पुणे - निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया समजावून घेणे, लोकशाहीला बळकटी देण्यासाठी नवमतदारांमध्ये मतदानाची जागृती करण्यासाठी 74 महाविद्यालयांमध्ये "इलेक्टोरल लिटरसी क्लब'ची स्थापना करण्यात आली आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार "मतदार पुनरिक्षण मोहीम' हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी 49 हजार अर्ज आले असून, त्यातील 37 हजार 377 मतदारांची नोंदणी पूर्ण झाली, तर 12 हजार मतदारांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये ऑनलाइन 25 हजार 801 अर्ज आलेले आहेत, तर 26 हजार 860 अर्ज ऑफलाइन आले आहेत. या अर्जांची 100 टक्के माहिती भरून 31 डिसेंबरपर्यंत त्यावर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर 10 जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या कामासाठी जिल्ह्यामध्ये 21 निवडणूक अधिकारी आणि 38 सहायक निवडणूक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. वेळ कमी असल्याने तीन पाळ्यांमध्ये कामाचे नियोजन आहे, असे राव यांनी सांगितले.
जनजागृती करण्याबरोबरच विद्यापीठ, महाविद्यालयीन स्तरावर युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यासोबतच केंद्रीय निवडणूक आयोगाने एक जानेवारी 2018 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांसह 1 जानेवारी 2000 या दिवशी जन्म झालेल्या "सहस्रक' मतदारांची नावे मतदार यादीत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मतदारांना "यूथ आयकॉन' म्हणून निवडण्यात येणार आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये 25 जानेवारी रोजी "राष्ट्रीय मतदार दिवस' कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
"दिव्यांग' मतदारांसाठी विशेष जागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, विविध सामाजिक संस्था मतदारांशी संवाद साधणार आहेत. नवमतदार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी निवडणूक प्रक्रियेविषयी संवाद होत राहिला, तर लोकशाहीला बळ मिळेल. त्यासाठी महाविद्यालय स्तरावर स्थापन केलेल्या "इलेक्टोरल लिटरसी क्लब'ची संख्या 200 पर्यंत नेण्यात येणार आहे.''
- सौरभ राव, जिल्हाधिकारी
|