स्टीव्ह वॉला गांगुलीनं चक्क शेपूट म्हटलं होतं

Cricket
Cricket

‘क्रिकेट हा सद्गृहस्थांचा खेळ आहे,’ असं एकेकाळी म्हटलं जायचं. आता म्हटलं तर तो अतिशयोक्ती-अलंकार होईल किंवा ज्याला इंग्लिशमध्ये Sarcasm म्हणतात तशी ती वक्रोक्ती होईल. क्रिकेटमध्ये पूर्वी खेळाडूंच्या दुर्वर्तनाबद्दल शिक्षा देणारे कायदे असे काहीही नव्हते.

सुरुवातीला त्रयस्थ पंच आले. मग मॅच रेफरी आला. आता डीआरएस आलंय. त्याचबरोबर लेवल एक, लेवल दोन आणि लेवल तीनच्या अपराधांसाठी चक्क पीनल कोडही आलंय. दंडही आलेले आहेत. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टींची पूर्वी कधीही गरज नव्हती. कारण, क्रिकेट हा सद्गृहस्थांचा खेळ मानला जायचा. अर्थात्‌, त्या वेळी सद्गृहस्थाच्या व्याख्येला आव्हान देणारी मंडळीही होती.

अगदी एटीकेट्स पाळणाऱ्या इंग्लडमध्येसुद्धा! डब्ल्यू. जी. ग्रेस हा इंग्लिश क्रिकेटचा पितामह. एकदा त्याला पंचानं बाद दिल्यानंतर त्यानं पंचाला सरळ सांगितलं :‘‘बाद कसला देतोस? लोक मला पाहायला आलेले आहेत. तुला नाही.’’ आणि तो थेट खेळायलाही लागला. 

इंग्लडंच्या फ्रेडी ट्रुमन या गोलंदाजाची जीभ ही शिव्यांची, अपशब्दांची आणि अपमानित करणाऱ्या विशेषणांची ओसरी होती! शब्द वाटच बघत असायचे जिभेवरून बाहेर उडी घेण्यासाठी. सभ्य शब्दांना तिथं मज्जाव होता. एकदा रमाकांत देसाईनं ‘लॉर्ड्‌स’वर त्याला षटकार ठोकला. काय बोलला असेल तो रमाकांतला? तो म्हणाला : ‘‘पुन्हा जर असं काही केलंस ना, तर मी तुला मागच्या साईट स्क्रीनवर बॉलनं चिकटवून टाकेन.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खरं सांगायचं तर आजच्या काळाचा जर विचार केला तर आजच्या पिढीला हे कदाचित ‘बोबडे बोल’ वाटतील! कारण, हे असं बोलणं हे आजचे क्रिकेटपटू त्यांच्या बालवाडीत शिकतात! ऑस्ट्रेलियानं ‘गेम्समनशिप’ या नावाखाली त्याचे वेगवेगळे कोर्सेसच सुरू केलेले आहेत आणि मग त्या कोर्सेसच्या शाखा जगभर पसरत गेल्या. भारतातही निघाल्या. सौरभ गांगुलीनं तर चक्क महाविद्यालय उभारलं! गांगुली हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पुरून उरणारा असा माणूस होता. म्हणजे ऑस्ट्रेलिया ‘आ रे’ म्हणाला तर तो ‘का रे’ म्हणायला अजिबात कचरायचा नाही. एकदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ हा फलंदाजीला आला. काय केलं असेल गांगुलीनं? तो स्लिपमधून ओरडला : ‘‘कमॉन बॉईज्‌, नाऊ द ऑस्ट्रेलियन टेल हॅज बिगन.’’ 

म्हणजे स्टीव्ह वॉला त्यानं चक्क शेपूट म्हटलं होतं. हत्तीच्या गंडस्थळाला कपाळ म्हणण्यासारखी ती गोष्ट होती; पण गांगुली या गोष्टी ऑस्ट्रेलियन मंडळींकडूनच शिकला होता. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्येसुद्धा कधी काळी ‘सभ्य गृहस्थ’ होते यावर माझा आज विश्वासच बसत नाही. ओल्डफील्ड नावाचा त्यांचा एक यष्टिरक्षक होता. तो फलंदाज जर बाद असेल तर अपील करायचा; पण अत्यंत अदबीनं. ‘आपण करतोय त्याची आपल्याला खंत वाटते, नाइलाज आहे म्हणून हे करतोय,’ अशा प्रकारच्या आविर्भावात तो अपील करायचा. त्यामुळे त्याच्यावर सर Neville cardus नं फार सुंदर लिहिलं होतं. त्यानं असं लिहिलं होतं : ‘‘He appeals with ball in one hand and apology in the other.’’  आज जगातल्या कुठल्याही यष्टिरक्षकाला हा जर किस्सा सांगितला तर तो त्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण, ही गोष्ट म्हणजे कसायाला बकऱ्याबद्दल प्रेम वाटण्यासारखं आहे!

आज यष्टिरक्षकाचं काम फक्त यष्टिरक्षण करणं एवढंच नसतं, म्हणजे यष्टिरक्षण करण्याबरोबरच आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला कराव्या लागतात. एक, आपल्या गोलंदाजांना प्रोत्साहन देणं. या कामाबद्दल कुणाचं विरोधी मत असू नये. आणि दुसरं काम म्हणजे, मागं उभं राहून, येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाचा तेजोभंग करणं...

जसा कर्ण-अर्जुनयुद्धात श्रीकृष्ण कर्णाचा वारंवार करत होता तसा. अपील अत्यंत नाट्यपूर्ण करायचं हे तर ठरून गेलेलं. अपीलचा ‘पोवाडा’ हा यष्टिरक्षकानं म्हणायचा आणि स्लिपमधल्या आणि इतर क्षेत्ररक्षकांनी ‘जी जी’ म्हणायचं! म्हणजे, फलंदाज पायचीत झालाय हे ज्या खेळाडूंना नीट दिसतही नाही असे खेळाडूसुद्धा बऱ्याच वेळा अपील करण्यात सहभागी झालेले मी पाहिलेले आहेत. अर्थात्‌, आता हे हळूहळू कमी झालं आहे. कारण, डीआरएसचा नियम आला. त्यामागची भूमिका अशी असायची की जर एखादा फलंदाज बाद होत नसेल तर वारंवार अपील करून त्याच्यावर दबाव टाकायचा आणि त्याचबरोबर पंचांवरही दबाव टाकायचा. अर्थात्‌, आता डीआरएसमुळे असं घडत नाही. कारण, जर फलंदाजाला वाटलं की तो बाद नाहीये तर फलंदाज लगेच डीआरएस घेतो. मग, ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊन जातं.

आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही असे काही खेळाडू किंवा अशा काही गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. म्हणजे, अगदी लहानपणची मी आठवण सांगतो. मुंबईत सन १९६७ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडीज असा कसोटी सामना होता आणि भारताच्या दुसऱ्या डावात ग्रिफिथच्या गोलंदाजीवर सोबर्सनं स्लिपमध्ये झेल घेतला आणि कुंदरन बाद झाला. ग्रिफिथनं अपील केलं आणि पंचांनी त्याला बाद दिलं. कुंदरन पॅव्हेलियनकडे जायला निघाला होता. इतक्यात सोबर्सनं त्याला थांबवलं आणि त्यानं पंचांना सांगितलं की, ‘‘मी कॅच नीट घेतलेला नाहीये, तो जमिनीवर पडून माझ्या हातात आलाय.’’ कुंदरनला परत बोलावण्यात आलं आणि कुंदरननं नंतर ७९ धावांची झंझावाती खेळी केली. अर्थात्‌, वेस्ट इंडीजनं तो सामना जिंकला; पण तो सामना जिंकताना त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले.

असाच एक आपला महात्मा म्हणजे विश्वनाथ. विश्वनाथला जर कधी असं वाटलं की तो बाद झालाय तर विश्वनाथ कधीही थांबलेला नाही. तो निघून गेलेला आहे. त्यानं पंचांच्या बोटाकडे बघण्याची तसदीसुद्धा घेतलेली नाही. आणि असेसुद्धा बरेच प्रसंग घडले असतील की, ज्या वेळी विश्वनाथ बाद नसतानासुद्धा त्याला बाद दिलं गेलेलं आहे आणि पंचांनी बाद द्यायच्या आत, आपण निघून जातोय, या गोष्टीचा विश्वनाथला कधी पश्चात्ताप झालेला नसेल. 

सन २०११ च्या वर्ल्ड कपनंतर जेव्हा भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेला तेव्हा इयान बेलला आपला यष्टिरक्षक आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानं अशाच परिस्थितीत परत बोलावलं होतं. त्यानंतर अर्थातच असं फार क्वचित घडलंय. जर घडलं असेल तर मला ठाऊक नाही आणि आता घडण्याची शक्यताही कमी आहे. आता डीआरएस आलं, नवीन नवीन नियम आले, त्यामुळे फलंदाज बाद आहे की नाही, हे लगेच कळून चुकतं. फलंदाजाला दया दाखवणं ही गोष्ट आता जुनाट झालेली आहे. धर्मराज व्हायचं की कृष्ण? आजच्या पिढीनं कृष्ण स्वीकारला आहे. उघडा होऊन, सुदर्शन चक्राप्रमाणे गर गर शर्ट फिरवणारा गांगुली हा त्याचं प्रतीक आहे!
(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com