बारामती : 'राज्यात पाऊस होण्यासंबंधीचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरल्यास तोंडात बारामतीची साखर घालेन,' असे ज्येष्ठ नेते शरद पवार शनिवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले आणि शनिवारी रात्रीपासूनच सर्वदूर पाऊस सुरू झाला. अर्थात, शारदानगर येथे बोलताना पवार यांनी, 'मी एखादा विषय मांडला, तर त्याला बहुतेक विरोध होत नाही,' असे सांगितले होते. रविवारी दिवसभर पावसाबरोबरच सोशल मीडियावर या गोष्टीचीही चर्चा रंगली होती.
'पवारसाहेबांनी बारामतीच्या साखरेचे आमिष काय दाखविले, पाऊस लगेच पडला,' यासह 'पवारसाहेबांचा दरारा पावसालाही' अशा प्रकारच्या अनेक पोस्ट रविवारी सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. बारामतीत शनिवारी पवार यांनी केंद्र सरकारमधील एका निर्णयासंदर्भात पंतप्रधानांना भेटणार असल्याचे सांगत अशा निर्णयांबाबत जेव्हा मी चर्चा करतो, त्या वेळी बहुतेक त्याला विरोध होत नाही, असे सूचक वक्तव्य केले होते. या कार्यक्रमानंतर वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना दुष्काळाचे व दुबार पेरणीचे सावट असताना हवामान खात्याने केलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडला, तर तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असे पवार यांनी स्पष्ट केले होते.
हा कार्यक्रम संपला आणि संध्याकाळी दररोज भरून येणारे आभाळ खरोखरच बरसले आणि त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या. या एका पावसाने दुष्काळ वाहून गेला नसला तरी दीड महिन्यापासूनची पावसाची प्रतीक्षा मात्र संपली आहे आणि शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा नक्कीच मिळाला आहे.
|