राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांचे अपघाती निधन

Anil Patil
Anil Patil
Updated on

सटाणा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक, वटार (ता.बागलाण) येथील माजी उपसरपंच, बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तसेच महात्मा फुले समता परिषदेचे निष्ठावान कार्यकर्ते अनिल निंबा पाटील (वय ४२) यांचे काल (ता.२८) रोजी रात्री अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. दरम्यान, (कै.) पाटील यांचा राजकीय वादातून घातपात झाल्याचा आरोप करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी (कै.) पाटील यांचे बंधू रामदास निंबा जगताप यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

(कै.) पाटील हे सटाणा येथून आपली कामे आटोपून एकटेच रात्री उशिरा दुचाकीने वटार गावी जात होते. वनोली शिवारात विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र उपचाराआधीच त्यांचे निधन झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आज दुपारी त्यांच्यावर वटार या त्यांच्या मुळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील नेते, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वैद्यकीय अहवालानुसार (कै.)पाटील यांचा मृत्यू अपघातामुळेच झाला असल्याचे दिसून येत आहे. मात्र रामदास जगताप यांच्या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची कसून चौकशी करणार आहोत. प्रथमदर्शनी (कै.) पाटील यांचा मृत्यू अपघाती असल्याचे उपलब्ध परिस्थितीवरून दिसत असल्याचेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.
 
(कै.) अनिल पाटील यांना राजकारणासोबत समाजकारणाचाही मोठा छंद होता. वटार परिसरात त्यांनी जलसंधारणाची विविध कामे मार्गी लावली असून उपसरपंचपदाच्या कालावधीत गावात विविध विकासकामे देखील केली आहेत. बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांचे ते निकटवर्तीय होते. आपल्या स्वभावामुळे त्यांनी तालुक्यात मोठा मित्रपरिवार जमविलेला होता. आज त्यांच्या निधनाचे वृत्त सोशल मिडियावर पसरताच अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.