुणाने दुचाकीचा वेग कमी केला. त्या वेळी मागून कर्कश हॉर्न वाजवत दुचाकीस्वार तरुण लाल सिग्नलची परवा न करता सुसाट निघून गेले. मात्र, पिवळा सिग्नल पाहून थांबण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वाराला पाठीमागून स्कूटर जोरात धडकली. दुचाकीसह त्यावरील तरुण खाली पडला. दुसऱ्या बाजूला स्कूटर पडली. ती चालविणारे ६०-६५ वर्षीय आजोबा दहा-बारा फुटांपर्यंत फरफटत गेले. त्यांच्या मागे बसलेला तरुणही बाजूला फेकला गेला. वाहतूक पोलिस, वॉर्डन व काही दुचाकीचालक धावून आले. त्यांनी आजोबांना उचलले. त्यांचा चष्मा फुटला होता. छाती व गुढघ्यांना मार लागला होता. त्यांना कोंढव्याला जायचे होते. ‘बाइकवाल्याने ‘हॉर्न’ बजाया इसलिए मेरा बॅलेन्स गया,’ असे आजोबा सांगत होते; पण त्यांचे ऐकायला ‘हॉर्न’ वाजवणारा दुचाकीस्वार तिथे नव्हता.
प्रसंग ४
स्थळ - आळंदी सोसायटीचे प्रवेशद्वार
वेळ - मध्यरात्री दोन-अडीचची
घटना - सोसायटीचे प्रवेशद्वार बंद होते. मात्र, त्याला कुलूप लावलेले नव्हते. रखवालदार इमारतीच्या मागील बाजूस गस्त घालण्यासाठी गेला होता. त्या वेळी मुख्य रस्त्यावरून वळण घेऊन सोसायटीच्या रस्त्याने एक मोटार येऊ लागली. मुख्य रस्त्यावरून वळल्यापासून साधारणतः पाचशे मीटर अंतरापासून मोटारचालक ‘हॉर्न’ वाजवत येत होता. प्रवेशद्वारावर पोचल्यावरही ‘हॉर्न’ वाजविणे सुरूच होते. त्यामुळे प्रवेशद्वारासमोरच्या घरातील व्यक्तीला जाग आली. ‘हार्न’चा रोजचा त्रास आणि झोप मोड झाल्याने खिडकी उघडून ती व्यक्ती काही बोलणार त्याच वेळी दरवाजा उघडून मोटारचालक बाहेर आला. ती व्यक्ती सोसायटीत राहणारी पोलिस अधिकारी होती. ‘काय बोलावे अशा सुशिक्षित माणसाला?’, असे पुटपुटत झोपमोड झालेल्या व्यक्तीने खिडकी लावून घेतली. प्रवेशद्वाराला कुलूप नसल्याने ते बाजूला ढकलून मोटारचालक पोलिस अधिकारी सोसायटीच्या आवारात मोटार घेऊन गेला. त्याच्या ‘हॉर्न’ने मात्र अनेकांची झोपमोड झाली होती.
डॉ. सुधीर भालेराव (नाक-कान-घसा तज्ज्ञ) म्हणतात...
ध्वनिप्रदूषणाचे कानावर थेट परिणाम होतात. कानाच्या नसा कमकुवत होणे, कमी ऐकू येणे, कानाच्या पडद्यास इजा होणे, कानात शिटीसारखे आवाज येणे वगैरे होते. तसेच, शरीरावर व मनावर परिणाम होतो. स्वभाव चिडचिडा होतो. ब्लड प्रेशर वाढते. शांत झोप लागत नाही, कमी होते. जास्त काळ ध्वनिप्रदूषणात राहिल्यास चक्कर येण्यासारखे प्रकार घडतात. ध्वनिप्रदूषणाचे गंभीर परिणाम समोर येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.