पिंपरी : काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता बीआरटी मार्गाचे काम संथगतीने सुरू असून, 2011 पासून सुरू असलेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बीआरटीएस ही गतिमान वाहतूकव्यवस्था तूर्तास तरी कागदावरच आहे.
हिंजवडी, वाकड, रहाटणी, थेरगाव, काळेवाडी, पिंपरीगाव, चिंचवडगाव, चिंचवड लिंक रोड आदी परिसराला जोडण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. काळेवाडी फाटा ते एम. एम. महाविद्यालय, एम्पायर पूल ते ऍटो क्लस्टर, आयुक्त बंगला ते कुदळवाडीतील देहू-आळंदी रस्त्यापर्यंत काम झाले आहे; परंतु काळेवाडी व आयुक्तांच्या बंगल्यासमोरील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे जागा हस्तांतर रखडल्याने मार्गाचे काम रखडले आहे. हा भाग सोडून इतर मार्ग वाहतुकीसाठी नुकताच खुला करण्यात आला. मात्र, विद्युत काम रखडल्याने वाहनचालक व सायकलस्वारांना अंधारातूनच जावे लागते. पवनानगर, विजयनगर परिसरात अंधाराचा फायदा घेत गैरकृत्य चालत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. एम. एम. महाविद्यालय ते एम्पायर पुलापर्यंत संबंधित ठेकेदाराला चार वेळा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झालेले नाही.
विद्युतची कामे निकृष्ट दर्जाची
मार्गावर बसविण्यात आलेले पथदिवे अनेक ठिकाणी बंद आहेत. काही एलईडी दिवेही अर्धवट स्थितीत सुरू आहे. या मार्गालगत असलेल्या ऍटोक्टरमधील पोलिस आयुक्तालयासमोरील दिवेही बंद आहेत. विद्युतच्या कामात अधिकाऱ्यांच्या मदतीने जुन्याच केबल वापरल्या जात असल्याने पथदिवे बंद पडतात, असे एका ठेकेदाराने सांगितले.
बीआरटीसाठी प्रतीक्षाच
बीआरटी बसथांब्यांच्या दरवाजांची कामे, दोन थांब्याची उभारणी, विद्युतची कामे; तसेच दहा टक्के स्थापत्यची कामे बाकी आहेत. त्यामुळे बीआरटी बस कधी सुरू होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
दृष्टिक्षेपात मार्ग
- लांबी : 10.25 किलोमीटर
- रुंदी : 45 मीटर
- पदपथ : 1.8 मीटर
- सायकल ट्रॅक : 2.5 मीटर
- संत मदर तेरेसा उड्डाण पुलाची लांबी : 1.6 मीटर
कामाचे टप्पे आणि खर्च
- काळेवाडी फाटा ते एम. एम. विद्यालय : 31.12 कोटी
- एमएम विद्यालय ते पवना नदी पूल : 25.65 कोटी
- संत मदर तेरेसा उड्डाण पूल ः 103.52 कोटी
- ऑटो क्लटर ते केएसबी चौक : 48.74 कोटी
- केएसबी चौक ते देहू-आळंदी रस्ता : 48.45 कोटी
''जागा हस्तांतर होण्यास वेळ लागल्याने कामास विलंब लागला आहे. या मार्गावरील 90 टक्के कामे पूर्ण झाले असून, पीएमपीएलने बस उपलब्ध करून दिल्यास डिसेंबरपर्यंत बीआरटी बस सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.''
- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटीएस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.