पुणे - मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणारी बुलेट ट्रेन पुण्यापर्यंत आणण्याच्या प्रस्तावावर नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) विचार करीत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून समजले. ही ट्रेन पुण्यापर्यंत आल्यास पुणे ते मुंबई अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करता येईल.
मुंबई-अहमदाबाददरम्यानची नियोजित बुलेट ट्रेन किमान 300 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे. हा मार्ग अहमदाबादवरून साबरमतीपर्यंत वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु मुंबईवरून पुण्यापर्यंत मार्ग वाढविल्यास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळू शकतो. तसेच अहमदाबादवरून पुण्याला ये-जा करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे.
त्यामुळे या ट्रेनचा फायदा पुणे, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांतील प्रवाशांना मिळू शकतो, असे प्रस्तावात म्हटले आहे. याबाबत हायस्पीड रेल कॉर्पोरेशन गांभीर्याने विचार करीत आहे. त्याबाबत सर्वेक्षण करण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बुलेट ट्रेनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली आहे. या ट्रेनचे काम मिळावे म्हणून चीन, फ्रान्स, स्पेन, जपान, दक्षिण कोरियामधील अनेक कंपन्या इच्छुक आहेत. ही बुलेट ट्रेन पुण्यावरून मुंबईला जाताना फक्त वडाळा येथे थांबेल, असेही प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे पुणे ते छत्रपती शिवाजी स्थानक हे अंतर किमान 30 मिनिटांत कापले जाऊ शकते. याबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा म्हणाल्या, ""बुलेट ट्रेन पुण्यापर्यंत येणे गरजेचे आहे. पुण्यातून अहमदाबाद आणि तेथून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनही या प्रस्तावावर विचार करीत आहे. आता पुण्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यास पुणे-मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन शक्य होईल.'' या प्रस्तावाला मध्य रेल्वेच्या मुंबईतील सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. मात्र, तपशील नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
|