बाप्पा... लौकर या! (ढिंग टांग!)

बाप्पा... लौकर या! (ढिंग टांग!)
Updated on

मा. फडणवीसनाना यांसी, 

कोकणचा राजा आणि तेथील जबर्दस्त फुडारी ज्यास दादा असे सार्थ नावाने पुकारले जाते, असा एक गृहस्थ आपल्या कमळ पार्टीच्या गोटात येण्यास उत्सुक असून, कुटुंबकबिल्यासह डेरेदाखल होण्यासाठी त्याने हट्ट धरिला आहे. सारखा फोन करीत असतो. वरिष्ठांशी बोलणी करून कृपया कळवा. तोपर्यंत आमचा फोन बंद राहील, ह्याची खात्री बाळगावी. कळावे. आपला. रावसाहेब. 
 

ता. क. : जळगावचे आपले एक नेते 'मी अजून पार्टीत आहे का?' असे सारखे फोन करून विचारत असतात. त्यांना काय उत्तर द्यावे? तेही कळवा. रावसाहेब. 
* * * 
आदरणीय कमळाध्यक्ष अमितभाई, 

अत्यंत घाईघाईने सदर पत्र लिहीत आहे. माझे सर्व फोन तूर्त बंद ठेवलेले असल्याने पत्र लिहावे लागत आहे. क्षमस्व. दुर्दैवाने फोन बंद ठेवण्याचे व पत्र लिहिण्याचे कारण एकच आहे. - एक कोकणातील मनुष्य दर पंधरा मिनिटांनी फोन करून ''निघू का?'' असे विचारीत आहे. त्याला काय उत्तर द्यावे, हे समजत नाही. 'उद्या बघू' असे सरकारी उत्तर देऊन त्यास इतके दिवस थोपवून धरले आहे. पण सदर मनुष्य ब्यागा भरून तयार असून, कुटुंबकबिल्यानिशी तांबडी यष्टी पकडून मुंबईक येण्याचे त्याने ठरवलेच आहे. हा कोकणी बाणा आहे. आल्याशिवाय तो काही राहणार नाही, असे दिसते. 
काही महिन्यांपूर्वी मखलाशी करून आम्ही सदर मनुष्यास 'डबा ऐसपैस' हा खेळ खेळावयास भाग पाडून त्याच्यावर राज्य आणले. त्यास खांबाशी डोळे मिटून उभे केले व लपलो!! दर पंधरा मिनिटांनी तो आता 'रेडी क्‍का? रेडी क्‍का?' असे डोळे मिटून ओरडत आहे. माझा प्रॉब्लेम असा आहे की मला लपायला सोयच नाही!! मला दडवेल, असा कुठलाही खांब येथे नाही!! काय करू? मार्गदर्शन करावे. आपला विनीत. फडणवीस नाना. 

ता.क. : सदर मनुष्याला दोन मुलगे आहेत. दोनच आहेत, पण डझनभरांना भारी आहेत!! प्याकेजमध्ये ते दोन्ही मुलगेही इन्क्‍लुडेड आहेत असे कळते. कृपया योग्य ते (किंवा काहीतरी) करावे. आपला. नाना. 
* * * 
प्रिय मित्र नाना, 

आमच्या हाडवैऱ्यास जो पनाह देईल, त्याची हालत काय होईल, हे आपण जाणताच. विस्तवाशी खेळत आहात, सावध राहा!! कोकणातील एक खुंखार इसम आपण आपल्या कटकात सामील करोन घेत असल्याच्या वावड्या कानोकानी येत आहेत. दोन ईसा पाच वर्षांची आण!! त्या गद्दार माणसास पनाह दिलीत तर तुमची काही खैर नाही! बरे जाणोन असा. बाकी ईश्‍वरेच्छा बलियसी. उधोजी. 
* * * 
प्रियतम बाळक कु. नानाभाई, आपडो खत मळ्यो... कोकणच्या ते दादा हाएत ना, ते मने अमदावादमधी भेटून गेले हाएत. च्यांगला माणस हाएत. आपडे जोईए. पण एने कहो के सबर नां फल पछी मिठ्‌ठू थाय छे. दाल बगडे तो दिवस बगडे अने अथाणु बगडे तो वरस बगडे! कछु सांभळ्यो? इंतजार करो. आपडा. अमितभाई. 
* * * 
प्रिय स्नेही ती. दादासाहेब, स. न. वि. वि. 

माझ्या घरातील फोनचे बिल न भरल्याने लाइन काटण्यात आली असून, मोबाइलची ब्याटरी सपशेल डाऊन झाल्याने आपल्याशी संपर्क होऊ शकला नाही. आपण ब्यागा भरून कुटुंबकबिल्यासहित तयार आहात आणि मुलग्यांना मुंबईक जाण्यासाठी म्हणून नवे कपडे शिवल्याचेही कळले. चांगली गोष्ट आहे. पण इतकी घाई कशाला करता? गणपतीच्या दिवसांत अवघी मुंबई यष्टी किंवा कोकणकन्या पकडून कोकणात जायला निघते. तुम्ही त्याच टायमाला उलटा प्रवास कशाला करता? एवढे गणपती येऊन जाऊ देत. मग बघू. कळावे. आपलाच लाडका. नाना. 

ता. क. : तूर्त एकटेच या...कुटुंबकबिल्यासमवेत नको! मुंबईत जागेची किती अडचण आहे, हे तुम्ही जाणताच. नाना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.