पिंपरी : पिंपळे सौदागर येथील रोझलॅंड हाउसिंग सोसायटीला स्वच्छ भारत दिवस आणि राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर हा पुरस्कार सुरू केला आहे. गांधी जयंतीदिनी (ता. 2 ऑक्टोबर) दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे.
स्वच्छ भारत अभियानाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्राने या अभियानात सहभाग घेणाऱ्या संस्था, संघटना, सोसायट्यांचे अहवाल मागविले होते. त्यानुसार, रोझलॅंड सोसायटीने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारला 70 पानी अहवाल दिला होता. तसेच उपक्रमांविषयीची चित्रफीतही दिली होती. चित्रफीत व अहवाल राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला. या अहवालाच्या अभ्यासाअंती केंद्राने संपूर्ण भारतातून 'इनोव्हेटिव्ह आयडियाज अँड प्रॅक्टिसेस अंडर आरडब्ल्यूएच' या प्रकारात रोझलॅंडची निवड केली. त्याबाबतचे लेखी पत्र ऑफिस ऑफ नॅशनल मिशन संचालनालयाकडून बुधवारी (ता. 28) सोसायटीला प्राप्त झाले, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष संतोष मस्कर यांनी दिली.
सोसायटीच्या उपक्रमांची दखल सरकारने घेतली आणि पुरस्काराने पोचपावती दिली. उपक्रमांसाठी सिद्धार्थ नाईक आणि आनंद दफ्तरदार यांनी विशेष मेहनत घेतली.
- संतोष मस्कर, अध्यक्ष, रोझलॅंड सोसायटी.
'सकाळ'चे प्रोत्साहन
''सोसायटीने राबविलेल्या सर्व उपक्रमांना 'सकाळ'ने दिलेल्या प्रसिद्धीमुळे सदस्यांना प्रोत्साहन मिळाले. या माध्यमातून विविध स्तरांवरून त्याची दखल घेतली गेली. त्यामुळे सोसायटीच्या यशामध्ये 'सकाळ'चाही वाटा आहे,'' अशी भावना मस्कर यांनी व्यक्त केली. सोसायटीच्या ओल्या कचऱ्यापासून (पालापाचोळा) खतनिर्मिती प्रकल्पाची दखल घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्या कचरा वर्गीकरण मोहिमेचा प्रारंभ रोझलॅंडमधून केला होता.
दहा वर्षांत एकदाही टॅंकर नाही
सातमजली 35 इमारतींमधून एक हजार कुटुंबे राहत असलेल्या या सोसायटीने सर्वप्रथम 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' योजना राबविली. त्यामुळे दहा वर्षांत एकदाही पाण्याचा टॅंकर मागविण्याची वेळ आली नाही. सोसायटी परिसरात 18 बोअरवेल घेतल्या. त्यापैकी फक्त सातचा वापर दैनंदिन पाणीवापरासाठी केला जातो. उर्वरित बोअरवेलमध्ये पावसाचे पाणी जिरवले जाते. पिण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी वीस मिनिटे महापालिकेचे पाणी लागते. त्यामुळे पाण्याची मोठी बचत होते.
उद्यानासाठी सांडपाण्याचा पुनर्वापर
सोसायटीत अडीच लाख लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या स्वच्छ पाण्यापैकी 80 हजार लिटर पाण्याचा वापर सोसायटीतील आठ उद्यानांसाठी केला जातो. उर्वरित प्रक्रिया केलेले स्वच्छ पाणी नंतर महापालिकेच्या नाल्यात सोडले जाते. या प्रकल्पामुळे जमिनीतून होणारा पाण्याचा उपसा कमी झाला. या कामासाठीही सोसायटीचा गौरव झाला आहे.
|