निगडी : संततधार पावसाने पालिकेच्या कारभाराच्या मर्यादा उघड झाल्या. सेक्टर २२ मधील आझादनगर, संग्रामनगरमधील दीडशेच्या आसपास घरांमध्ये पाणी शिरले. हा परिसर जलमय झाला असून पालिकेच्या ढिसाळ कारभारविरोधात संग्रामनगरमधील नागरिकांनी भक्ती शक्ती चौक आज (१६ जुलै) अर्धा तास रोखून धरीत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. यावेळी वाहतूक कोंडी झाली होती.
संततधार पावसाने महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले. सेक्टर २२ मधील संग्रामनगर वस्तीतील घरांमध्ये पाणी शिरले. या वस्तीत गुडघाभर तर घरांमध्ये फूटभर पाणी साठले. पालिकेकडे तीन वेळा पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे. दरम्यान स्थानिक नगरसेवकांकडे याप्रकरणी लक्ष वेधले होते, अशी माहिती येथील रहिवाशांनी 'सकाळ'ला दिली.
घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. लहान मुलांची अधिक गैरसोय झाल्याचे दिसून आले. आज संतप्त झालेल्या नागरिकांनी सकाळी भक्ती शक्ती येथे काही वेळ आंदोलन केले.
महापालिकेला तीन वेळा पत्रव्यवहार करून संभाव्य आपत्तीची कल्पना देऊन उपाय योजना करण्याचे सुचवले होते. घरांमध्ये पाणी शिरले तरीही प्रशासन सुस्त आहे. आमच्या आरोग्याशी खेळ महापालिका करीत आहे.
- राजू गायकवाड, स्थानिक रहिवासी
घरात पाणी आले. काहीही करता येत नाही. मुलंबाळं उपाशी आहेत. लहान बाळांना कसे आणि कुठे ठेवायचा प्रश्न आहे. सगळीच गैरसोय आहे. आमच्या प्रश्नाकडे पहाण्यास पालिकेला वेळ नाही.
- आरती उबाळे, रहिवासी
काही अनाधिकृत टपऱ्यांमुळे पाणी तुंबले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने संबंधित टपरी, ओटा काढून पाण्याला वाट करून दिली असल्याने पाण्याचा निचरा झाला आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी याठिकाणी प्रत्यक्ष हजर होते.
- ओ. के. बहिवाल, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.