पुणे - राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातलेला चिनी नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलिसांनी छापे घालण्यास सुरवात केली आहे. गुन्हे शाखेची सात पथके विक्रेत्यांवर कारवाई करत आहेत.
चिनी नायलॉन मांजा गळ्याभोवती अडकून मागील आठवड्यात झालेल्या अपघातामध्ये "सकाळ'च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचार सुरू असताना रविवारी त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पतंग उडविणाऱ्या मुलांसह त्यांच्या पालकांकडे चौकशी केली होती, तर सोमवारी मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली.
गुन्हे शाखेच्या पथक क्रमांक तीनचे सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ""शहराच्या विविध भागांमध्ये बंदी असूनही चिनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. गुन्हे शाखेची सात पथकांची नेमणूक केली आहे. बंदी असलेल्या मांजाची विक्री करणाऱ्यांवर ही कारवाई करण्याचे काम सुरू आहे. शहराच्या विविध भागांमध्ये ही कारवाई सुरू आहे. शहर पातळीवर किती विक्रेत्यांवर कारवाई झाली, याविषयीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.''
|