पुणे - एकात्मिक वाहतूक आराखड्यांतर्गत (इंटिग्रेटेड मल्टिमोड्यूल ट्रान्स्पोर्ट हब) "महामेट्रो'ने पिंपरी-स्वारगेट मार्गावरील जेधे चौकातील भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम सहा महिन्यांत सुरू करण्याची तयारी करावी, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईतील आढावा बैठकीत दिला. महामेट्रोतर्फे नागपूर आणि पुण्यात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून मुख्यमंत्र्यांनी या कामांचा आढावा घेतला.
'शहरातील मेट्रो स्थानकासाठी शिवाजीनगरमधील धान्य गोदामाची जागा मिळविणे, तसेच कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात असलेल्या जागेपैकी काही भाग मिळविण्यासाठी महामेट्रो प्रयत्नशील असून जागांच्या संपादनाबाबतही त्यांनी काही सूचना दिल्या. जेधे चौकातील भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम सहा महिन्यांत सुरू करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले,'' अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
जेधे चौकात सुमारे चार एकर जागेमध्ये मेट्रोचे स्थानक साकारण्यात येणार आहे. त्यात एसटी महामंडळ आणि पीएमपीच्या बसलाही सामावून घेण्यात येणार आहे. एसटी, पीएमपी आणि मेट्रो यांची सांगड घालून मेट्रो स्थानक म्हणजेच "ट्रान्स्पोर्ट हब' उभारण्यात येणार आहे. याबाबत एसटी आणि पीएमपीबरोबर चर्चा सुरू असून लवकरच आराखडा तयार करण्यात येईल.
- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
महामेट्रो समन्वय साधणार
जेधे चौकातील भूमिगत स्थानकासाठी एसटी, पीएमपी, महापालिका आदी संस्थांबरोबर महामेट्रोला काम करायचे आहे. त्यामुळे महामेट्रो समन्वयकाची भूमिका बजावणार आहे. ट्रान्स्पोर्ट हबचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून त्यावर विचारविनिमय करून अंतिम आराखडा तयार झाल्यावर पुढील प्रक्रिया सुरू होईल, असे ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले.
|