‘‘अरे, थांब... सिटीमध्ये नको भरू पेट्रोल... सिटीबाहेर स्वस्त मिळतं... तिथं टाकी ‘फूल’ करूया,’’
असं आपण सहजपणे म्हणतो आणि तसं करतोही... पण हे ‘स्वस्त’ पेट्रोल अप्रत्यक्षपणे तुमच्याच जिवावर बेतणारे आहे याची कल्पना आहे? याच हलक्या दर्जाच्या पेट्रोल किंवा डिझेलचा ‘धुराडा’ शहराच्या रस्त्यांवर गाड्यांमधून बाहेर पडतो आणि तुमच्या-आमच्या नाका-तोंडात जातो.
पुणे - महापालिका हद्दीत ‘भारत स्टेज (बीएस)-४’ दर्जाच्या पेट्रोल व डिझेल इंधनाची विक्री होते. हे इंधन चांगल्या दर्जाचे असल्यामुळे त्याच्या ज्वलनातून होणारे उत्सर्जन तुलनेने कमी असते, तर महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या पंपांवर ‘बीएस-२’ आणि ‘बीएस-३’ दर्जाचे इंधन मिळते. वाहनांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्याचा एक मार्ग म्हणजे चांगल्या दर्जाचे इंधन उपलब्ध करून देणे. असे इंधन सर्व मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याची अंमलबजावणी करत असताना शहराच्या हद्दीबाहेरच्या पंपांवर मात्र हलक्या दर्जाच्या इंधनाचीच विक्री होत आहे.
हलक्या दर्जाचे इंधन वापरल्याने तुमचे वाहन वारंवार नादुरुस्त होण्याचा धोकाही आहेच! थोडे पैसे वाचविण्यासाठी महापालिका हद्दीबाहेर पेट्रोल भरल्यामुळे वाहनाच्या दुरुस्तीवरच खर्च करण्याची वेळ येऊ शकते. अशुद्ध इंधन इंजिनमध्ये गेल्यामुळे इंधनातील कचरा किंवा खराब घटक चाळण्याचे काम करणारे ‘फिल्टर’च खराब होतात. अशुद्ध पेट्रोल ‘कार्बोरेटर’मध्ये गेल्यामुळे तेथील ‘जेट्स’ बंद पडू शकतात. त्यामुळे गाडी वारंवार बंद पडते किंवा सुरू करताना अनेकदा किक मारावी लागते. ‘ब्लॉक पिस्टन’ आणि ‘पिस्टन रिंग’ही खराब होते. त्यामुळे गाडीचा ‘पिकअप’ आणि ‘ॲव्हरेज’वर विपरित परिणाम होतो.
- गोपाळ पाटील, ऑटोमोबाईल व्यावसायिक
बीएस-४ दर्जाच्या इंधनासाठी ‘रिफायनिंग’वर अधिक खर्च करावा लागतो. ही सुविधा भारतात उपलब्ध नाही. या इंधनाच्या विक्रीतून शासनाला प्रतिलिटर २० रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. त्याउलट ‘बीएस-२’ किंवा ‘बीएस-३’ दर्जाच्या इंधनाच्या विक्रीतून शासनाला फायदा होतो. म्हणून निमशहरी, ग्रामीण भागात या इंधनाच्या विक्रीला परवानगी दिली आहे.
- अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.