अभ्यास हवा, पण दप्तर नको 

अभ्यास हवा, पण दप्तर नको 
Updated on

पिंपरी - शाळेतील मुलांच्या दप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुलाच्या वजनाच्या दहा टक्‍के दप्तराचे ओझे असावे, असे न्यायालय आणि सरकारने आदेश दिले आहेत. परंतु, बहुतांश शाळा याकडे दुर्लक्ष करतात. मुलाच्या वजनाच्या 25 ते 30 टक्‍के दप्तराचे वजन होत आहे. त्यामुळे मुले या ओझ्याखाली दबली जाऊ लागली आहेत. एवढे वजन पाठीवर घेत काही मुले अर्धा ते पाऊण तास चालत शाळेत येतात. त्यातून मुलांना अनेक व्याधी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. दप्तराच्या वजनाबरोबरच मुलांच्या डोक्‍यावरील ताणही वाढत आहे. 

दप्तराचे ओझे वाढण्याची कारणे  
बॅन्डेड स्कूल बॅग, शाळेची पाठ्यपुस्तके, क्‍लासवर्क आणि होमवर्कच्या वेगवेगळ्या वह्या, प्रोजेक्‍ट, कंपास, कलर बॉक्‍स, खेळाचे साहित्य, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा अशी भरगच्च साहित्यांनी मुलांचे दप्तर भरलेले असते. रेनकोट किंवा छत्रीच्या वजनाची त्यात भर पडते. यामुळे मुलाच्या वजनाच्या दुप्पट ते तिप्पट म्हणजे 10-15 किलो वजन दप्तराचे होऊ लागले आहे. तर काहीजण शिकवणीवरून थेट शाळेत जातात, तर काहीजण शाळेतून शिकवणीला जातात. यामुळे त्याही वह्यांचे वजन वाढते. 

होणारे आजार 
पाठदुखी, सांधे आखडणे, स्नायू आखडणे, मणक्‍याची झीज, मानदुखी, फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, शारीरिक व मानसिक थकवा जाणवणे, डोकेदुखी तसेच शारीरिक वाढीवर परिणाम होणे. 

कायदा काय म्हणतो? 
पहिलीच्या मुलाच्या दप्तराचे ओझे दोन किलो तर आठवीच्या मुलाचे सव्वा चार किलो वजन असायला हवे. सरकारने याबाबत 21 जुलै 2015 रोजी अध्यादेश काढून सर्व शाळांना त्याचे काटेकोर पालन करायला सांगितले आहे. मात्र, शाळा आणि सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

असे कमी होऊ शकते दप्तराचे ओझे 
* प्रथम आणि द्वितीय सहामाहीची पुस्तके वेगळी असावीत. 
* मुलांना पुस्तक शेअरिंगची सवय लावणे. 
* क्‍लासवर्क बुक शाळेतच ठेवणे. 
* सर्व क्‍लासवर्कसाठी एकच वही असावी. 
* 200 ऐवजी 100 पानी वही वापरावी. 
* शाळेत शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी. 
* शाळेतील उपगृहामुळे डब्याचेही वजन होईल कमी. 
* ई-लर्निंगमुळेही पुस्तकाचे वजन कमी होईल. 
* गृहपाठ तपासणीचा दिवस ठरवावा. 

शरीराच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात वजन आल्यास मणक्‍यावर ताण येतो. काही मांसपेशी निष्क्रिय होतात. याचा परिणाम मुलांच्या वाढीवर होण्याबरोबर विविध आजारही होण्याची शक्‍यता असते. 
डॉ. राजेंद्र देशमुख-अस्थिरोग तज्ज्ञ

माझी मुलगी दुचाकीवरून उतरल्यानंतर दोनवेळा दप्तराच्या ओझ्यामुळे पडली. याशिवाय दप्तर पाठीवर घेऊन जाताना ती शरीराचा समतोल राखण्यासाठी पुढील बाजूस वाकते. त्यामुळे तिच्या शरीरावर विपरीत परिणाम होईल, असे वाटत असल्याने शाळेत येता-जाताना तिचे दप्तर आम्हीच घेतो. 
रूपाली दौंडकर-पालक 

मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तक शेअरिंग यासारखे उपक्रम आमच्या संस्थेत राबवितो. मात्र, मुले स्वतःहून विषय नसलेल्या तासिकेची पुस्तके आणतात. याशिवाय खासगी शिकवणीच्या वह्या शाळेच्या दप्तरात असतात. 
अप्पा शितोळे, प्राचार्य-पुणे जिल्हा शिक्षण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.