पिंपरी - आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीत सोडलेले पाणी देहू बंधाऱ्याजवळ उचलण्याच्या महापालिकेच्या नियोजित प्रकल्पाला जलसंपदा विभागाची मान्यता मिळणे अवघड आहे. कारण सध्याच पवना धरणातून शहराला जादा पाणीपुरवठा होत असल्याने "आंद्रा'मधून आणखी पाणी देता येणार नसल्याचे या विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, देहू बंधाऱ्यापासून पाणी उचलण्यासंदर्भात सचिव पातळीवर बैठक व्हावी यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर प्रयत्नशील आहेत.
आंद्रा आणि भामा आसखेड धरणांतून 2.66 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचे राज्य सरकारने मार्च 2014 मध्ये मान्य केले. मात्र महापालिकेने धरण पुनर्स्थापनेसाठी 238 कोटी रुपये भरून करारनामा न केल्याने ती परवानगी जलसंपदा विभागाने गेल्या वर्षी रद्द केली. "आंद्रा'तून रोज 100 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्याचे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कालवा समितीच्या बैठकीत पंधरवड्यापूर्वी दिले. त्यासाठी सचिव पातळीवर बैठक घेण्याचे ठरले.
महापालिकेने चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारून देहूपासून तिथपर्यंत पाणी नेण्याची योजना आखली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गेल्या वर्षी पाणी वापराची नियमावली जाहीर केली. त्याला अनुसरून नवीन प्रस्ताव मंजूर करून घ्यावा लागेल. मात्र महापालिका सध्याच जादा पाणी घेत असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.
""पिंपरी- चिंचवडच्या 22 लाख लोकसंख्येसाठी रोज प्रति व्यक्ती 135 लिटर अधिक 15 टक्के गळती मोजली तरी 4.4 टीएमसी पाणी पुरते. महापालिकेला पवना धरणातून 6.55 टीएमसी पाणी आरक्षित आहे. सध्या महापालिका सहा टीएमसी पाणी घेते. त्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार आंद्रा धरणातून पाणी घेण्याचा नवीन प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता कमी आहे.''
- संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग
""भामा आसखेड आणि आंद्रा धरणांतून पिंपरी- चिंचवडला पाणी देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीत सोडलेले पाणी देहू बंधाऱ्यापासून 100 एमएलडी देण्याची महापालिकेची मागणी आहे. चिखलीला नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येईल. त्यामुळे शहराचा पुढील काही वर्षांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न संपेल. या निर्णयासाठी सचिव पातळीवर बैठक घेण्याचे ठरले आहे.''
- श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त
आकडे
महापालिकेचा वार्षिक पाणीवापर 5.93 टीएमसी
मंजूर पाणी कोटा 4.84 टीएमसी
रोजचा पाणी वापर 490 एमएलडी
आंद्रा धरणातून अपेक्षित पाणी 100 एमएलडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.