‘रोझलॅंड’चा आदर्श घ्या!

‘रोझलॅंड’चा आदर्श घ्या!
Updated on

रक्षण, रेन वॉटर हार्वेस्टिंगमधून पाणीबचत, तसेच सौरऊर्जा आणि एलईडी दिव्यांमुळे ऊर्जाबचतीचा संदेश देणाऱ्या पिंपळे सौदागर येथील रोझलॅंड हाउसिंग सोसायटीचा आदर्श सर्वांनी घ्यावा. केंद्र सरकारने ‘स्वच्छ’ पुरस्कार देऊन राष्ट्रीय पातळीवर या कार्याची दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (ता. २) गांधी जयंतीला या सोसायटीचा गौरव होतोय. कोणताही वितंडवाद न करता गेल्या दहा वर्षांत सोसायटीच्या सर्व सभासदांनी मिळून आजवर केलेल्या कामाची पोचपावती मिळाली. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी ‘रोझलॅंड’ हे आता एक रोल मॉडेल आहे. अशा पद्धतीने मोठ्या हाउसिंग सोसायट्यांनी कार्यक्रम राबविला, तर पालिकेवरचे अवलंबित्व कमी होईल, प्रशासनावरचा भार कमी होईल. या सोसायट्यांचे तोंडभरून कौतुक केले पाहिजे. पालिकांनी कोरडे अभिनंदन करण्यापेक्षा त्यांना करात सवलत दिली पाहिजे, ते एक प्रोत्साहन ठरेल. रोझलॅंडच्या सर्व सभासदांचे आणि विशेषतः या कामासाठी निरपेक्षपणे राबणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन! 
 
आधुनिक राळेगण, हिवरेबाजार 
रोझलॅंड सोसायटीला आता अण्णा हजारे यांचे आधुनिक राळेगणसिद्धी किंवा पोपट पवार यांचे हिवरेबाजार म्हटल्यास वावगे ठरू नये. पूर्वीचे रहाटणी, पिंपळे-सौदागर म्हणजे एक खेडेगाव. पालिकेत आल्यामुळे प्रशस्त रस्ते, पाणी, भुयारी गटार झाले. गेल्या वीस वर्षांत येथील शेती पार संपली.
टोलेजंग सोसायट्यांची अव्वल नगरी निर्माण झाली. या पंचक्रोशीत एकही झोपडी उभी राहिली नाही. हिंजवडी आयटी पार्कमुळे या भागाचे रूपडेच पालटून गेले. दहा वर्षांपूर्वी २४ एकरावर रोझलॅंड अवतरली. सात मजली ३५ इमारतींमधून हजार कुटुंबांचे टुमदार गाव नावारूपाला आले. त्या वेळी पालिकेचे पाणी कमी पडायचे. पर्याय म्हणून हजार-पाचशे रुपयाप्रमाणे रोजचे दहा टॅंकर पाणी विकत घ्यावे लागत असे. अखेर सोसायटीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग केला. तो चांगलाच यशस्वी झाला. १८ विंधन विहिरी (बोअरवेल) गच्च भरून वाहू लागल्या. आता फक्त पिण्यासाठी पालिकेचे पाणी लागते. दैनंदिन वापरासाठी विंधन विहिरींचे पाणी आहे. टॅंकर कायमचा बंद झाला. दोन हजार देशी झाडे लावली, जोपासली. झाडांवर पक्ष्यांची घरटी टांगली. आता पहाटेच्या वेळी पक्षांचा किलबिलाट असतो. शहरात नव्हे तर निसर्गरम्य अशा गावखेड्यात राहिल्याचा आनंद मिळतो. झाडांचा पालापाचोळा म्हणजे कचरा. पूर्वी तो पालिकेच्या कचरा गाडीत फेकून द्यायचे. आता त्याच कचऱ्यातून दर तीन महिन्यांना एक टन खतनिर्मिती होते. घरातील ओला-सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते. दर सहा महिन्यांना ५००-६०० किलो प्लॅस्टिक कचरा गोळा होतो, तो इंधननिर्मितीसाठी विक्री करून उत्पन्न मिळवले. 

वर्षभरात ‘झिरो गार्बेज’चे या सोसायटीचे टार्गेट आहे. या नगरात आयटी उद्योगाशी संबंधित अभियंत्यांची संख्या मोठी असल्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचा वापर मोठा. त्यातून वर्षाला सुमारे १८०० किलो ई-वेस्ट (कचरा) गोळा होतो. या सर्व वस्तू कमिन्स इंडियाला देऊन त्यावर प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर केला जातो. सोसायटीचा स्वतःचा असा अडीच लाख लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी सोसायटी आवारातील आठ उद्यानांसाठी वापरल्याने पालिकेचे पाणी विकत घेण्याची गरज कमी झाली. ऊर्जाबचतीसाठी सर्वांनी घरात एलईडी दिवे बसवले.

सोसायटीचे पंप सौरऊर्जेवर चालवले. त्यातून दरमहा दीड लाखाची वीजबचत झाली. इतके सर्व केले तरी अजूनही बरेच करायची इच्छा पदाधिकारी व्यक्त करतात. याच पद्धतीने अन्य सोसायट्यांना उभे करण्यासाठी मार्गदर्शन, मदत करण्याची त्यांची तयारी आहे. सोसायटीचे चेअरमन संतोष मस्कर आणि त्यांच्या सर्व टीमला हे कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे.

...हे चित्र असे बदलू शकते
पिंपरी-चिंचवड शहरात दीड हजारावर हाउसिंग सोसायट्या आहेत. तंटा, गैरव्यवहार नसलेली सोसायटी भिंग लावून शोधली तरी सापडणार नाही. सभासदांचे वाद हे सोसायटीच्या निर्मितीपासून असतात. मासिक सभासद वर्गणी देण्यावरून मतभेद असतात. देखभाल-दुरुस्ती वैयक्तिक की सोसायटी खर्चातून याचेही वाद प्रत्येक ठिकाणी दिसतात. बिल्डरबरोबरीचे सलोख्याचे संबंध क्वचित पाहायला मिळतात. लेखापरीक्षण अद्ययावत नसलेल्या तीनशे सोसायट्यांना सहकार उपनिबंधकांनी नोटीस दिली. आता त्यांच्यावर नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अनेक सासोयट्यांमधून बेकायदा अथवा वाढीव बांधकामे झालीत, सुरू आहेत. सोसायटीमधील उद्यान, शाळा अथवा सांस्कृतिक सभागृह, जलतरण तलावासाठी दाखविलेल्या सार्वजनिक वापराच्या जागांवर अतिक्रमणे आहेत. रोझलॅंड या सर्व तंटे बखेड्यातून अगदी मुक्त आहे. त्याचे सर्व श्रेय त्यांच्या सभासदांना आहे. हजार कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदतात. लोकशाही पद्धतीने कारभार चालतो. पै पैशाचा हिशेब एकदम चोख आहे. समस्यांवर मात करण्याची रोझलॅंडची पद्धत सार्वत्रिक झाली पाहिजे. त्यातून अशीच सुख, शांती, समृद्धी सर्व ठिकाणी येईल. हेच चित्र अन्य सर्व सोसायट्यांतून सहज शक्‍य आहे. रोझलॅंडच्या पुरस्काराचा तोच संदेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.