‘शिकारी’ माशाचा ‘खेळ’ (विश्वास नांगरे-पाटील)

Article in Saptraga by Vishwas Nangre Patil on Blue Whale Game
Article in Saptraga by Vishwas Nangre Patil on Blue Whale Game
Updated on

‘ब्लू   व्हेल’ या मोबाईल गेमनं गेल्या आठवड्यात मुंबईत एका मुलाचा जीव घेतला. कुटुंबव्यवस्था, पालकांचा मुलांशी संवाद आणि इंटरनेटचं घोंघावतं मायाजाल असे अनेक विषय त्या निमित्तानं ऐरणीवर आले आहेत. या घटनेनं सर्व घरांत सुन्न आणि भीषण भीती निर्माण झाली आहे. या घटनेत नेमकं काय घडलं आहे, तो मुलगा त्या गेमच्या आहारी का गेला आणि क्रूर नियतीनं या मुलाचा का ‘गेम’ केला, असे अनेक अनुत्तरित प्रश्‍न डोक्‍यात काहूर माजवू लागले आहेत.

हा गेम रशियात सुरू झाला. एका रशियन तरुणानं ‘ज्यांचं मन कमजोर आहे त्यांना जगायचा हक्क नाही, म्हणून त्यांच्यासाठी आत्महत्येचा महामार्ग’ या गेमद्वारे ‘सुकर’ करून दिला आहे. हा गेम प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे. तो एकदा डाऊनलोड केला, की तो अनइन्स्टॉल करता येत नाही. या गेममध्ये पन्नास दिवसांसाठी रोज एक टास्क दिली जाते. त्यात स्वतःच्या हातावर ब्लेडनं ब्लू व्हेलचं चित्र काढणं, हॉरर सिनेमे पाहणं, पहाटेच्या वेळी उंच ठिकाणी जाणं, उंच इमारतीवरून उडी मारणं अशा टास्क रोज संकेतांच्या भाषेत दिल्या जातात. रशियात ज्या शंभरवर आत्महत्या झाल्या, त्यांत बारा ते सोळा या वयोगटातलीच मुलं आहेत, असं दिसतं. या गेमचा शोध लावणाऱ्या तरुणाला अटक झाली आहे; पण त्यानं निर्मिलेला राक्षस आज अनेक कुमारवयीन जीवांशी क्रूरपणे खेळताना दिसत आहे.

मोबाईलची ‘गुलामगिरी’
थोडं या मोबाईल क्रांतीमुळं भारतीय समाज आणि कुटुंबव्यवस्थेवर झालेले परिणाम तपासुयात. गेल्या काही वर्षांत आपली संवादाची भाषा बदलली आहे. आपण वायरलेस फोनच्या गर्तेत खोलवर अडकलो आहोत. त्याच्याशिवाय आपलं पानसुद्धा हलत नाही. पूर्वी केबलचा फोन असायचा आणि आपल्याला त्याला चिकटून बोलावं लागायचं. आता फोनला केबल चिकटलेली नाही; पण तो फोन-मोबाईल मात्र आपल्याला २४/७ चिकटला आहे. जणू काही हा मोबाईल आपल्या शरीराचा अविभाज्य भागच. इंटरनेटचं जंजाळ तर मनाच्या आणि शरीराच्या प्रत्येक अंगाला गुरफटलं आहे. गुंता एवढा भयानक आहे, की अनेकदा प्रयत्न करून त्याच्यातून काही मिनिटांसाठीसुद्धा सुटका करून घेणं अशक्‍य झालं आहे. मोबाईल आणि इंटरनेट सोबत नसेल, तर जीव कासावीस होतो, कुणी तरी आपल्यापासून जगायला आवश्‍यक असणारा ऑक्‍सिजन काढून घेतला आहे का, असं वाटायला लागतं. ही एकविसाव्या शतकातली ‘गुलामगिरी’ बीभत्स रूपानं बाहेर पडू लागली आहे. ड्रग्ज, सेक्‍स, हिंसा, आत्महत्या, नैराश्‍य अशा नानाविध व्याधी या नवसंस्कृतीतून निर्माण झाल्या आहेत.

मी तीन रेव्ह (ड्रग्ज) पार्ट्यांवर छापे घातले आणि अनेक तरुण-तरुणींवर कारवाई केली म्हणून खूप गदारोळ झाला होता. तिन्ही रेव्ह पार्ट्यांचं निमंत्रण सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. आयसिस या दहशतवादी संघटनेनं इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणांना आपल्या कडव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली आणून आपल्या जाळ्यात ओढलं आहे. जात, धर्म, पंथ, भाषेच्या नावावर रोज लाखो विषारी पोस्ट शेअर केल्या जातात. जातीय तणाव वाढतात आणि दंगली घडवून आणल्या जातात. मुळात हे सगळं संसर्गजन्य आहे. खूप वेगानं फोफावलं आहे. प्रत्येक घरात घुसतं आहे आणि मनात घर करून बसलं आहे. त्याच्या नियमनासाठी आचारसंहिता कशी बनविता येईल, त्यात वय, दर्जा, शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्‍वभूमी यांचा विचार कसा करता येईल, यावर विचारमंथन सुरू आहे.

मोबाईलरूपी चिकटपट्टी
लहान मुलांच्या हातात हा भस्मासुर पालकच देतात. हातात मोबाईल आल्याबरोबर मुलं चिडीचूप होऊन जातात. वाद घालत नाहीत, हट्ट करत नाहीत किंवा त्रासही देत नाहीत. रोबोसारखी मोबाईलमध्ये नजर घुसवून, मान खाली घालून तासन्‌ तास मंत्रमुग्ध अवस्थेत मग्न होऊन जातात. अलीकडंच मुक्ता पुणतांबेकर यांचा एक लेख माझ्या वाचनात आला होता. त्यांच्या व्यसनमुक्ती केंद्रात पालक सोळा वर्षांच्या त्यांच्या मुलाला घेऊन आले होते. तो इतका ‘इंटरनेट ॲडिक्‍ट’ झाला होता, की मोबाईलवर गर्क असताना त्याला पॅंटमध्ये मूत्रविसर्जन झालं, हेही कळलं नव्हतं. भयानक मानसिक आजाराचं हे प्रातिनिधीक उदाहरण असू शकेल. आई-बाबा नोकरीवर जातात. त्यामुळं मुलांना वेळ देता येत नाही. कुटुंबं छोटी असल्यामुळं मुलांचा संवाद कुणाशीही होत नाही. शाळेतली, मैदानावरची रूढ मैत्रीची संकल्पना आणि मैदानी खेळ हळूहळू कालबाह्य होऊ लागले आहेत. त्यामुळं इंटरनेटच्या व्हर्च्युअल जगात सेल्फी, लाइक्‍स, शेअरिंग आणि कॉमेंट्‌समध्येच त्यांच्या भावनिक संवादाचा ‘इमोजी’ झाला आहे. सगळं खोटं, बेगडी आणि कल्पनेतलं. वास्तविकता आणि तार्किकता यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पालकही मग मुलं गोंधळ घालत असतील, घरी एकटी असतील, घरात पाहुणे आले असतील, किंवा कार्यक्रमात किरकिर करत असतील, तर मुलांच्या तोंडाला मोबाईलरूपी चिकटपट्टी बांधतात. मग काय ‘तेरी भी चूप मेरी भी चूप.’ अनेक हिंसक गेम्समुळं मुलांच्या संवेदनाही बोथट होऊन ती आक्रमक बनतात. त्यांचा निसर्गसुलभ खोडकरपणा, बागडणं बंद होऊन जातं आणि ती बनतात उर्मट, आक्रमक आणि भावनिक अतिरेकानं ओतप्रोत अशी ‘बालराक्षस.’ त्यांच्या भौतिक मागण्या वाढत जातात. त्यांच्या मनाचा ओढा चंगळवाद आणि व्यसनाधीनतेकडं अधिकाधिक वाढतो. ‘स्नॅपचॅट’, ‘व्हॉट्‌सॲप’, ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’वर आपली नको ती चित्रविचित्र चित्रं ही मुलं बेदरकारपणे अपलोड करतात आणि इंटरनेटवर अनेक मुलं कामांध व वासनांध अशा प्रिडेटरच्या जाळ्यातही ओढली जातात.

फक्त संवाद हे उत्तर?
प्रत्येक जण म्हणतो, की यावर उत्तर एकच आहे- ते म्हणजे आई-वडिलांचा मुलांशी असणारा संवाद वाढवणं, त्या संवादाला विधायक आणि क्रियाशील बनवणं, एकमेकांना वेळ देणं. अर्थात पालक असं करत नाहीत असं नाही. अनेक पालक पूर्ण वेळ देऊनही हे झंझावाती संकट रोखू शकत नाहीत. कुमारवय अत्यंत स्फोटक असतं. अमेरिकेत एक सर्वेक्षण झालं आहे. बारावीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिथं मुलं अंदाजे वीस हजार तास इंटरनेटवर असतात. त्यात ती हजारो खून, आत्महत्या आणि बलात्कार पाहतात आणि लाखाच्यावर पोर्नोग्राफीक क्‍लिप्स पाहतात, असे त्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत. खरं तर याच वयात मेंदूचा पुढचा भाग विकसित होत असतो. चांगल्या-वाईटाची समज नसते. त्यामुळं मुलं भावनिक द्वंद्वातून प्रवास करत असतात. त्यांना समजून घेणं हे खूप जिकिरीचं असतं. अनेकदा ती खोटं बोलतात, आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात. पालकांनी त्यांना एकदम उघडं पाडलं, तरी त्यांच्या भावनिक कोंडीचा विपरीत स्फोट होतो. त्यामुळं प्रश्‍न अजून चिघळतात आणि अनेकदा हाताबाहेर जातात. माझ्या एका पोलिस निरीक्षकाच्या मुलानं तर समजावून सांगणाऱ्या आईवर सपासप वार करून गळाच चिरला. तो म्हणे तिच्या कटकटीला वैतागला होता. सहनशक्ती, संयम या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्त्वातून गायब होऊ लागल्या आहेत. मोबाईल दिला तरी प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. त्यांचे टॅंट्रम्स आणि मूडची स्थित्यंतरं हे आकलनाच्या पलिकडे झाले आहेत.

यावर काय मार्ग? टीनएजर मुलांना कसं सांभाळायचं, त्यांच्यावर बंधनं कशी ठेवायची, त्यांना जबाबदारीची जाणीव कशी करून द्यायची? आयफोन भेट देताना एका आईनं आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला लिहिलेलं पत्र माझ्या वाचनात आलं होतं. ते पत्र म्हणजे पालकांनी मुलाशी केलेल्या कराराचा एक आदर्श नमुनाच. मोबाईल देताना मुलाकडून असणाऱ्या तिच्या अपेक्षा तिनं स्पष्ट आणि निःसंदिग्ध शब्दांत मांडल्या आहेत. ती या पत्रात म्हणते ः ‘तंत्रज्ञानाबरोबर तुला सहजीवन जगताना एक तंदुरुस्त आणि सर्वगुणसंपन्न युवक बनवणं हीदेखील आम्हा पालकांची जबाबदारी आहे आणि ज्या अटी या करारात आम्ही करत आहोत, त्यांचं पालन केलं नाही, तर तुझा आयफोन काढून घेण्यात येईल. हा फोन माझा आहे, तो मी विकत घेतला आहे आणि तुला तो उसनवारीनं दिला आहे. बरं, मला त्या फोनचा पासवर्ड नेहमी माहीत असेल. तो फोन वाजला, तर तो रिसिव्ह कर. ‘मम्मी’ व ‘डॅडी’ असे शब्द स्क्रीनवर दिसले, तर टाळू नकोस. रोज शाळेच्या दिवशी साडेसात वाजता आणि सुटीच्या दिवशी नऊ वाजता तू तो फोन आई किंवा बाबांच्याकडे जमा करशील. फोन करायचा असेल, तर रात्री तू लॅंडलाइनवरून कर आणि हो, फोन तुझ्यासोबत शाळेत जाणार नाही. तू मित्रांशी संवाद साधावास, मधल्या सुटीत, सहलीच्या वेळी, शाळाबाह्य वेळेत तू खूप गप्पा माराव्यास. हे सुखी आणि आनंदी सहजीवनाचं गुपित आहे आणि हो, हा फोन कुणाला फसवण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी किंवा मूर्ख बनवण्यासाठी वापरणार नाहीस.

दुसऱ्याला दुखावणार नाहीस. तू समोरासमोर जे प्रत्यक्ष बोलू शकणार नाहीस, असं कोणालाही काहीही टेक्‍ट करू नकोस. त्यांच्या पालकांसमोर जे मोठ्यानं बोलता येणार नाही, असेही ई-मेल किंवा मेसेजेस तू त्यांना पाठवणार नाहीस. अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ, स्ट्रिक्‍टली नाही. माझ्याशी बिनधास्तपणे शेअर करू शकशील, अशीच माहिती तू इंटरनेटवर शोधशील आणि याबाबत तुझ्या मनात कोणतीही द्विधा असेल तर मला किंवा बाबांना विचारशील...आणि हो, तू सार्वजनिक ठिकाणी असशील, सिनेमा बघत असशील, रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवत असशील किंवा कोणाशी बोलत असशील, तर कृपया फोन बंद कर. किमान तो ‘सायलेंट’ कर. तुझी प्रतिमा उर्मट मुलगा अशी नाहीय. त्यामुळं तुझ्या फोनमुळं तुझं नकारात्मक प्रतिमेत रूपांतर करू देऊ नकोस. तुझ्या स्वतःच्या किंवा इतरांच्या खासगी अवयवांची चित्रं कुणाला पाठवून नकोस. हसू नकोस! तू हुशार मुलगा असलास, तरी एके दिवशी असं काही तरी करण्याचा मोह तुला आवरता येणार नाही. हे अत्यंत घातक आहे आणि त्यामुळं तुझं कुमारवय, तारुण्य आणि शिक्षण तिन्ही धोक्‍यात येऊ शकतं. सायबरची दुनिया ही अत्यंत विस्तारलेली आणि आक्रमक आहे आणि तुझ्यापेक्षा खूप अधिक शक्तिशाली आहे आणि एकदा त्यात तुझ्या एखाद्या मूर्खपणाच्या विकृत कृतीनं शिरकाव केला, तर त्याला त्या सायबर विश्‍वातून काढून टाकणं केवळ अशक्‍य आणि दुरापास्त आहे. तुझी बदनामी तुला आयुष्यभर चिकटून राहील आणि भुतासारखी झपाटेल. प्रत्येक क्षणी स्वतःचे सेल्फी आणि व्हिडिओ काढू नकोस. प्रत्येक खासगी गोष्ट सार्वजनिक करण्याची गरज नाही. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाचा आणि क्षणांचा निरपेक्षपणे आनंद घे. या सगळ्या गोष्टी तुझ्या स्मरणात आयुष्यभर राहतील. कधी तरी घरी फोन ठेवून बघ. तो तुझ्या सजीव शरीराचा भाग नाही. त्याच्याशिवायही जगून बघ. ते वेगळं आणि अधिक हॅपनिंग असेल. आणि हो...खूप चांगलं, अर्थपूर्ण आणि शास्त्रीय संगीत तू या फोनवर ऐकू शकतोस. तुझे मित्र ऐकत असतील अशा त्याच त्या ट्युन्समध्ये अडकू नकोस. तुझी क्षितिजं खूप-खूप रुंदावतील आणि अधिकाधिक या फोनला तुझा विधायक आणि सर्जनशील साथीदार बनवशील. तुझ्या मेंदूला आणि बौद्धिक क्षमतांना प्रगल्भ बनविण्याचा आणि आव्हान देणाऱ्या गेम्स खेळायला हरकत नाही. डोळे वर आणि नजर समोर ठेव. सभोवताली काय घडतंय याची जाणीव तुला असू दे. खिडकीतून डोकावून पाहा. पक्ष्यांची किलबिल ऐक, अनोळखी व्यक्तींशी बोल आणि ‘गुगल’ न करताही भटकंती कर.’

मोबाईलचा सकारात्मक वापर
खूप बोलके आहेत आईचे हे शब्द. सगळ्यांनी हे सगळं समजून आणि उमजून घेण्यासारखं आहे. मुलं कशी भराभर वाढतात. त्यांच्या आकांक्षांचे पंख खूप वेगानं अवकाशात झेपावतात. हे सगळे नियम खरं तर रोजची दिनचर्या कशी असावी, यासाठीही चपखल लागू आहेत. अलीकडेच मी आयएएस टॉपर प्रांजल पाटीलचा सत्कार केला. देवानं तिला दृष्टी दिली नाही; पण दूरदृष्टी मात्र भरभरून दिली आहे. तिनं यूपीएससीच्या अभ्यासासाठी मोबाईल आणि इंटरनेटचा पुरेपूर उपयोग करून घेतला. नेटवर अनेक भाषणं ऐकली. ‘इंडिया आफ्टर गांधी’ या रामचंद्र गुहांच्या पुस्तकाची तर युट्यूबवर पारायणं केली. अनेक अभ्यासांचे ऑडियो तिनं मोबाईलवर डाऊनलोड केले आणि त्यांचा खूप जिद्दीनं अभ्यास केला आणि डोळे नसणारी ही वीरांगना देशात टॉपरच्या यादीत झळकली.

पालकांनो वेळीच जागे व्हा आणि आपल्या नव्या पिढीला त्यांच्या उत्तुंग स्वप्नांना गाठायला मदत करा. त्यांच्या पायात वेटाळू पाहणाऱ्या विषारी सर्पांना वेळीच ठेचा. मला माहीत आहे- हे सगळं सांगणं सोपं आहे; पण प्रत्यक्षात अंमलात आणणं कठीण आहे. चुकीचं, फसवं, विकृत आणि बेगडी दुर्दैवानं खूप वेगानं पसरतं. चांगल्या आणि विधायक गोष्टी पसरायला जाणीवपूर्वक, पद्धतशीर प्रयत्न करावे लागतात. आज पालक, शिक्षक, माध्यमं, स्वयंसेवी संस्था आणि शासन या सर्वांनी एकत्र येऊन या घोंघावणाऱ्या आक्राळविक्राळ झंझावाताला कसं सामोरं जाता येईल, याची रूपरेषा ठरविली पाहिजे. काही बंधनं, नियम आणि आचारसंहिता घालून दिली पाहिजे.

समाजात हा चांगला संसर्गही विस्तारला, तर आपण अवकाळी येणाऱ्या वितुष्टांना थांबवू शकू. सरकारनं सायबर पोलिस ठाणी निर्माण केली आहेत, हे होकारात्मक पाऊल आहे; पण कोवळ्या जीवांच्या भावनिक विश्‍वाला चक्काचूर करणाऱ्या सायबर हल्ल्यांचा तपास करायचं काम या पोलिस अंमलदारांना करायची वेळच येऊ नये, अशी परमेश्‍वराला प्रार्थना. ‘हे ईश्‍वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही, ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे. ज्या गोष्टी बदलू शकतो, त्या बदलण्याचं सामर्थ्य दे आणि ज्या गोष्टी मी बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही, या दोन्हींमधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे,’ अशी एक प्रार्थना आहे. मला वाटतं, की हा बदल विधायक आणि होकारात्मक आणण्यासाठी आपण सगळेच जण जाणीवपूर्वक प्रयत्न करू या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.