"लिव्हेबल सिटी'साठी प्रयत्न - श्रावण हर्डीकर

"लिव्हेबल सिटी'साठी प्रयत्न - श्रावण हर्डीकर
Updated on

पिंपरी - पिंपरी- चिंचवड शहरात पुरेशा पायाभूत व नागरी सुविधा देत हे शहर राहण्यासाठी जास्तीत जास्त चांगले बनविण्याकडे येत्या वर्षांत भर दिला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी (ता. 14) सांगितले. नदीसुधार योजना, पाणीपुरवठा योजना, कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

गणेशोत्सवानिमित्त हर्डीकर, पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पवार, तळेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. त्यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर आपापल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे भावी काळात हाती घेण्यात येत असलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. 

हर्डीकर म्हणाले, ""शिक्षण व आरोग्य या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. कौशल्य विकास कार्यक्रम राबवून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट क्‍लासरूम योजना राबविली जाईल. विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षित केले जाईल. सायकल शेअरिंगची योजना अधिक व्यापक करण्यात येईल.'' 

इंद्रायणी व पवना नदी सुधारणेसाठी सर्वंकष विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. भामा आसखेड व आंद्रा धरणांतून शहरासाठी पाणी घेण्याचा प्रस्ताव पाठविला असून, त्याच्या निविदा तयार केल्या आहेत. अमृत योजनेअंतर्गत 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या योजनांमुळे शहरातील पाणीपुरवठा सुधारेल, तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातील काही पाण्याचा पुनर्वापर केला जाईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरबांधणीचा कार्यक्रम हाती घेत आहे. तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारणीचा प्रारंभही लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या सर्व शाळांत मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी मूर्ती बनविल्या. पन्नास टक्के घरांत जरी या मूर्तींच्या प्रतिष्ठापना झाली, तरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव होईल. विसर्जन घाटावर हौद उभारले आहेत. शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्तींचे हौदात विसर्जन करता येईल. पीओपीपासून बनविलेल्या मूर्ती नागरिकांनी शक्‍यतो दान कराव्यात. पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर टाळावा, असे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.