पालिका आखणीनुसारच रस्त्याची रुंदी 

पालिका आखणीनुसारच रस्त्याची रुंदी 
Updated on

पिंपरी - नाशिक फाटा ते मोशीदरम्यान रस्त्याच्या रुंदी रेषेमधील (अलाइनमेंट) विसंगती दूर करण्यासाठी महापालिकेने केलेल्या आखणीप्रमाणेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) त्यांचा आराखडा करावा, असा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. मेट्रो, बीआरटी यांचेही मार्ग त्यानुसार निश्‍चित करण्यात येतील. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पासाठी होणाऱ्या जादा खर्चाचा निर्णय केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याशी शनिवारी (ता. 12) चर्चा करून घेण्यात येईल. 

महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या या रस्त्याची रुंदी वेगवेगळी आहे. त्यामुळे भूसंपादन करताना महापालिकेपुढे समस्या उभी राहिली. या रस्त्याची मध्यरेषा निश्‍चित होत नसल्याने मेट्रो आणि बीआरटीचा आराखडाही तयार करण्यात अडचणी आल्या आहेत. महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रुंदी रेषा एकमेकांशी विसंगत असल्यामुळे त्या रस्त्यावरील कामे गेली दोन वर्षे रखडली आहेत. या प्रकल्पाच्या तिन्ही संस्थांच्या सल्लागारांची बैठक गेल्या महिन्यात झाली. मात्र, तोडगा निघाला नाही. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशी हा बारा किलोमीटरचा रस्ता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहे. एनएचएआयचा या 28 किलोमीटर रस्त्याचा प्रकल्प 978 कोटी रुपयांचा आहे. 

केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खासदार अमर साबळे, अनिल शिरोळे, आमदार गौतम चाबुकस्वार, विजय काळे, बाबूराव पाचर्णे, सुरेश गोरे, राहुल कुल, मेधा कुलकर्णी, दत्तात्रेय भरणे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. महापालिका, प्राधिकरण आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नाशिक रस्त्याबाबत त्यांचे मुद्दे या बैठकीत मांडले. 


महापालिकेने त्यांच्या रस्त्याच्या आराखड्यानंतर बांधकामांना रीतसर परवानगी दिली. मात्र, तेथून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रुंदी रेषा जाते. त्यामुळे नाशिक रस्त्यावरील या संस्थांच्या मार्गांची मध्यरेषा जुळत नाही. प्राधिकरणाने त्यांची रुंदी बदलून महापालिकेप्रमाणे केल्याशिवाय हा घोळ मिटणार नाही. प्राधिकरणाला रुंदी रेषा बदलावी लागेल. त्यामुळे त्यांच्या प्रकल्पखर्चात मोठा फरक पडेल. त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादरीकरण करू. 
- सौरभ राव, आयुक्त, पुणे महापालिका 

महापालिकेचा विकास आराखडा घेऊन त्यामुळे नाशिकफाटा ते मोशीदरम्यानच्या रस्त्याची रुंदी रेषा बदलून घेऊ. तळेगाव जंक्‍शन ते चाकण दरम्यान साडेबारा किलोमीटरसाठी पीएमआरडीएच्या रिंगरोडचा एकत्रित वापर करू. चाकणपासून राष्ट्रीय महामार्गाचे वेगळे नियोजन करू. 
- सुहास चिटणीस, अधीक्षक अभियंता, एनएचएआय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.