यादव म्हणजेच मराठे? (सदानंद मोरे)

Article by Sadanand More in Saptaranga
Article by Sadanand More in Saptaranga
Updated on

मराठीच्या नगरीत म्हणजेच महाराष्ट्रात राहणाऱ्या व अर्थातच मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं कुळ आणि मूळ काय, याचा शोध घ्यायचा प्रयत्न आपण करत आहोत. ही आपल्या ‘निजात्मभावा’ची म्हणजेच आयडेंटिटीची चर्चा आहे.

‘महाराष्ट्राची निजात्मता’ असा शब्दप्रयोग मी केला असला, तरी त्याचा अर्थ असा होत नाही, की महाराष्ट्र हा एकसंध, एकजिनसी व एकदिली आहे. कोणत्याही मोठ्या समूहात अंतर्गत गट, तट, हितसंबंध, संघर्ष, एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे प्रयत्न असतातच; पण या बाबी गृहीत धरूनही त्यांना आपण एक असल्याची जाणीव असते. अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये या जाणिवेचं दर्शन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत झालं असल्याचं आपण जाणतोच.

निजात्मतेच्या जाणिवेला छेद देणाऱ्या घटकांमध्ये धर्म, जात, पक्ष, विचारसरणी आदींचा समावेश होतो. या प्रत्येक घटकाची स्वत:ची अशी निजात्मता असते ती वेगळीच. त्यामुळेच हे घटक आपल्या निजात्मतेला प्राधान्य देऊन ती जास्तीत जास्त सार्वत्रिक करून व्यापक समूहाच्या निजात्मतेवर लादण्याचा प्रयत्न करतात.

निजात्मभावाचा किंवा आत्मप्रत्ययाचा हा प्रश्‍न केवळ मानसिक नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याला इतर अगदी भौतिक पैलू व परिमाणंही असतात.

महाराष्ट्राच्या निजात्मतेचा शोध घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न राजारामशास्त्री भागवत यांचा होता. गेल्या लेखात राजवाडे यांच्या यासंबंधीच्या विचारांची चर्चा करत असताना त्यांच्या विचारव्यूहाला ‘थिसिस’ असं मी म्हटलं ते कालक्रमाच्या अंगानं नव्हे. भागवत यांचं लेखन खरंतर राजवाडे यांच्या थोडं अगोदरचंच. काही प्रमाणात राजवाडे त्याचाच प्रतिवाद करत होते. तथापि, राजवाडे यांच्या विचारांमधली गृहीतकृत्यं (उदाहरणार्थ : आर्य, अनार्य, आर्यांचं उत्तरेतून येणं इत्यादी) ही तेव्हाच्या विचारविश्वाचा भाग बनून मुख्य प्रवाह बनली होती. भागवत यांचा विचारव्यूह त्या सगळ्यांचा प्रतिवाद होता, म्हणून वैचारिक किंवा तार्किकदृष्ट्या राजवाडे यांच्या विचारव्यूहाची मांडणी अगोदर करून त्याला ‘थिसिस’ मानून भागवत यांच्या व्यूहाला त्याचा ‘अँटिथिसिस’ मानणं समजुतीच्या सोईसाठी अधिक उपयुक्त ठरेल.

एक गोष्ट पहिल्यांदा स्पष्ट करायला हवी आणि ती ही की धर्म-जाती-पंथ इत्यादींमुळे करण्यात येणारे भेद व त्या भेदांवर आधारित व्यवहार यांच्यापासून भागवत हे राजवाडे यांच्यापेक्षा कोसभर दूर आहेत. अशा प्रकारचे भेदाभेद त्यांच्या लेखनात औषधालासुद्धा सापडणार नाहीत. या अर्थानं ते अस्सल शंभरनंबरी महाराष्ट्रवादी आहेत. त्यांच्या लेखनातल्या जाती-धर्म-पंथ आदींचे उल्लेख व चर्चा ही वस्तुनिष्ठ आकलनासाठी अपरिहार्य म्हणूनच अवतीर्ण होते. ‘भागवत यांची स्वत:ची एक बाजू किंवा ‘हिडन अजेंडा’ होता व तो त्यांना शिताफीनं पुढं रेटायचा होता,’ असं त्यांच्या शत्रूलाही म्हणता येणार नाही. उलटपक्षी, राजवाडे यांचा ‘अजेंडा’ होता. इतकंच नव्हे तर, तो छुपा वगैरे नसून पूर्णपणे प्रकट होता आणि त्याचा उच्चार करायला ते मुळीच बिचकत नसत!

मुख्य विचारविश्वाचा प्रतिवाद करताना श्रीधर व्यंकटेश केतकर यांना ज्या प्रचलित द्वंद्वांना सामोरं जाऊन त्या द्वंद्वांना प्रतिसाद देत त्यासंबंधीची भूमिका मांडावी लागते, ती म्हणजे उत्तर-दक्षिण, ब्राह्मण-क्षत्रिय, शैव-वैष्णव, कर्मठ-नवे, आर्य-द्रविड, संस्कृत-प्राकृत इत्यादी.

स्वत: राजवाडे यांच्या समजुतीनुसार व तत्कालीन प्रचलित रूढ समजुतीनुसार आर्य वंशाचे लोक उत्तरेतून विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत आले. येताना त्यांनी आपली दैवतं, संस्था इत्यादी गोष्टी आणल्या. त्यांचा इथल्या लोकांशी संघर्ष झाला. या संघर्षात त्यांना काही तडजोडी कराव्या लागल्या असल्या तरी, स्थानिकांच्या काही गोष्टी स्वीकाराव्या लागल्या असल्या तरी शेवटी वर्चस्व त्यांचंच झालं.

यावर भागवत यांना काय म्हणायचं आहे, याची स्थूल रूपरेषा सांगून मग तपशिलांची चर्चा करू या.

***

‘उत्तरेत नंद राजांच्या काळापासून शूद्र राजे राज्य करू लागले. त्यांनी अवैदिक पंथांना पाठिंबा दिला. त्यामुळं हतबल व अगतिक झालेले उच्चवर्णीय, विशेषत: ब्राह्मण व क्षत्रिय हे आपल्या धर्माचं व सामाजिक संस्थांचं रक्षण व्हावं, या हेतूनं विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत दंडकारण्यात उतरले. तिथं त्यांनी आपल्या वसाहती केल्या. या वसाहतकारांमधला मुख्य समूह म्हणजे आयुधोपजीवी असलेला माहाराष्ट्रिक गण. त्यांच्यावरून हा प्रदेश महाराष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला,’ हे राजवाडे यांच्या मांडणीचं मुख्य सूत्र.

आता भागवत हे राजवाडे यांच्यासारख्या समकालीन प्रतिस्पर्ध्याचा प्रतिवाद करत आहेत, असं म्हणणं हे भागवत यांच्या विचारांचा संकोच केल्यासारखं व साहसाचं अवमूल्यन केल्यासारखं होईल. भागवत यांचा पल्ला, आवाका व झेप फार पुढची आहे. भागवत एकूणच प्रचलित पारंपरिक ग्रंथांमधल्या प्रतिपादनाला आव्हान देतात; मुख्यत: पुराणग्रंथांना, ज्या ग्रंथांवर राजवाडेच काय; परंतु सगळ्यांचीच मदार आहे, जे ग्रंथ सगळ्यांनाच आधारभूत आहेत. या पुराणग्रंथांनी विलक्षण उलथापालथ केली असल्याचं भागवत यांचं म्हणणं आहे. त्यातही ते वैष्णव पुराणांना त्यासाठी अधिक जबाबदार धरतात.

अर्थात भागवतांचं हे प्रतिपादन ‘स्वैर प्रलाप’ समजून सहजासहजी उडवून लावता येईल, अशा स्वरूपाचं नाही. भागवत यांचा आर्ष (वैदिक) आणि पाणिनीय संस्कृत व सर्व प्रकारच्या प्राकृत भाषा, व्याकरण व व्युत्पत्ती, इतकंच नव्हे तर, आर्य कुळातल्या गणल्या जाणाऱ्या इतरही काही भाषा यांचा चांगलाच अभ्यास होता; नव्हे त्यांच्यावर त्यांची पकड होती.

‘आत्मरक्षणार्थ उत्तरेतून, विशेषत: मगधातून दक्षिणेत आलेल्या अल्पसंख्य आर्य लोकांचा एतद्देशीय लोकांशी संबंध येणं हे केवळ साहजिकच नव्हे तर अपरिहार्य होतं. ‘एतद्देशीय लोक म्हणजे नागलोक,’ असं राजवाडे यांचं मत आहे. हे नागलोक वंशानं व संस्कृतीनं कमी दर्जाचे होते. त्यांच्याशी झालेल्या संकराचा परिणाम उत्तरेतून आलेल्या त्रैवर्णिक आर्यांवर झाल्याशिवाय राहणार नव्हता. राजवाडे यांच्या मतानुसार, ‘हा परिणाम ब्राह्मणांमधल्या यजुर्वेदी, त्यातल्या त्यात कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मणांवर अधिक झाला, तर आर्य क्षत्रियांचा व नागलोकांचा संकर होऊन मराठे निर्माण झाले.’ अर्थात, ज्या क्षत्रियांनी स्वत:ला अशा संकरापासून अलिप्त ठेवलं, त्यांची गणना राजवाडे उच्च दर्जाच्या मराठ्यांमध्ये करतात. छत्रपती शिवाजीमहाराजांचं भोसले कुळ त्यांच्या मते असं शुद्ध व उच्च दर्जाचं होय. राजवाडे यांच्या या मताचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा जातीचे आपोआपच दोन गट होतात. ते म्हणजे ‘एतद्देशीय कमतर संस्कृतीचा नागलोकांशी संबंध न येऊ द्यायची दक्षता घेऊन आर्यत्व जपणारे मराठे आणि नागलोकांशी संकर होऊन आर्यत्वात घट झालेले सर्वसाधारण मराठे.’ महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे, ‘उत्तरेकडील शुद्ध आर्य रक्ताच्या क्षत्रियांनी नेतृत्व करीत शुद्ध आर्य रक्ताच्या ब्राह्मणांच्या सहकार्याने कमी प्रतीच्या क्षत्रियांना कामाला लावून केलेला उद्योग,’ असा याचा अर्थ होतो. राजवाडे यांच्या या मांडणीमुळं महाराष्ट्र एकजिनसी राहण्याचं बाजूलाच; पण उलट जातीजातींमध्ये, इतकंच नव्हे तर, पोटजातींमध्येही शुद्धाशुद्धतेची, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची चढाओढ सुरू होऊन फूट पडण्याची शक्‍यता निर्माण होते, खरं म्हणजे महाराष्ट्राची स्वायत्तताच धोक्‍यात येते आणि ‘महाराष्ट्र ही उत्तरेतल्या लोकांची एक विभंगलेली वसाहत’ ठरते.

***

पारंपरिक समजुतींचा व साधनांचा आधार घेत त्यांच्यावर आपल्या कुशाग्र बुद्धीचा प्रयोग करत राजवाडे यांनी रचलेल्या या ‘थिसिस’चा प्रतिवाद करून भागवत कोणता ‘अँटिथिसिस’ मांडतात, याकडं वळायला हरकत नाही.

दक्षिणेतल्या ज्या नागवंशाची असंस्कृत व कमतर म्हणून राजवाडे यांनी पुरती वाट लावून टाकली, त्याच्याविषयी भागवत काय माहिती देतात, इथून सुरवात करणं उचित होईल. ‘यदुक्षेत्रात ब्राह्मणांचा प्रवेश’ या आपल्या गाजलेल्या कृतीत भागवत लिहितात : ‘ ‘नाग’ या शब्दाचा मूळचा अर्थ डोंगराळ मुलखातले लोक. ‘नग’ म्हणजे डोंगर व त्यावर जे राहतात ते नाग. अयोध्येच्या पूर्वेस नागलोकांची वस्ती होती, असे महाभारतादिकांवरून दिसते. रामाचा मुलगा कुश याचा सासरा कोणी नाग होता.

मधुमतीचा मुलगा यदू याचा सासराही नागांचा राजा होता. नील नावाचा कोणी नाग होता व तो काश्‍मीरदेशाचा क्षेत्रपाल समजला गेला व कर्कोट नावाचा एक नाग किंवा नागांचा गण होता, त्याच्या संततीने काश्‍मीरदेशावर चांगले दोनशे वर्षे राज्य केले. सिंहलद्वीपातही प्राय: पूर्वी नागांचीच वस्ती होती, असे त्या द्वीपाचे तद्देशीय इतिहासकार म्हणतात...नाग हे असुरांप्रमाणे बरेच दर्यावर्दी दिसतात.’

यानंतर भागवत वानरांचा उल्लेख करतात : ‘ ‘वानर’ म्हणजे विकल्पाने नर अर्थात जंगली’ हे त्यांना मान्य आहे, तेही दक्षिणेतलेच. ‘द्विविद’ आणि ‘मैंद’ या कृष्णकालीन वानरांचा उल्लेखही भागवत करतात. भागवतांच्या म्हणण्यानुसार, ‘महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘हे वानर, नाग व ईक्ष्वाकूचा वंश मिळून यदुगोत्र उत्पन्न झाले. यदूचा बाप ईक्ष्वाकू वंशातील असून आई दानवी व आईची आई राक्षसी. 

त्याच्या मुलाचे आजवळ नागांच्या राजाकडेस.’ या यदूच्या (आणि अर्थात) कृष्णाच्या कुळातल्या आणखी एका व्यक्तीचा उल्लेख भागवत करतात व ती म्हणजे मधू. 
भागवत यांच्या म्हणण्यानुसार, ‘मधूच्या गोत्रात उत्पन्न झालेला म्हणून त्यास ‘माधव’ म्हटलेले आढळते. ‘मधूच्या गोत्रातल्या ज्या पुरुषांस नर्मदेच्या उत्तरेकडे वास केल्याने ब्राह्मणत्व मिळाले, त्यांस ‘माधव्य’ म्हणावे व ज्यांनी आपल्या परंपरागत तलवारबहादुरीचा त्याग न करता आपले क्षत्रियत्व कायम राखले त्यांस ‘माधव’ हे लावावे,’ असे पाणिनीचेही म्हणणे आहे. ‘मा’ = लक्ष्मी व ‘धव’ = पती अर्थात ‘माधव’ म्हणजे लक्ष्मीचा नवरा (= कृष्ण) ही पौराणिकांची शक्कल. अशा रीतीने शक्कल काढण्याचे पौराणिकांस मोठे व्यसन असते.’

या सगळ्या विवेचनाची भूमी उत्तरेतली नसून दक्षिणेतली आहे. भागवत सिद्धान्तच सांगतात : ‘यदूंची आद्यभूमी द्रविड होय. ‘मधुरा’ हा अस्सल शब्द त्यामधील एका नगरीसच लावला जातो. सिंहलद्वीपातील ‘मतुरा’ व यमुनेवरील ‘मथुरा’ हे ‘मधुरा’ शब्दाचे, जसजसे यादव पसरत गेले तसतसे अपभ्रंश झाले.’
भागवत पुढं म्हणतात : ‘विदर्भ’ हे नाव यदूच्या वंशातील एका पराक्रमी पुरुषामुळे देशास मिळाले, अशी परंपरा आहे. चेदि देशातील (बुंदेलखंड) हैहय नावाचे परशुरामाच्या वेळेस गाजलेले प्रसिद्ध कुळ हाही अफाट यदुवंशाचाच एक फाटा. भरतांची भूमी त्या वेळेस यदुसंततीने व्यापून टाकलेली होती.’

भागवत असंही सांगतात : ‘जे गोप तेच गुर्जर व तेच यादव...जितके यादव होते तितके सर्व गोप होते.’ भागवतांचं सर्वसाधारण निरीक्षण असं आहे : ‘जे काही ‘गो’ शब्दाबरोबर संबद्ध असेल, ते सर्व ‘गोपां’चे मूळचे असल्यामुळे त्या नावाने व्यवहारात आले असे समजावे.’

या विवेचनातून निघणारा पुढील मुद्दा आपल्या दृष्टीनं फारच महत्त्वाचा आहे. तो असा : ‘ ‘गो’ = पदार्थ देणारी नदी. ‘गोदा’ किंवा ‘गोदावरी.’ ‘कोकण’ हा शब्द ‘गोकर्ण’ या शब्दाचाच अपभ्रंश होय. ‘गोवे’ किंवा ‘गोवा’ हा ‘गोप’ शब्दाचाच अपभ्रंश दिसतो व ‘गोपकपत्तन’ असे गोव्याचे संस्कृत नाव कदंबांच्या ताम्रलेखात येते. अतिप्राचीन काळचा ‘गोवर्धन’ पर्वत व गोमान पर्वत हे दक्षिण दिशेस सापडतात. अतिप्राचीन कृष्णागिरीही पाहू गेले असता दक्षिणेसच आहे. ‘कृष्णा’ नावाची नदीही दक्षिणापथात आहे. अभीर वंशाचे राजे दक्षिण दिशेस राज्य करीत होते...साक्षात यदुवंश व द्वारवती ही पुष्कळ दिवसांपासून दक्षिण दिशेतच सर्वांच्या दृष्टिगोचर होत आहेत. तेव्हा ‘गोप’ हे मूळचे दाक्षिणात्य असून, गोपकुळात जन्म घेणारा कृष्ण हाही दाक्षिणात्यच असला पाहिजे.’

आता भागवत हे कृष्णानं ज्या नदीत कालिया नागाचं दमन केलं, त्या नदीकडं वळतात. तिचं नाव यमुना असल्याचं सगळेच जाणतात. यमुना ही ‘सूर्यदुहिता’ म्हणजे सूर्याची कन्या मानली जाते. भागवत सांगतात : ‘विचाराअंती ‘तपती’ किंवा ‘तापी’ हीच सूर्यदुहिता ठरते.’

भागवत यांच्या म्हणण्यानुसार, ‘जे यादव तेच महारथ. ज्याच्याजवळ ‘हल’ आहे तो ‘हलिम्‌.’ हल म्हणजे नांगर. नांगर धरून जमिनीचे नीट कर्षण करी म्हणून बलराम हा संकर्षण. ‘हलि’चा ‘हरि’ झाला. ‘हरि’ शब्द वानरांचाही पर्याय आहे. श्रीरामचंद्राचे वेळी जे वानर होते, ते प्राय: कृष्णाचे वेळी शेतकरी बनले. यादवांमध्येही पुष्कळांनी शेतकीकडेस लक्ष लाविले म्हणून ते ‘हरि’ या नावाने प्रसिद्ध झाले. हरि म्हणजे हरिचे = हलिचे पुत्र अर्थात शिष्य. कृष्णमाहात्म्य वाढले तेव्हा ‘हलि’ शब्द बलरामास व ‘हरि’ शब्द कृष्णास लावण्यात आला.’

थोडक्‍यात, ‘अस्सल यदूंची भूमी म्हटली म्हणजे दक्षिणेतील ‘मधुबन.’ तेथून विंध्य पर्वतापर्यंत समुद्राच्या ओघाप्रमाणे दुर्वार असा यदूंचा ओघ थोड्याच वर्षांत पसरला. कौरव-पांडवांच्या वेळेस या महासागराची सीमा ‘मथुरा’नगरी झाली होती.’

भागवतांच्या म्हणण्यानुसार, ‘ ‘यादव’ ही यदुवंशाची स्वकृत संज्ञा असून ‘महारथ’ ही परकृत होती. पुढे ‘यादव’ संज्ञा मागे पडून ‘महारथ’ प्रचलित झाली.’

‘महाराष्ट्रातील मराठे हे अशा प्रकारे या महारथी यादवांचे वंशज होत,’ असा भागवत यांचा सिद्धान्त आहे. राजवाडे हे शिवाजीमहाराजांच्या ‘भोसले’ आडनावाची व्युत्पत्ती शोधत त्या आडनावाचे मूळ ‘भोज’ या एका यादव कुळापर्यंत नेऊन पोचवतात हे खरं; पण शेवटी ते कुळ त्यांच्या लेखी ‘उत्तरेकडील शुद्ध क्षत्रिय; दाक्षिणात्य नव्हे. शिवाय, या भोसले कुळाशिवाय आणखी चार-सहा उच्चकुलीन मराठ्यांच्या कुळांचा अपवाद केला तर इतर मराठे नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न कमतर आर्य.’
भागवत हे नागांनाही वरचे स्थान देऊ करतात व त्यांचा संबंध कृष्णाच्या कुळाशी (रामाच्यासुद्धा) फार पूर्वीपासून असल्याचं सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.