पिंपरी - आपण कधी पुण्यात रिक्षाने प्रवास केला तर, मीटरप्रमाणे भाडे द्यावे लागते. पिंपरी-चिंचवड शहरात मात्र रिक्षाचालक सांगेल तेच भाडे द्यावे लागते. पुण्याचे जुळे शहर, औद्योगिक शहर, श्रीमंत महापालिका अशी बिरुदे मिरविणाऱ्या शहरात हा विरोधाभास का, असा प्रश्न निश्चित उपस्थित होत होता. मीटरसक्ती असूनही लागू होत नव्हती. रिक्षाचालक, संघटना, पोलिस, आरटीओ या यंत्रणाही ती लागू करण्यास तयार होत्या. तरीही प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जायचे. आता गुरुवारपासून (ता. १४) मीटरसक्तीची कडक अमंलबजावणी पोलिसांनी सुरू केली आहे.
मीटरप्रमाणे भाडे आकारणी बंधनकारक आहे. मात्र रिक्षाचालक त्यास नकार देत असेल तर प्रवाशांनी जवळच्या वाहतूक विभागात जाऊन तक्रार करावी. संबंधित रिक्षाचालकांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल.
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक
रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणेच भाडे आकारणे आवश्यक आहे. याची अंमलबजावणी पाहण्यासाठी वाहतूक पोलिस व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम हाती घेणार आहे. यात रिक्षाचालक दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
प्रवासी नाकारणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यास गुरुवारपासून सुरवात केली. साध्या वेशातील पोलिस कारवाई करीत आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे.
- डी. व्ही. पवार, पोलिस निरीक्षक-निगडी वाहतूक विभाग
शहरात मीटरप्रमाणे भाडे आकारणी करण्यास आम्ही तयार आहोत. जे रिक्षाचालक कायद्याचे पालन करतात त्यांना पोलिसांनी नाहक त्रास देऊ नये. बेकायदा वाहतुकीविरोधात आम्ही आहोत.
- बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत
मीटरप्रमाणे भाडे आकारणी करण्यास आम्ही तयार आहोत. आजही एखाद्या प्रवाशाने मीटरची मागणी केल्यास आम्ही त्याप्रमाणे आकारणी करतो. मात्र प्रवाशांचाच मीटरला विरोध आहे.’’
- अशोक मिरगे, शहराध्यक्ष, रिक्षा पंचायत
मीटर सक्ती आवश्यक असून, आमच्या क्रांती रिक्षा संघटनेचे सर्व सभासद मीटरप्रमाणे रिक्षा चालवितात. मात्र मीटर सक्तीसोबत बेकायदा रिक्षांवरही पोलिस आणि आरटीओकडून कारवाई होणे आवश्यक आहे.
- श्रीधर काळे, अध्यक्ष, क्रांती रिक्षा सेना
सध्या खासगी कंपन्या टप्पा वाहतुकीच्या क्षेत्रात उतरल्याने स्पर्धा निर्माण झाली आहे. जर रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारणी केली तर उत्पन्नात वाढ होईलच, परंतु स्पर्धेच्या युगात टिकूनही राहता येईल.
- अशोक जोगदंड, रिक्षाचालक, निगडी
प्रवासी शेअर रिक्षाप्रमाणे भाडे आकारण्याचा आग्रह धरतात. मीटरप्रमाणे भाडे आकारल्यास आमच्या उत्पन्नात वाढ होईल. बेकायदा रिक्षांवरही कारवाई करावी.
- अमोल कदम, रिक्षाचालक, पिंपरी
रिक्षाचालकास जाण्याचे ठिकाण सांगितल्यास प्रथम भाडे सांगितले जाते. मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास सांगितल्यास टाळाटाळ केली जाते. तर कधी गॅस भरायला जायचे आहे, असे सांगून नकार दिला जातो.
- नीलम गायकवाड, प्रवासी
ओला, उबेरचे संकट
दुसरीकडे ओला, उबेर या खासगी कॅब कंपन्यांनी टप्पा वाहतूक सुरू केल्यामुळे रिक्षाचालकांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मीटरपद्धती वापरली पाहिजे, असे रिक्षाचालकांना वाटते. मात्र, याची सुरवात कधी आणि कोणी करायची याचीच ते वाट पाहत आहेत.
बेकायदा रिक्षाचालक
एकीकडे खासगी टप्पा वाहतुकीचे आव्हान असताना दुसरीकडे मात्र बेकायदा रिक्षाचालकांचेही मोठे पेव फुटले आहे. वाहतूक पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयदेखील बेकायदा रिक्षाचालकांवर कारवाई करीत नसल्याने रिक्षाचालक आणि त्यांच्या संघटनांमध्ये असंतोष आहे.
पिंपरीतील स्थिती
गेल्या दहा वर्षांत शहराचा मोठा विस्तार
पालिका हद्दीबाहेरील गावांमध्ये दळणवळणाची साधने अपुरी
पूर्वी लोकसंख्या विरळ असल्याने रिक्षाचालकांना परतीचे भाडे मिळत नव्हते, त्यामुळे विनामीटर भाडे आकारणी
तसेच हाफ रिटर्न जादा भाडेही आकारणी
सध्याची परिस्थिती
समाविष्ट गावांमध्ये आता लोकसंख्या वाढली
पुरेशा प्रमाणात भाडे मिळूनही विनामीटरच भाडे आकारणी
गर्दीच्या रस्त्यांवरही तीच परिस्थिती
पीएमपीच्या बसची संख्याही अपुरीच
प्रवाशांना शेअर रिक्षा हाच पर्याय
आग्रह केला तरी विनामीटरच भाडे आकारणी
६००० - पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा परवाने
३००० - अनधिकृत रिक्षांची संख्या
मीटरला नकार दिल्यास येथे करा तक्रार
एखाद्या रिक्षाचालकाने मीटरप्रमाणे येण्यास नकार दिला जर प्रवाशांनी जवळच्या वाहतूक पोलिस चौकीत जाऊन लेखी तक्रार करावी. तक्रार करताना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच रिक्षा क्रमांक, तारीख, परिसर, वेळ याबाबत माहिती द्यावी. अशीच माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कुदळवाडी, चिखली या ठिकाणीही तक्रार करता येईल.
स्वतःच केले शेअरमार्ग
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि रिक्षा संघटना यांनी संयुक्तरीत्या पाहणी करून २०१२ मध्ये शहरात रिक्षांकरिता १६ शेअरमार्ग सुरू केले होते. मात्र त्यानंतर रिक्षाचालकांनी स्वतः नवीन मार्ग सुरू केले. सध्या शहरात ३०हून अधिक शेअर रिक्षांचे मार्ग आहेत.
मीटरचा फायदा प्रवाशांना
सध्या पिंपरी चौक ते काळेवाडी फाटा येथे जाण्यासाठी शेअर रिक्षा चार प्रवाशांकडून प्रत्येकी २० रुपयांप्रमाणे पैसे घेते; तर थेट रिक्षा केल्यास रिक्षाचालक ७० ते ८० रुपये घेतात. मात्र मीटरप्रमाणे गेल्यास अवघ्या ५५ रुपयांमध्ये हा प्रवास होणार आहे. यामुळे प्रवाशांचा फायदा होणार आहे.
मीटरप्रमाणे भाडे आकारल्यास
सीएनजीवरील रिक्षांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर
रिक्षाचालकांची थांब्यावरील मक्तेदारी संपुष्टात येणार
हाफ रिटर्न भाडे न घेतल्याने त्याच भागातून प्रवासी घेता येणार
प्रवाशांचाही प्रवास स्वस्त झाल्याने प्रवासी संख्येत होणार वाढ
खासगी मोटार कंपन्याचा वापर कमी होऊन प्रवासी रिक्षाकडे वळणार
शहरातील काही भागांमध्ये बसची संख्या खूपच कमी असल्याने रिक्षाचा पर्याय निवडावा लागतो. मात्र मनमानी भाडे आकारणीमुळे रिक्षाने जाणे परवडत नाही. मीटरप्रमाणे भाडे घेतल्यास प्रवासी रिक्षांना पसंती देतील.
- विजया राजीवडे, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.