महापौरांच्या प्रभागात अपुरा पुरवठा
चिखली - महापौरांच्या प्रभागात अपुरा पुरवठा
चिखली परिसरात गेल्या आठ दहा दिवसांपासून अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांचे हे प्रभाग आहेत. चिखली गावात पाण्याची टाकी बांधूनही तिचा वापर करण्यात येत नसल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. धर्मराजनगर, रिव्हर रेसिडेन्सी भागातील सोसायट्यांमधील नागरिकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते. मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, कुदळवाडी, जाधववाडी, चिखली गावठाण परिसरात पाणीपुरवठा होत असला तरी अतिशय कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. सध्या आक्टोबर हीट जाणवू लागली आहे. काही दिवसांत दसरा आल्याने महिला कपडे आणि भांडे धुण्याची लगबग सुरू आहे. त्यातच अनेकजण नळजोडाला इलेक्ट्रीक मोटर लावून पाणीउपसा करतात. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून, काही नागरिक बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरतात. मात्र, पाणीपुरवठा विभागाचे यावर नियंत्रण नाही. इलेक्ट्रीक मोटर जप्त केल्या तरी मोठा राजकीय हस्तक्षेप होतो. त्यामुळे पाणीपुरवठा कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. चिखली परिसरात कामावर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने कामगार महिला व बॅचलर मुलांची ओढाताण होत आहे.
कलिमुन्नीसा सिद्धीकी (कुदळवाडी), चाळीच राहत असल्याने बारा-तेरा कुटुंबांमध्ये एकच नळजोड आहे. सर्व कुटुंबांना पाणी मिळणे पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे दिवसाआड पाणी भरावे लागते.
मीनल मेमाणे (मोरेवस्ती), पाणी येत असले तरी अपुरे आणि कमी दाबाने येते. त्यामुळे एक हंडा भरण्यासाठी पंधरा वीस मिनीट लागतात. परिणामी पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही.
थेरगाव - उंच भागात कमी पाणी
पिंपरी : थेरगाव परिसरात सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पहिल्या मजल्यापर्यंतही पाणी चढण्यास अडचणी येत आहेत. येथील पाणीपुरवठ्यात तत्काळ सुधारणा व्हायला हवी, अशी नागरिकांची मागणी आहे.
काही भागांमध्ये टाकलेल्या नवीन जलवाहिन्यांना अनधिकृत नळजोड घेण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नळजोड देताना अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करायला हवी. थेरगाव परिसरात सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. कैलासनगर भागामध्ये तर दूषित पाणी येत आहे. हा पाणीपुरवठा लवकर सुरळीत व्हायला हवा. काही भागामध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, ते अर्धवट आहे. ते काम पूर्ण व्हायला हवे, असे येथील नागरिक सिद्धार्थ साळवे यांनी सांगितले.
भोसरी - कमी दाबाने पाणीपुरवठा
भोसरी - येथील चक्रपाणी वसाहत, बालाजीनगर, खंडेवस्ती, दिघी परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने आतापासूनच पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
दिघी रस्त्यावरील साई सिद्धनगरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे मंदाकिनी गोगावले यांनी सांगितले, तर नूर मोहल्ल्यात नळाला पाण्याऐवजी फक्त हवाच येत असल्याचे सादिका मुजावर यांनी सांगितले. इंद्रायणीनगर, बालाजीनगर, खंडेवस्ती आदी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. दिघीमध्ये चोवीस तास पाणी पुरवठ्याच्या कामामुळे जागोजागी पाइपलाइन तोडण्यात आल्या असून, पाणीपुरवठा वारंवार विस्कळित होत आहे.
मोशी - पाण्यासाठी रात्रीचा दिवस
मोशी - आदर्शनगर, तापकीरनगर आदी भागांमध्ये सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक सध्या पाणीप्रश्नामुळे हैराण झाले आहेत. आदर्शनगरप्रमाणेच मोशी प्राधिकरण पेठ क्रमांक ४, तापकीरनगर, आल्हाट वस्ती, बोराटे वस्ती, तुपे वस्ती, गायकवाड वस्ती, टोल नाका या परिसरातही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. आदर्शनगर परिसरामध्ये रात्री १० ते ६ या वेळेत कमी दाबाने पाणी येते. रात्री जागरण करत पाणी भरत बसावे लागत. त्यामुळे पाणी रात्री न सोडता सकाळी सोडले तर बरे होईल, आदर्शनगरमधील गृहिणी उषा चव्हाळे यांनी सांगितले.
वाल्हेकरवाडी - अपुरा, दूषित पुरवठा
वाल्हेकरवाडी - येथील चिंतामणी चौकात असणाऱ्या स्वामी विवेकानंद सोसायटी, शिवाजीनगर परिसर, रजनीगंधा सोसायटी, आहेर नगर, चिंचवडे कॉलनी, सायली कॉम्प्लेक्स, रिलायन्स टॉवर, मोरया कॉलनी, ओम साई कॉलनी आदी भागांत गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने आणि अपुरा व दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
पूर्वी नियमित व सर्वांना पुरेल एवढे पाणी मिळत होते; परंतु मगील काही दिवसांपासून कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. एक दिवसाआड पाणी मिळत असल्याने त्यातच भागवावे लागत असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली; परंतु काही भागात अत्यंत कमी पाणी येत असल्याने नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ येत आहे. कपडे व भांडी धुण्यासाठी पाण्याचा काटसकरीने वापर करावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.