पुणे - देशी गाईचे दूध रोगप्रतिकारक असल्याचा प्रचार होत असल्यामुळे या गाईच्या दुधाला मागणी वाढत आहे. प्रत्यक्षात उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात देशी गाईंच्या दुधाच्या उत्पादनासाठी शंभराहून अधिक ‘फार्म्स’ उभे राहिले आहेत. या दुधाला प्रतिलिटर ५० ते ९० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी आणि काही व्यावसायिकही देशी गाईंच्या पालनाकडे वळू लागले आहेत.
संकरित गाईच्या तुलनेत देशी गाईचे दूध आरोग्याला अधिक पोषक असल्याचा प्रसार सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दूध उत्पादनाबरोबरच गोमूत्र, शेणखत आदींचे शेती आणि आयुर्वेदिक औषधातील महत्त्व पटवून दिले जात आहे. संकरित गाईंची दूध देण्याची क्षमता ही जास्त असल्याने त्यांची संख्याही मोठी आहे.
पुरवठा कमी असल्याने महाग
२०१२ च्या पशू गणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ५६ हजार १७९ संकरित गाई होत्या. त्यापैकी २ लाख ३ हजार ३४६ गाई या दूध देत होत्या. देशी गाईंची संख्या १ लाख २६ हजार ८१३ इतकी होती. त्यापैकी ५२ हजार ८४० गाई या दूध देत होत्या. देशी गाईंची दूध देण्याची क्षमता कमी असल्याने या दुधाची उपलब्धता कमी आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून देशी गाईच्या दुधाच्या औषधी गुणांविषयी चर्चा सुरू आहे. प्रसारमाध्यमे आणि ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून देशी गाईच्या दुधाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे या दुधाला मागणी वाढत आहे. उपलब्धता कमी असल्याने त्याला चांगला भावही मिळत आहे.
प्रतिदिन ५४ लाख लिटर दूध बाजारात
पुणे शहर आणि जिल्ह्यांत साधारणपणे प्रतिदिन ३५ ते ४० लाख लिटर इतक्या दुधाची आवश्यकता असते. ही गरज सहकारी दूध संस्था, खासगी दूध संस्था, डेअरीमार्फत भागविली जाते. सहकारी दूध संस्थांच्या तुलनेत खासगी दूध संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर म्हणजे सुमारे ५४ लाख लिटर इतके दूध बाजारात आणले जाते. ११ लाख लिटर दूध हे पाऊच मधून, २३ लाख लिटर सुट्या स्वरूपात विकले जाते, १३ लाख लिटर दूध पावडर तयार करण्यासाठी आणि १० लाख लिटर दूध हे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते.
देशी गाईच्या दुधाचा वाटा अत्यल्प
एकूण दुधामध्ये संकरित गाईच्या दुधाचे प्रमाण हे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तुलनेने देशी गाईंच्या दुधाचा वाटा हा अत्यल्प आहे. देशी गाई आणि संकरित गाई यांच्या दुधाच्या उत्पादनाची नोंद वेगळी केली जात नाही. या दुधाची मागणी लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत शंभराहून अधिक ‘फार्म्स’ उभे राहिल्याचे दूध उत्पादक आनंद उंडे यांनी नमूद केले. तसेच या दुधाविषयी ग्राहक अधिक जागरूक होणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.
केवळ दूध नव्हे तर गाईचे तूपही तेवढे महत्त्वाचे आहे. या दुधाला चांगला भाव मिळत आहे. दूध, तूपाप्रमाणेच गोमूत्र, गोमूत्र अर्क, शेण आणि गोमूत्रापासून तयार होणारे शेणखत, पंचगव्य याचाही उपयोग चांगला होत आहे. रासायनिक खतामुळे शेतजमिनीचा खालावणारा पोत सुधारणे, सेंद्रिय शेतीला मिळणारे प्रोत्साहन यामुळे देशी गाईचे पालन वाढू लागले आहे.
- मिलिंद देवल, अभ्यासक
देशी दूध उत्पादनाचा खर्च कमी कसा करता येईल आणि ते ग्राहकांना रास्त भावांत कसे मिळेल याचा विचार करणे आवश्यक आहे. रास्त भावांत दूध मिळाल्यानंतर त्याची मागणी वाढू शकेल.
- आनंद उंडे, दूध उत्पादक
या गाईंना प्राधान्य
महाराष्ट्रातील गाईच्या खिलार, लाल कंधार, डांगी, देवणी, गवळाऊ आदी मूळ जाती आहेत. तसेच आपल्याकडे गुजरातमधील गीर, हरियानातील साहीवाल या गाईंचे पालन केले जात आहे.
गाईंची किंमत आणि प्रतिदिन दूध (अंदाजित) उत्पादन
गीर - ६० ते ७० हजार रुपये : १० लिटर
देवणी - ४५ ते ५० हजार रुपये : ७ लिटर
खिलार - १५ ते ५० हजार रुपये : ५ लिटर
३५ ते ४० लाख लिटर
शहर व जिल्ह्यात प्रतिदिन दुधाची आवश्यकता
वशिंड असलेल्या गाईच्या दुधाला ‘ए २’ आणि वशिंड नसलेल्या गाईच्या दुधाला ‘ए १’ असे म्हटले जाते. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या संशोधनात भारतीय गाईच्या दुधात रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रथिने अधिक असल्याचे आढळून आले. स्निग्धता, फॅटदेखील चांगली असते. देशी गाईच्या दुधात ‘सुवर्ण क्षार’ हा घटक असतो. आयुर्वेद उपचार पद्धतीत या घटकाला विशेष महत्त्व आहे. या दुधातून हा घटक नैसर्गिकरीत्या आपल्याला मिळतो.
- काड सिद्धेश्वर महाराज, कणेरी मठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.