पुणे - 'कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी प्रकरणे आपापसांत मिटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा. त्यासाठी कायद्याची वेळीच माहिती घेतल्यास व्यवहारात चुका न होता कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात नेहमी लागणाऱ्या तेवीस दिवाणी कायद्यांची थोडीफार माहिती घेणे आवश्यक आहे,'' असे मत मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी व्यक्त केले.
ऍड. रेणू देव लिखित "कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी' या पुस्तकाचे मोडक यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. सकाळ प्रकाशनाच्या "कायदा सर्वसामान्यांसाठी' या मालिकेतील हे पाचवे पुस्तक आहे. या वेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र दौंडकर, उपाध्यक्ष ऍड. संतोष जाधव आणि ऍड. हेमंत झंजाड, सकाळ प्रकाशनाचे सरव्यवस्थापक आशुतोष रामगीर उपस्थित होते. मोडक म्हणाले, 'दैनंदिन व्यवहारात नेहमी लागणाऱ्या दिवाणी कायद्यांची ओळख ऍड. देव यांनी या पुस्तकाद्वारे सोप्या भाषेत करून दिली आहे.
सर्वसामान्यांना कायदे समजावून देणाऱ्या या पुस्तकामुळे न्यायालयातील खटले कमी होण्यास नक्कीच मदत होईल.'' मोडक यांनी आपल्या भाषणात या पुस्तकाच्या उपयुक्ततेबद्दल माहिती दिली.
ऍड. देव म्हणाल्या, 'सामान्य नागरिक, कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच नवोदित वकील या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. वाटपाचे कायदे, मृत्युपत्र, अपघाताच्या भरपाईचा कायदा, हिंदू विवाह कायदा, मालमत्तेचा कायदा, अशा कायद्यांची सर्वांगीण माहिती क्लिष्टपणा टाळून सोप्या भाषेत या पुस्तकात दिली आहे.'' या कार्यक्रमात असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हा तसेच इतर न्यायालयातील न्यायाधीश, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव ऍड. विवेक भरगुडे यांनी केले, तर ऍड. अभिजित पोळ यांनी आभार मानले.
|