भारत-चीन यांच्यात जणू उद्या-परवाच युद्धाला तोंड फुटेल अन् पुढच्या चार-दोन दिवसांत आपण थेट सीमेवर लढायला हातात बंदुका घेऊन उभे असू, असा ज्वर अंगी भरलेल्या भारतातल्या सोशल मीडियाचे पाय भ्रमाच्या वातावरणातून थेट जमिनीवर टेकविणाऱ्या दोन घटना गेल्या तीन-चार दिवसांमध्ये घडल्या. पहिली घटना "कॅग'च्या संरक्षणविषयक अहवालाची. भारतीय उपखंडावर युद्धाचे ढग जमा होत असल्याचं वातावरण एकीकडे अन् आपली युद्धसज्जता मात्र दहा दिवसांची, असा पर्दाफाश देशाच्या महालेखापालांच्या अहवालाने केला. लष्कराच्या भांडारात जेमतेम दहा दिवस पुरेल इतकाच दारूगोळा शिल्लक असल्याचा, "बोफोर्स' तोफेला पर्याय म्हणून विकसित केलेल्या "धनुष'चे चीनमधून येणारे सुटे भाग दुय्यम दर्जाचे, हा त्या अहवालातला धक्का डोळे खाडकन उघडवणारा ठरावा.
दुसरी घटना थेट सोशल मीडियाशी संबंधित आहे. "चला चीनला धडा शिकवूया, सगळ्या चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकूया', अशा पोटतिडकीच्या आवाहनांचा मारा गेले काही दिवस सोशल मीडियावर सहन करताय ना! "चिनी वस्तू नाकारण्याची सुरवात फेसबुकपासून करा, कारण मार्क झकेरबर्गची बायको प्रिसिला चान हीच चिनी आहे', हा गमतीदार संदेशही बहुतेकांनी वाचला असेल; पण भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर, प्रिसिलाच्या देशात सोशल मीडियावर काय चालू आहे? मावळत्या आठवड्यातला चीनमधल्या सोशल मीडियाचा वापर सांगतो, तिथल्या युवा पिढीच्या, सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या लेखी भारत सीमेवरचा तणाव दखलपात्रच नाही. आपल्याकडे "व्हाटस्ऍप'पासून "फेसबुक'पर्यंत सगळीकडे चीनला धडा शिकवायच्या आणाभाका, चिनी वस्तूंवरील बहिष्काराचे आवाहन, बहुतके सगळ्यांना त्या व्यापारातलं सगळं अर्थशास्त्र तोंडपाठ हे सारं सुरू असताना चीनमध्ये मात्र तसं काहीच नाही. आपल्याकडं कधी पाकिस्तानविरुद्ध, तर कधी चीनविरुद्ध भडास काढायची सोशल मीडियातली साधन आहेत "फेसबुक' व "ट्विटर'. त्यांच्या अतिरेकी वापरामुळंच देशभर जणू युद्धसदृश्य वातावरण तयार झालं आहे. पाकिस्तान सीमेवरही कुरापती सुरूच आहेत. आपली सोशल मीडियाची सेना दोन्ही आघाड्यांवर लढतेय;
पण भारतातला सोशल मीडिया पूर्णपणे चीनच्या मुद्यावर व्यापला असताना "ड्रॅगन' मात्र सुस्त आहे. तो ना विषारी फूत्कार टाकतोय, ना त्याच्या मुखातून ज्वाळा निघताहेत. गेल्या शुक्रवारी व शनिवारी "वाइबो' या चीनच्या अधिकृत "मायक्रोब्लॉगिंग साइट'वरच्या "टॉप 50 ट्रेंडिंग टॉपिक्स'मध्ये भारताशी संबंधित काहीच नव्हतं. मुळात दक्षिण कोरियातला कुठलासा टीव्ही शो व एका चीन युवकाला अमेरिकेत वाईट वागणूक हे दोनच विषय विदेशांशी संबंधित होते. "टॉपमोस्ट ट्रेंड'वर जवळपास नऊ कोटी लोक प्रतिक्रिया देत असताना, पन्नासाव्या क्रमांकावरील "ट्रेंड'वर प्रतिक्रियांची संख्या 39 हजारांवर असताना भारत-भूतान सीमेवरील तणावात मात्र चार-दोन हजारांपेक्षा अधिक चिन्यांना रस नव्हता.
चीनमधलं सोशल मीडियाचं जाळं
"ट्विटर', "फेसबुक', "इन्स्टाग्राम' किंवा "व्हाटस्ऍप' ही पश्चिमेकडून आलेली सोशल मीडियातली माध्यमं भारतात मोठ्या संख्येनं वापरली जातात. त्या सगळ्यांवर चीनमध्ये बंदी आहे. "वुईचाट' हे व्यक्तिगत संपर्काचे ऍप 93 कोटी चिनी लोक वापरतात. त्यावर व्हिडिओंचा आकार व वेळेची मर्यादा आहे. "सिना-वाइबो' किंवा "वाइबो' ही "मायक्रोब्लॉगिंग साइट' "ट्विटर'पेक्षा सरस आहे. प्रत्यक्षात ते "फेसबुक' व "ट्विटर'चं "हायब्रीड व्हर्जन' आहे. "ट्विटर'सारखी "वाइबो'वर 140 "कॅरेक्टर'ची मर्यादा नाही. "वाइबो'ची पहिली पोस्ट कितीही शब्दांची असू शकते. प्रतिक्रियांना मात्र शब्दमर्यादा आहे. "ट्विटर' व "वाइबो'चे एकूण "रजिस्टर्ड युजर्स' जवळपास सारखेच म्हणजे 65-70 कोटींच्या घरात असले तरी दरमहा मासिक वापरकर्त्यांच्या संख्येबाबत "वाइबो'नं गेल्या मार्चमध्येच "ट्विटर'ला मागे टाकले. "वाइबो'चे "मंथली ऍक्टिव्ह युजर्स' 34 कोटी, तर "ट्विटर'चे 32 कोटी 80 लाख आहेत. "ट्विटर'चे "डेली ऍक्टिव्ह युजर्स' 10 कोटी, तर "वाइबो'चे पंधरा कोटी 40 लाख आहेत. "दंगल' सिनेमा चीनमध्ये दाखल होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "वाइबो'वरील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय होते. मे महिन्यात आमीर खानने तो मान पटकावला. त्याचे पावणेसात सात- लाख "फॉलोअर्स' आहेत. गेल्या महिन्यात "ट्विटर'वर दहा कोटी "फॉलोअर्स'चा ऐतिहासिक टप्पा गाठला म्हणून गायिका कॅटी पेरी हिचं जगभर कौतुक झालं; पण चीनमधल्या "हॅप्पी कॅम्प' टीव्ही शोमधील जोडी हे जिआँग व शी ना या दोघांची नऊ कोटींपेक्षा अधिक "वाइबो फॉलोअर्स'सह अनुक्रमे पुरुष व महिला सेलेब्रिटी म्हणून गेल्या एप्रिलमध्ये "गिनेस'मध्ये नोंद झालीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.