पुणे - औषध म्हटले की तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या, पातळ औषध असे सर्वसामान्य प्रकार आपल्याला माहिती आहेत, पण आता आधुनिक काळातील प्रगत संगणक विज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी यामुळे "डिजिटाइज्ड मेडिसिन्स'चे युग सुरू झाले आहे. त्यातून औषधे "स्मार्ट' होताना दिसत आहेत.
नॅनो मेडिसिनमध्ये तंत्रज्ञानाने विकसित केलेले अतिसूक्ष्म कण म्हणजे "नॅनो पार्टिकल्स' वापरले जातात. त्याचा आकार शंभर नॅनोमीटरहून कमी असतो. या कणांचा वापर औषधवहनासाठी केला जातो. हे नॅनो मेडिसिन इंजेक्शनच्या माध्यमातून शरीरात सोडले जाते. त्यानंतर ते रक्ताच्या माध्यमातून अपेक्षित पेशीपर्यंत सहजतेने पोचते. हे औषध विकसित करताना ते नेमके रोगग्रस्त अवयवातच जाऊन पोचेल आणि इतस्ततः पसरणार नाही, याची काळजी घेतली जाते. या औषधांमुळे रुग्णास प्रभावी रामबाण उपाय अधिक आणि दुष्परिणाम कमी असा दुहेरी फायदा होतो. तसेच औषधांच्या डोसाचे प्रमाणही तुलनेने कमी ठेवता येते, अशी माहिती डॉ. अनिल गांधी यांनी दिली.
शरीराची प्रतिकारशक्ती नॅनो कणांना "परकी' समजून त्याला प्रतिकार करण्याचा धोका असतो. म्हणून हे नॅनो कण पाण्यात विरघळणाऱ्या पॉलिमरचे किंवा प्रत्यक्ष लाल पेशींच्या आवरणाचे आच्छादन देतात. अशा आवारणातील हे नॅनो औषध शरीरातील प्रतिकारशक्ती करणाऱ्या यंत्रणांचा डोळा चुकवत रोगग्रस्त पेशींपर्यंत पोचतात. त्यामुळे या रोगावर थेट परिणाम साधणे शक्य होते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कर्करोगासारख्या दुर्धर आजारात रोगाच्या गाठीपर्यंत औषध पोचणे आवश्यक असते. अशा रोगांमध्ये नॅनो मेडिसिनला प्रचंड वाव असल्याचेही डॉ. गांधी यांनी स्पष्ट केले. "डॉक्सोरूबिसिन'सारखी काही औषधे नॅनो रूपात कर्करुग्णांमध्ये यशस्वीरीत्या वापरली जात आहेत. भविष्यात एड्ससारख्या आजारांवरदेखील अनेक नॅनो औषधे उपलब्ध होतील. अशा "स्मार्ट' औषधांमुळे घातक दुष्परिणामांपासून रुग्णांची बऱ्याच अंशी सुटका होईल, असेही त्यांनी सांगितले.
'पेरिनेटॉलॉजी'ने माता व बालसंगोपन
माता आणि बालसंगोपन किंवा उपचार पद्धतीमध्ये "पेरिनेटॉलॉजी' ही अस्तित्वात आलेली नवीन शाखा नेत्रदीपक कामगिरी करत आहे. गर्भातील व्यंगाचे निदान झाल्यानंतर त्यावरील उपचाराचा मार्ग या माध्यमातून खुला झाला आहे. आईच्या पोटातील गर्भ नाळ न तोडता गर्भाशयाबाहेर काढून या क्षेत्रातले तज्ज्ञ त्याच्यावर शस्त्रक्रिया करतात, त्यानंतर तो गर्भ पुन्हा गर्भाशयात सोडला जातो. गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रसूती होते. न भूतो न भविष्यति वाटणाऱ्या आणि कल्पनाविलासातही न आलेल्या या घटना आता प्रत्यक्षात येत आहेत, त्यात तंत्रज्ञानाचे मोठे योगदान आहे.
मुंबई येथील "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मध्ये (आयआयटी) फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी नॅनो मेडिसिन इन्हेलरच्या स्वरूपात विकसित करण्यात आले आहे. नॅनो स्वरूपातल्या आणि तेही थेट फुफ्फुसात जाणाऱ्या या औषधांमुळे चांगले परिणाम मिळतात आणि दुष्परिणाम कमी होण्याची शक्यता आहे, असेही डॉ. अनिल गांधी यांनी सांगितले.
|